मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास 30 एप्रिल पर्यत मुदतवाढ

 

सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांना

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास 30 एप्रिल पर्यत मुदतवाढ

 

अमरावती दि 26: सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुक्रमे अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागासप्रवर्ग भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परिक्षा फी, योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्याना निर्वाह भत्ता देण्याबाबत योजना राबविण्यात येतात. या योजनांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास दि.३० एप्रिल २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व विद्यार्थी व महाविद्यालयांनी या मुदतवाढीत तात्काळ सादर करावेत.

अनुसूचीत जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागासप्रवर्ग प्रवर्गासाठी नवीन अर्ज व नूतनीकरणाचे अर्ज भरण्याकरीता तसेच सन २०२१-२०२२ चे अर्ज Re-Apply करण्याकरीता दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तेव्हा याद्वारे अमरावती विभागातील सर्व संस्था व सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन नूतनीकरणाचे अर्ज विहित मुदतीत भरण्याकरीता https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नूतनीकरणाचे अर्ज तसेच विद्यार्थ्यांच्या लॉगिनकडे त्रुटि पूर्ततेकरीता SEND BACK केलेले अर्ज संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरीत त्रुटिपूर्तता करुन जिल्हा लॉगिन वर पाठवावे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडुन विहित वेळेत अर्ज भरुन घ्यावे. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, श्री. सनिल वारे यांनी केले आहे.

00000

 

 

 

 

 

 

 

 

बुधवार, २० एप्रिल, २०२२

कोविडमध्ये पालक गमावलेल्या बालकांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

कोविडमध्ये पालक गमावलेल्या बालकांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवा

                                                                                                            - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

विविध विषयांच्या आढावा बैठकीत दिले निर्देश

 





           अमरावती दि 20: कोविडकाळात पालक गमावलेल्या बालकांसाठी बालसंगोपन योजना, बाल न्याय निधी योजना आदींची गतीने व प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज विविध विषयांचा आढावा श्रीमती कौर यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

          बैठकीला मनपा सहायक आयुक्त नरेंद्र वानखेडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) इ.झेड.खान, मनपा शिक्षणाधिकारी डॉ अब्दुल राझिक, विस्तार अधिकारी कोहळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, सहायक पोलिस निरीक्षक अजितसिंग राजपूत, बालविकास प्रकल्प अधिकारी अतुल भडांगे, राजश्री कोलखेडे, राजेश वानखेडे, मंगल पांचाळ चाईल्ड लाईन केंद्राचे समन्वयक अमित कपूर आदी उपस्थित होते.

 

 बाल न्याय निधीतून बालकांना तात्काळ मदत दयावी

 

            कोविड काळात अनाथ किंवा एक पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्ह्याला बाल न्याय निधीतून 45 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्या निधीतून  वर्षातून एकदा दहा हजार रुपयांची देण्यात येणारी मदत, या बालकांचे शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क भरावे व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यात यावे.

महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण  विभागाकडून या बालकांसाठी  करण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीबाबतच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात यावा असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

 

 'मिशन वात्सल्य' अंतर्गत महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन करावे

               कोविड काळात घरचा कर्ता पुरुष गमावलेल्या विधवा महिलांसाठी  राबविण्यात येणाऱ्या मिशन वात्सल्य योजनेच्या लाभापासून एकही महिला वंचित राहू नये. योजनेअंतर्गत या महिलांना आर्थिक मदत करण्यात येतेच पण त्याशिवाय त्या  कायमस्वरूपी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्या यासाठी त्यांच्यातील कौशल्य विकसित करणारी प्रशिक्षणे, रोजगार विषयी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कौर यांनी केल्या.

 

 गरजू बालकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा

                चाईल्ड लाईन व बालकांच्या सरंक्षण विषयी बाबींचा आढावा जिल्हाधिकारी कौर यांनी घेतला. बालकांच्या हक्कांचे संरक्षण, बालकांना शोषणमुक्त करणे, वैद्यकीय सेवा, निवारा पुरविणे, विविध शासकीय योजनांचा गरजू बालकांना लाभ मिळवून देणे इत्यादीं उपक्रम शासकीय व निमशासकीय संस्था व यंत्रणांनी समन्वयाने राबवावे असे निर्देश चाईल्ड लाईन सल्लागार समितीचा आढावा घेतांना श्रीमती कौर यांनी दिले.

 बालकांसाठीच्या 1098 हेल्पलाईनचा अधिकाधिक प्रचार व प्रसार करावा

                चाईल्ड लाईन 1098 क्रमांका बाबतची माहिती प्रत्येक शाळेत, शहरातील मोक्याच्या ठिकाणी, पोलीस स्टेशनमध्ये, बस आगार परिसरात भित्तिपत्रके लावून, ठिकठिकाणी 1098 च्या माहितीची उद्घोषणा करून व वृत्तपत्राच्या माध्यमातून 1098 बाबतचा प्रचार व प्रसार करण्यात यावा. असे निर्देश जिल्हाधिकारी कौर यांनी दिले.

रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण करून त्यांना शालेय शिक्षण देण्याबाबत उपाययोजना करण्यात यावी. या बालकांनी किंवा त्यांच्या पालकांनी पुन्हा रस्त्यावर येऊन जीवन जगू नये, त्यांचा  सर्वांगीण विकास व्हावा यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात यावे, असे निर्देश दिले.

 

 

 बालविवाहाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीपर उपक्रम राबवावे

               जिल्ह्यातील प्रामुख्याने आदिवासी भागात होणारे  बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क रहावे.जानेवारी ते एप्रिल 2022 पर्यंत 14 बालविवाह रोखण्यात आले आहे. परंतु बालविवाह होऊ नये यासाठी विशेष उपक्रम राबविण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी कौर यांनी केल्या. जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी सूचना केल्या. आदिवासी ग्रामीण भागात बालविवाहाच्या  दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे गरजेचे असून त्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना श्रीमती कौर यांनी केल्या.

              

00000

सोमवार, ११ एप्रिल, २०२२

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यातून मुलगामी परिवर्तनाला चालना - प्रा.भगवान फाळके

 

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यातून मुलगामी परिवर्तनाला चालना

                                                                               - प्रा.भगवान फाळके

अमरावती, दि.11 : - महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य व्यापक आणि मुलगामी परिवर्तनाचे आहे. महात्मा फुले यांनी समाजातील अपप्रवृत्ती आणि धारणांच्या विरोधात विद्रोह करुन परखड सामाजिक चिकित्सा केली. तसेच समाजातील तळागाळातील व्यक्तींमध्ये आत्मसन्मान जागृत करुन त्यांना ध्येयप्रवण केले, असे प्रतिपादन प्रा. भगवान फाळके यांनी आज येथे केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

            समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, राजेंद्र जाधवर आदी यावेळी उपस्थित होते.

प्रा. फाळके यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे समाजकार्य आजही समाजाला दिशा देण्याचे कार्य करीत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी आशिष मेतकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पोवाडा सादर केला. तसेच विद्यार्थ्यांनी विचार व्यक्त केले. श्रीमती केदार यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

000000

 

जिल्ह्यात कलम 38 लागू

 

जिल्ह्यात कलम 38 लागू

 

अमरावती, दि. 11: जिल्ह्या त शांतता व सुव्य‍वस्था  अबाधित राहावी यासाठी अपर पोलीस अधीक्षक,अमरावती ग्रामीण यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 38 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 9 ते 23 एप्रिल 2022 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्यक्तीविरुद्ध   कायदेशीर कारवाई करण्यातत येईल, असेही अपर पोलीस अधीक्षक,अमरावती ग्रामीण  यांनी कळविले आहे.

000000

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

 

        अमरावती, दि. 11: जिल्हाधिकारी कार्यालयात आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

  उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले ,अधीक्षक उमेश खोडके, अमोल दांडगे, नाझर किशोर चेडे  तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले .

000000 

पारधी समाजाच्या व्यक्तींसाठी विविध योजना; अर्ज करण्याचे आवाहन

 

पारधी समाजाच्या व्यक्तींसाठी विविध योजना; अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 11 : धारणी एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प कार्याक्षेत्रांतर्गत पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या पारधी समाजाच्या अर्जदारांकडून योजनांचे अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजनांचे विनामूल्य अर्ज वाटप व स्विकृती शासकीय आश्रमशाळा (गुल्लरघाट) कॅम्प, बाभळी ,दर्यापूर, एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प, धारणी अंतर्गत सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालय मोर्शी, उपकार्यालय, अपर आयुक्त कार्यालय अमरावती व प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी येथे सुरू आहे.

पारधी समाजाच्या अर्जदारांनी परिपूर्ण कागदपत्रांसह भरलेला अर्ज दिनांक 5 मे 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. या योजनेचा  लाभ मिळण्यासाठी प्राप्त होणा-या अर्जाची छाननी करून समितीमार्फत अर्जदारांची अंतिम  लाभार्थी निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी या कार्यालयातील विकास शाखेशी तसेच दुरध्वनी क्रमांक 07226-224217 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पारधी समाजाच्या लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे योजनांचा लाभ दिला जातो.

पीठ गिरणी पुरवठा करणे, शुटिंग कॅमेरा पुरवठा करणे, शिलाई मशिन खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे, पारधी समाजाच्या बचत गटांना विहीर खेादकाम करण्यासाठी क्रेन मशिन पुरवठा  अर्थसहाय्य करणे, पारधी समाजाच्या बचतगटांना मंडप साहित्य खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे, डी. एड. झालेल्या युवक-युवतींना शिक्षक पात्रता परिक्षेबाबत मार्गदर्शन करणे, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देणे, पारधी समाजाच्या लाभार्थ्यांना दुचाकी वाहने दुरूस्ती व देखभाल करण्याचे प्रशिक्षण देणे, वेल्डींग कामाचे प्रशिक्षण देवून साहित्य वाटप करणे आदी योजनांचा समावेश आहे.   

0000000

महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 






महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त

विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 

अमरावती, दि. 11 :  महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात  त्यांच्या  प्रतिमेस उपआयुक्त (सा.प्र,/महसूल), संजय पवार यांनी  पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.       

  यावेळी  उपआयुक्त (पुनर्वसन) गजेंद्र बावणे, सहायक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) विवेकानंद काळकर यांनी त्यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. उपस्थितांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0000000

रविवार, १० एप्रिल, २०२२

मदर डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी - दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार

 

मदर डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरू करण्यासाठी

आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी

-         दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार

विभागीय क्रीडा संकुल येथील बैठकीत दिले निर्देश

        

अमरावती दि 10 (विमाका) : दर्यापूर तालुक्यात दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध असून तेथे दूध विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करणे गरजेचे आहे. यामुळे दुग्ध व्यवसायाला चालना मिळेल. दुधाचा व्यवसाय ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्वाचा घटक आहे. दर्यापूर तालुक्यात मदर डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी येथे दिले. विभागीय क्रीडा संकुलातील सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी आमदार बळवंत वानखेडे, प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी गजानन तावडे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिरीष  सोनवणे, पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ.मोहन गोहत्रे, पशुसंवर्धन उपायुक्त संजय कावरे, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे डॉ.व्ही श्रीधर, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुरुषोत्तम सोळंके, विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प तथा मदर डेअरीचे प्रकल्प प्रमुख मुकेश झा आदी उपस्थित होते.

बैठकीत बोलतांना श्री केदार म्हणाले, अंजनगाव व  दर्यापूर तालुक्यात दूध निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असून दूध संकलन केंद्र सुरू करण्यास वाव आहे. जवळपास चाळीस दूध संकलन केंद्र तेथे निर्माण करता येऊ शकणे शक्य आहेत. त्या अनुषंगाने तेथील भागाची तातडीने पाहणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

दुधाळ जनावर वाटपाची योजना प्रभावीपणे राबवावी

 

अनुसूचित जाती व जमातीसाठी अनुदान तत्वावर राबविण्यात येणाऱ्या जनावर वाटपाच्या योजनेत देशी वंशाच्या जातीचा समावेश प्रामुख्याने करण्यात यावा. होस्टेन, जर्सी गायीच्या ऐवजी भारतीय वंशाच्या उच्च उत्पादकता असलेल्या गायी म्हणजे कांकरेज, गीर, साहिवाल, मुऱ्हा या गायींचे वाटप जास्त प्रमाणात करण्यात  यावे. ग्रामीण भागात योजनेच्या माध्यमातून दुधाळ जनावरांच्या  पालनाबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी. असे निर्देश श्री केदार यांनी दिले.

ग्रामिण भागात शेळीपालन सकारात्मक अर्थचक्रासाठी आवश्यक

 ग्रामीण भागातील  शेळीपालनचा जोड व्यवसाय येथील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेळीचे वाटप करत असताना देशी जातीच्या दमास्कस शेळीपालनापासून होणाऱ्या आर्थिक फायद्याबाबत पशुसंवर्धन विभागाने जोड व्यावसायिकांमध्ये जनजागृती करावी. असे निर्देश श्री केदार यांनी दिले.

 

 

क्रीडासंकुल निर्मितीबाबत आढावा

जिल्ह्यात क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा. खेळाडूंसाठी आवश्यक त्या सोयी सुविधांची निर्मिती प्राधान्याने करण्यात यावी असे श्री केदार यांनी क्रीडाविषयक बाबींचा आढावा घेतांना सांगितले. अंजनगाव सुर्जी व दर्यापूर तालुक्यात क्रीडा संकुल निर्माण करण्याबाबत प्रस्ताव तयार करून ते शासनास तात्काळ सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विभागीय क्रीडा संकुलातील व्यवस्थेची माहिती त्यांनी यावेळी घेतली. खेळात प्रविण्यप्राप्त  विद्यार्थ्यांना एक सत्र फी शुल्कात सूट देता येईल असे सांगितले.

 यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, क्रीडा व युवक सेवाचे उपसंचालक विजय संतान, शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ अंजली ठाकरे, अमरावती अथलिटिक असोसिएशनचे सचिव प्रा.अतुल पाटील, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण संघटनेचे सहसचिव शिवदत्त ढवळे तसेच विविध खेळ संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

                                                    000000000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अन्न, औषधींची तपासणी प्रमाणित निकषांनुसार करावी - अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

 






अन्न, औषधींची तपासणी प्रमाणित निकषांनुसार करावी

-         अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

अन्न सुरक्षा, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याची प्रभावी

अंमलबजावणी करण्याचे निर्देश

        अमरावती, दि. 10 : अन्न सुरक्षा व मानदे, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत दिलेल्या बाबींची प्रभावी अंमलबजावणी करावी. नागरिकांना सुरक्षित, पोषक व गुणवत्तापूर्ण अन्न मिळण्यासाठी जिल्हयात सर्व ठिकाणी खाद्य पदार्थांच्या विक्रीस्थळाची, पदार्थ तयार करतांना वापरण्यात येणाऱ्या  अन्न घटकांची वेळोवेळी पाहणी करण्यात यावी. जिल्ह्यात प्रतिबंधित अन्न पदार्थ व औषधांच्या होणाऱ्या विक्रीबाबत कारवायांचे प्रमाण वाढविण्यात यावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्र.सहआयुक्त (अन्न) शरद कोलते, प्र.सहआयुक्त (औषधे) उमेश घरोटे, अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) संदीप सूर्यवंशी, अन्न सुरक्षा अधिकारी राजकुमार कोकडवार, भाऊराव चव्हाण, सीमा सुरकर, औषध निरीक्षक मनीष गोतमारे, स्वाती भरडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री शिंगणे यांनी अन्न व औषधींचे गुणांकन करत असतांना त्यातील पोषक घटक व सुरक्षिततेचि तपासणी करण्याचे काम योग्य पध्दतीने व प्रमाणित निकषानुसार करण्यात यावे अशा सुचना  संबंधितांना दिल्या.

उत्पादक व आस्थापनांना परवाना देण्यापूर्वी पाहणी करावी

जिल्ह्यात नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थ व औषधी विक्रेत्यांच्या आस्थापनांची पुर्ण पाहणी करावी. संबंधित आस्थापनांनी नियमांचे पालन केले असल्याचे निदर्शनास आल्यावरच परवाना देण्यात यावा. अशा आस्थापनांची सातत्याने पाहणी करण्यात यावी असे श्री. शिंगणे यांनी सांगितले.

 

औषधी दुकानातुन होणाऱ्या औषधींच्या विक्रीबाबत सतर्कता बाळगावी

औषधी विक्री करण्यात येणाऱ्या दुकांनामध्ये महिन्याल किमान दहा तपासण्या करण्यात याव्या असे निर्देश आहेत. औषधी दुकांनांच्या जास्तीत जास्त तपासण्या करण्यात याव्या असे श्री. शिंगणे यांनी सांगितले. जिल्ह्यात २३५० औषधी विक्रीच्या आस्थापना आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने देण्यात येणाऱ्या औषधांचीच विक्री या आस्थापनांमधुन व्हावी. व्यसन लागण्याची शक्यता असणाऱ्या औषधींची विक्री डॉक्टरांच्या सल्ल्याने व आवश्यकतेनुसार व्हावी यासाठी या आस्थापनांची सातत्याने पाहणी करावी असे निर्देश श्री. शिंगणे यांनी दिले.

 

तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी

अन्नपदार्थांमध्ये भेसळीबाबत कुठलीही तक्रार प्राप्त होताच त्या आस्थापना किंवा दुकांनांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. नागरिकांनी केलेल्या अशा तक्रारीबाबत शहानिशा करुन त्या पदार्थांचा साठा तात्काळ जप्त करावा.  खाद्यपदार्थांच्या नमुन्यांची तपासणीचा अहवाल व कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. शिंगणे यांनी दिले. खाद्यतेल, दुध, पाकिटबंद खाद्यपदार्थ, पदार्थांची उत्पादन तिथी, प्रसाद वितरण व यात्रेच्या वेळी वापरण्यात येणारे अन्न पदार्थ, याबाबत संबंधितांनी माहीती दिली.

 

 

मार्च 2022 पर्यत 196 अन्न नमुने

मार्च 2022 पर्यंत जिल्ह्यात 196 अन्नाचे नमुने घेण्यात आले असून त्यात 3 कमी दर्जाचे, 4 मिथ्याछाप व 3 असुरक्षित आढळून आले. निम्न दर्जा प्रकरणी 39 हजार दंड आकारण्यात आला. 317 आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून 52 आस्थापनांना  सुधारणा करण्याबाबत आदेश देण्यात आले. गुटखा, पान मसाला या प्रतिबंधित अन्न पदार्थाबाबत जिल्ह्यात 28 ठिकाणी धाड टाकण्यात आली असून 92 लक्ष 71 हजार रुपयांच्या साठा जप्त करण्यात आली असल्याची माहिती सहआयुक्त शरद कोलते यांनी दिली.

 

309 औषधी व सौंदर्य प्रसाधने नमुन्यांची तपासणी

मार्च 2022 पर्यंत औषधी  व सौंदर्य प्रसाधनां बाबत करण्यात आलेल्या  309 तपासण्यांमधील 132 आस्थापनांना कारणे दाखवा बजावण्यात आले असून 77 आस्थापनांचे निलंबन व 20 आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले. 65 औषधी नमुन्यांच्या तपासणीदरम्यान 5 नमुने अप्रमाणित आढळल्याची माहिती सहआयुक्त उमेश घरोटे यांनी यावेळी दिली.

000000

शुक्रवार, १ एप्रिल, २०२२

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

 

जिल्‍ह्यात कलम 37 (1)  व (3) लागू

 

अमरावती, दि. 1 (विमाका) : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 11 एप्रिल 2022 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर जिल्हा दंडाधिकारी  यांनी कळविले आहे.

000000