निवडणूक विशेष:
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक - २०२६
खाजगी आस्थापनांमधील मतदारांना मतदानासाठी
२ तासांऐवजी ४ तासांची विशेष सवलत
अमरावती, दि. १८ : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे. मात्र निवडणुकीकरीता मतदार असलेल्या खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना ही विशेष नैमित्तिक रजा लागू होत नाही. त्यामुळे अशा मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी २ तासांची विशेष सवलत देण्याबाबत निर्देश होते. तथापि, या निवडणूकीच्या मतदान केंद्राचे अंतर काही ठिकाणी अधिक असल्याने प्रवास करण्यासाठी जास्त वेळ जातो. त्यामुळे या निवडणुकीकरीता मतदार असणाऱ्या खाजगी आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या मतदारांना आता मतदान करण्यासाठी २ ऐवजी ४ तासांची विशेष सवलत देण्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई यांनी कळविले आहे.
भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर, २०२६ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये औरंगाबाद विभाग, पुणे विभाग व नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच अमरावती विभाग व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक - २०२६ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूकीचे मतदान शुक्रवार २३ ऑक्टोबर, २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत व मतमोजणी मंगळवार २७ ऑक्टोबर, २०२६ रोजी होणार आहे.
निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना मतदानांचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ब नुसार भर पगारी सुट्टी जाहीर करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने, सामान्य प्रशासन विभागाच्या २३ जून, १९९१ रोजीच्या शासन निर्णयान्वये पदवीधर/शिक्षक मतदारसंघामध्ये मतदार असलेल्या व्यक्तींना विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे. या शासन निर्णयाची प्रत शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
निवडणुकीकरीता मतदार असलेल्या खाजगी
आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना सदर विशेष नैमित्तिक रजा लागू होत नाही.
त्यामुळे अशा मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी २ तासांची विशेष सवलत
देण्याबाबत संबंधित खाजगी आस्थापनांना त्यांच्या स्तरावरुन आवश्यक त्या सूचना
देण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने कळविले होते. आता या निवडणूकीच्या मतदान
केंद्राचे अंतर काही ठिकाणी अधिक असल्याने प्रवास करण्यासाठी जास्त वेळ जातो.
त्यामुळे या निवडणुकीकरीता मतदार असणाऱ्या खाजगी आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या
मतदारांना मतदान करण्यासाठी २ तासांऐवजी ४ तासांची विशेष सवलत देण्याबाबत मुख्य
निवडणूक अधिकारी, मुंबई यांनी
सुधारीत पत्राद्वारे कळविले आहे. अमरावती विभागातील सर्व खासगी आस्थापनांनी या
सवलतीच्या निर्देशाची नोंद घ्यावी व सर्व संबंधित मतदारांना मतदानासाठी सवलत
देण्यात यावी अशी सुचना निवडणूक प्रशासनाने केली आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी मतदार असलेल्या कर्मचारी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावावा असे आवाहन अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.
००००






.jpeg)





