आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या फगवा महोत्सवाचा समारोप
राज्यभरातून 4 हजार नागरिकांची
फगवा महोत्सवाला भेट
पुढील
वर्षी अधिक व्यापक स्वरुपात फगवा महोत्सवाचे आयोजन करु
-
पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा
अमरावती,
दि. १२ :
मेळघाटातील आदिम जीवनसंस्कृतीचे दर्शन घडविणा-या फगवा महोत्सवाचा समारोप आज झाला. पर्यटन
संचालनालय व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोठा येथील ग्रामज्ञानपीठ
संपूर्ण बांबू केंद्रात आयोजित या दोन दिवसीय महोत्सवाला राज्यभरातून चार हजार नागरिकांनी
भेट दिली.
समारोपाच्या
सत्रात पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ऑनलाईन उपस्थित राहून नागरिकांना
संबोधित केले. ते म्हणाले की, मेळघाटातील आदिवासी संस्कृती, तेथील पारंपारिक कला, परंपरा
यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी फगवा महोत्सवाचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरले आहे. निसर्गसंपन्न
मेळघाटातील आदिवासी संस्कृती, आदिवासी बांधवांची कला यांचे प्रदर्शन व त्यांच्या व
हस्तकलेच्या वस्तूंना अन्यत्र मागणी वाढावी, यासाठी पुढील वर्षी फगवा महोत्सव अधिक
व्यापक स्वरुपात साजरा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
डिसेंबरमधील
अमरावती दौ-यात फगवा पर्यटन महोत्सव घेण्याची घोषणा पर्यटनमंत्र्यांनी केली होती.
त्यानुसार या दोन दिवसीय महोत्सवात आदिवासी संस्कृतीतील गाणी, नृत्य, कला याबरोबरच
विविध वस्तू, बांबूंपासून तयार विविध कलाकृती, मेळघाटात उत्पादित धान्य आदींच्या
दालनांचा समावेश करण्यात आला होता. धारणीचे
गटविकास अधिकारी महेश पाटील, धारणीचे नायब तहसीलदार शिरीष वसावे, माजी जिल्हा परिषद
सदस्य सदाशिव खडसे, कोठाच्या सरपंच रुखमा
कासदेकर, केंद्राच्या अध्यक्ष निरूपमा देशपांडे तसेच पर्यटन उपसंचालक प्रशांत सवाई़
आदी उपस्थित होते.
निसर्गपूजक
असलेल्या आदिवासी संस्कृतीमध्ये होळी व घुंगरु बाजार हे महत्वाचे उत्सव आहे. मेळघाटातील
हा पहिला महोत्सव असून चांगला प्रतिसाद मिळाला. यापुढे अधिक दालनांचा समावेश करून
भव्य स्वरूपात महोत्सव घेण्यात येईल, असे श्री. सवाई यांनी यावेळी सांगितले.
महोत्सवात कोरकू,
गोंड, गवळी, भिलाला आदी विविध संस्कृतींची पारंपरिक लोकनृत्य व लोकगीते सादर करण्यात
आली. समारोपीय कार्यक्रमात जंगल सफारी, निसर्ग भ्रमंतीबरोबरच परिसंवादही घेण्यात
आला. आदिवासी कलावंतांचा ‘सन्मान सोहळा’ही यावेळी आयोजित करण्यात आला. यामध्ये आदिवासी
बांधवांना मान्यवरांच्या हस्ते धोतर, साडी, चोळी व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा