गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

नविन परीक्षा केंद्र मागणी प्रस्ताव सादर करण्यास 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ /दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना

 

  नविन परीक्षा केंद्र मागणी प्रस्ताव सादर करण्यास

31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

 

  अमरावती, दि. 30 :  शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये फेब्रवारी-मार्च महिन्यात  होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांकरीता नविन परीक्षा केंद्र मागणी प्रस्ताव सादर करण्याकरीता दि. 31 ऑगस्ट 2021 या  कालावधीला 31 ऑक्टोबर 2021 पर्यत मुदतवाढ देण्यात येत आहे, असे विभागीय मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे काही शाळा, महाद्यिालयांना केंद्र प्रस्ताव सादर न करता आल्यामुळे मुदतवाढ देण्यात येत आहे. ही मुदतवाढ फक्त या वर्षाकरीता लागू राहील. या कालावधित अर्ज विक्री व भरलेले अर्ज स्विकृत करण्यात येणार आहे. नविन प्रस्ताव अर्जाची किमत रुपये 100 निर्धारित करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर 2021 नंतर नविन परीक्षा केंद्र मागणी अर्ज स्विकारल्या जाणार नाही असे विभागीय मंडळाने कळविले आहे.

0000000

वृत्त क्र. 123                                                                  दि.- 30 सप्टेंबर 2021

 

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी

डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना

                                विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

 

अमरावती दि.30 :- इयत्ता दहावी मध्ये 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्यांना एमएच-सीइटी, नीट, जेईई या व्यावसायिक उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारी करीता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेअंतर्गत  विशेष अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ मार्च 2021 मधील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना घेता येईल. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक असून कुटूंबातील कोणताही सदस्य  शासकीय, निमशासकीय सेवेत कार्यरत नसावा, स्वघोषणापत्र पालकांनी देणे आवश्यक आहे. अर्जासोबत विद्यार्थ्यांच्या पालकांचे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, दहावीची गुणपत्रिका, रहिवाशी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मुख्याध्यापक यांचे शिफारस पत्र इत्यादी कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सादर करणे अनिवार्य आहे. अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे पत्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवावा. या योजनेच्या अटी व शर्ती , निकष व कार्यपध्दती, अर्जाचा नमुना याबाबतची माहिती बार्टीचे संकेतस्थळ https://barti.in/notice-board.php यावर उपलब्ध असल्याची माहीती समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

000000

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

4 रोजी युवकांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन /सहकारी गृहनिर्माण संस्थांची नामतालिका तयार करण्यासाठी अर्ज आंमत्रित

 

                                           4 रोजी युवकांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन

 

  अमरावती, दि. 28 : आयटीआय उत्तीर्ण युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी येत्या 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था व मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र एन. एन. एस. हॉल, येथे भरती मेळावा आयोजित करण्यात येत आहे. या भरती मेळाव्यात सर्व नामांकित कंपनी आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

सर्व व्यवसायातील आय.टी.आय.उतीर्ण, परीक्षेस बसलेले आणि जे प्रशिक्षाणार्थी परीक्षेस बसणार अशा सर्वांनी आवश्यक मुळे कागदपत्रे व बायोडाटासह उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अंशकालीन प्राचार्या सौ. एम. डी. देशमुख यांनी कळविले आहे.

00000

वृत्त क्र. 122                                                                                                        दि.28.9.2021

सहकारी गृहनिर्माण संस्थांची नामतालिका तयार करण्यासाठी अर्ज आंमत्रित

अमरावती, दि. 28 :   विभागीय सहनिबंधक, ई वर्गातील संस्था म्हणजेच 250 पर्यत किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या निवडणूकांसाठी दि. 1 सप्टेंबर 2021 ते दि. 31 ऑगस्ट 2024 या कालावधीकरीता निवडणूक निर्णय अधिकारी यांची नामतालिका (पॅनल) तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. शासकीय विभागातील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कार्यरत अधिकारी, कर्मचारी, प्रमाणित लेखापरिक्षक, वकील, शासकीय, स्थानिक संस्थेकडून निवृत झलेलया अधिकारी, कर्मचारी अर्ज सादर करु शकतात.

              विहित नमुन्यातील अर्ज 21 सप्टेंबर 2021 ते 20 ऑक्टोबर 2021 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळतील. या संदर्भातील विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयातील सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाणा येथील उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात विहीत नमुन्यातील अर्ज मिळतील असे विभागीय सहनिबंधक राजेंद्र दाभेराव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

जागतिक पर्यटन दिनानिमित्त रविवारी हेरिटेज सायकल रॅली

 

जागतिक पर्यटन दिनानिमित्त

रविवारी हेरिटेज सायकल रॅली

·        स्वातंत्र्याचे 75 वर्षा निमित्त 75 सायकलपटू होणार सहभागी

 

  अमरावती, दि. 21 : पर्यटन संचालनालयातर्फे  स्वातंत्र्याचे 75वर्षे, आझादी का अमृत महोत्सव आणि जागतिक पर्यटन दिनानिमित्त रविवार, दि. 26 सप्टेंबर रोजी हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात पहिले नोंद करणारे 75 सायकलपटू सहभागी होतील.

       जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने पर्यटन संचालनालय व श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयव अमरावती टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन  यांच्या वतीने दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता वेलकम पॉईट, नागपूर रोड येथून हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.कोविड 19 च्या नियमांचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने या रॅलीमध्ये प्रथम नोंदणी करणाऱ्या 75 सायकलपटू सहभाग घेता येईल, सायकल रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्यांना कोविडला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने मास्क, सुरक्षित सामाजिक अंतर आणि सॅनिटायझर या त्रिसुत्रीचे पालन करणे आवश्यक राहिल , ही रॅली अमरावती  ते यावली (शहीद) आणि परत अमरावती अशी 60 कि. मी.  राहणार आहे यात सहभागी व्हावे, असे उपसंचालक (पर्यटन) विवेकानंद काळकर यांनी कळविले आहे.

                                                                 00000

 

 

 

 

 

 

 

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

सुधारीत बातमी, जागतिक पर्यटन दिनानिमित्त रविवारी हेरिटेज सायकल रॅली

 

जागतिक पर्यटन दिनानिमित्त

रविवारी हेरिटेज सायकल रॅली

 

अमरावती, दि. 21 : पर्यटन संचालनालयातर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त रविवार दि. 26 सप्टेंबर रोजी हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात निवड केलेले हौशी सायकलस्वार सहभागी होतील.

       जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने पर्यटन संचालनालय व इतर क्षेत्रातील सहभागी घटक यांच्या वतीने दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता वेलकम पॉईट, नागपूर रोड येथून हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली अमरावती  ते यावली (शहीद) आणि परत अमरावती अशी 60 कि. मी.  राहणार आहे, असे उपसंचालक (पर्यटन) विवेकानंद काळकर यांनी कळविले आहे.

000000

 

 

महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरण्याची मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबाबत सूचना

 

महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरण्याची मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबाबत सूचना

 

अमरावती, दि.21 : महाडीबीटी पोर्टलवर सन 2020 -2021 वर्षातील अनुसूचित जाती, विजाभज , इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचे नवीन तसेच नूतनीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे .

 सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज , इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती , मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक पाठ्यक्रम आणि संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजना राबविण्यात येतात . यासाठी महाविद्यालयांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घ्यावेत . तसेच यात काही अडचण आल्यास ‘ सेंड बॅक ’ केलेल्या अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी त्वरित त्रुटी पूर्तता करून घ्यावी तसेच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून विहीत काळात अर्ज भरून घ्यावे , असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी पत्रकाद्वारे केले आहे .

00000

जागतिक पर्यटन दिन 27 रोजी हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन

 

जागतिक पर्यटन दिन

27 रोजी हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन

अमरावती, दि. 21 : 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन वाढीच्या दृष्टीने पर्यटन संचालनालय व इतर क्षेत्रातील सहभागी घटक यांच्या वतीने दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता वेलकम पॉईट, नागपूर रोड येथून हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅलीचा मार्ग अमरावती ते यावली (शहीद) ते अमरावती असा एकूण 60 कि. मी.  एवढा रहाणार आहे. या रॅली मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन उपसंचालक (पर्यटन) विवेकानंद काळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

विभागीय आयुक्त कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन

 





विभागीय आयुक्त कार्यालयात

प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन

अमरावती, दि. १७ : प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना १३६ व्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी अभिवादन केले. श्री. सिंह यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपायुक्त संजय पवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

दहावी व बारावीच्या खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी 12 ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी करावी

 

दहावी व बारावीच्या खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी

12 ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी करावी

अमरावती, दि. 16 : शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी खाजगीरित्या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा शिक्षण मंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. विद्यार्थ्यांनी दिनांक 16 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी व शुल्क ऑनलाईन पदधतीने सादर करावे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-ssc.ac.in  या संकेतस्थळावर तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-hsc.ac.inया संकेतस्थळावर अर्ज सादर करावा.   

 

दिनांक 17 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत मूळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सादर करावी. दिनांक 18 ऑक्टोबर रोजी संपर्क केंद्र शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी ही कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी.

शाळा सोडल्याचा व दाखला दिल्याचा दिनांक याबाबत पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दिनांक ग्राहय धरण्यात येईल. कोविड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दहावी, बारावीचा 2021 या वर्षाचा निकाल जुलै-ऑगस्ट मध्ये लागलेला असल्याने, खाजगी विद्यार्थी ऑनलाइन नाव नोंदणीबाबत शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाच्या दाखल्यावरील शाळा/कनिष्ठ महाविद्यालय सोडल्याची तारीख 31 ऑगस्ट 2021 अशी ग्राहय धरण्यात येईल. कोविड- 19 मुळे फक्त 2022 च्या परीक्षेसाठी हे लागू असेल तथापि विद्यार्थ्यांच्या वयासाठी दि. 31 जुलै तारीख राहील. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावयाची आहे. ,असे पुणे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसल यांनी कळविले आहे. 

 

00000

शालांत परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्ती

 शालांत परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्ती

अमरावती दि 16: शैक्षणिक वर्ष 2021 मध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा करीता विभागीय मंडळस्तरावर 4 समुदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना समुपदेशन, परीक्षेसंबंधी समस्याचे निराकरण, मार्गदर्शन करण्यासाठी सकाळी 8 वाजता ते सायंकाळी 8 वाजेपर्यत ते कार्यान्वीत असतील.

हे समुपदेशनाचे कार्य दिनांक 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2021 या कालावधी दरम्यान सुरु ठेवण्यात येईल. भ्रमणध्वनीवरुन विद्यार्थ्यांचे समुदेशन करण्यात येणार असून समुदेशकांची नावे, भ्रमणध्वनी क्रमांक खालील प्रमाणे आहेत. अमरावती जिल्ह्यासाठी सी. एस. कोहळे 9423649541, अकोला जिल्ह्यासाठी एच आर. हिंगनकर 9371641764, यवतमाळसाठी ए. जी. ठमके9423625414, बुलडाणासाठी  व्ही. डी. भारसाकळे 9422926325, तसेच कार्यालयीन हेल्पलाईन दुरध्वनी क्रमांक 0721-2662608 हा असून विद्यार्थ्यांनी आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी या क्रमांकाशी संपर्क साधावा असे विभागीय सहसचिव, तेजराव काळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले  

00000

शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१

पालकमंत्र्यांचा अतिवृष्टी भागात दौरा, नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे भागाची केली पाहणी, भरपाईचे प्रस्ताव तत्काळ सादर करा - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 



















पालकमंत्र्यांचा अतिवृष्टी भागात दौरा

नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे भागाची केली पाहणी

भरपाईचे प्रस्ताव तत्काळ सादर करा

                                                                    - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती दि 11: अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून भरपाईचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज नांदगाव खंडेश्वर व चांदुर रेल्वे तालुक्यातील पाहणी दरम्यान दिले.

जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या विविध भागातील पूरपरिस्थितीची पाहणी श्रीमती ठाकूर यांनी केली. माजी आमदार वीरेंद्र जगताप,  उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, नांदगाव खंडेश्वरचे  तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान आदी उपस्थित होते.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा गावातील पाझर तलावाचे पाणी परिसरातील 32 घरांमध्ये शिरले. त्याचप्रमाणे धवळसरीच्या 5 आणि टीमटाळा येथील 3 घरांचे पावसामुळे नुकसान झाले. नुकसनाग्रस्तांना सानुग्रह अनुदानाची रक्कम तात्काळ प्रदान करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

बेबळा नदीला आलेल्या पुरामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुमारे 5 हजार 595 हेक्टर क्षेत्रात शेतामध्ये पाणी शिरले, असा प्राथमिक अहवाल आहे. पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले असल्याची माहिती पुरुषोत्तम भुसारी यांनी माहिती दिली.

शिवणी रसुलापूर मार्गावरील बेंबळा व साखळी नदीच्या पुलावरून पाणी गेल्यामुळे परिसरातील शेतीचे नुकसान झाले. 92 हेक्टर शेतजमीन खरडून निघाली आहे. याबाबतचे तत्काळ  पंचनामे करून तसा अहवाल सादर करण्याबाबतचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले. बेंबळा नदीच्या पुरामुळे शेलू नटवा येथील 40 हेक्टर वरील बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी संबंधितांना दिले.

चांदुर रेल्वे तालुक्यातील खोलाड  नदीची पावसामुळे  पाण्याची पातळी वाढल्यामुळे तालुक्यातील 180 घरांची अंशतः पडझड झाली असून 4 घरे पूर्णपणे पडली आहे. याबाबत पंचनामा करण्याची प्रक्रिया तत्परतेने व गतीने करण्यात यावी असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी संबंधितांना दिले. चांदुर रेल्वे तालुक्यातील16 गावातील अंदाजे 350 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले असून 20 हेक्टर जमीन खरडलली आहे.अशी माहिती तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी दिली.पंचायत समिती सभापती सरिता देशमुख, पालसखेड सरपंच आरती पारधी, उपसरपंच अमोल अडसड आदी उपस्थित होते.

कवठा कडू येथील पुलाची उंची वाढविणे, भिलटेक येथे नालाड नाल्यापाशी संरक्षण भिंत उभारण्यात यावी असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले. पळसखेड, कवठा कडू, दिघी या गावातील काही भागांची पाहणी करताना पूरपरिस्थितीत संरक्षक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

0000000

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी 16 जणांचे वाचविले प्राण

 

आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी 16 जणांचे वाचविले प्राण,

100 व्यक्तिंना सुरक्षित स्थळी हलविले

जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली माहिती

 

अमरावती, दि.9: जिल्‍हयात पाऊस व पूरस्थितीमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या 16 व्यक्तिंना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी तातडीने पोहोचून सुखरुप बाहेर काढले, तसेच बडनेरा येथील 100 व्यक्तिंना सुरक्षित स्थळी हलविले.  

शहरातील बडनेरा व इतर भागात पावसाचे पाणी शिरले असता, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी मोजा बडनेरा येथे पावसाच्या पाण्यात अडकलेल्या 100 व्यक्तींना सुखरुप बाहेर काढले. बडनेरा येथील झरी मंदीरात या सर्वांना स्थलांतरीत करण्यात आले. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती कक्षाने आज दिली.

तिवसा तालुक्यातील मोजा भिवापूर येथील तलावात 6 युवक अडकले होते. या 6 युवकांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या चमुने बाहेर काढले. मोजा शिवणगाव येथे नदीला पुर आल्यामुळे तेथील 30 लोक शिवणगाव येथे जाऊ शकले नाही, त्याकारणाने प्रशासनाने त्यांची फत्तेपुर येथील समाज मंदीरात राहण्याची व्यवस्था केली. तिवसा तालुक्यातील कोंडण्यपूर येथील वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे कुऱ्हा ते आर्वी या पुलावरुन पाणी जात असल्यामुळे या मार्गावरील वाहतुक सध्या बंद करण्यात आली आहे.

भातकुली तालुक्यातील इब्राहिमपुर, बहादरपुर, दाढी, पेढी या गावांतील नाला रस्त्यावरुन वाहत असल्याने यादरम्यान गावाशी संपर्क तुटला होता. बहादरपुर येथे जाण्यासाठी निघालेल्या 9 नागरिकांना पुलावरुन पाणी वाहत असल्याने अलिकडच्या खरबी या गावातील जिल्हा परिषद परिसरात निवारा देण्यात आला. आता तेथील परिस्थिती सामान्य झाली असल्याची माहीती आहे.

चांदूर रेल्वे तालुक्यातील चांदूर-राजुरा रस्त्यावरुन दोन नाल्याच्या प्रवाहामध्ये 8 इसम अडकले होते व  येथील त्रिवेणी संगम एकपाला मंदीरात 3 अडकलेल्या व्यक्तींना आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले. अमरावती तालुक्यातील रोहणखेडा, पर्वतापुर, शेवती  या गावाचा पावसामुळे संपर्क तुटला होता. तिवसा येथील मोजा ठाणाठुणी गावातील काही घरांमध्ये पाणी शिरले आणि येथील शिवणगांवच्या सुर्यगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटला होता. परंतु आता तेथील परिस्थिती सामान्य झालेली आहे. मोजा जहागीरपुर येथील काही घरांमध्ये पाणी शिरले त्याबाबत पंचनामे सुरु आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी दिली आहे.

00000

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

विभागीय आयुक्त कार्यालयात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

 

                                                          विभागीय आयुक्त कार्यालयात

राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

 

अमरावती, दि. 7:- राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त पियुषसिंह यांनी  आज राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजय पवार, उपायुक्त (पुनर्वसन) गजेंद्र बावणे, तहसिलदार वैशाली पाथरे, नाझर पेठे यांनीही  राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस‍ अभिवादन केले. विभागीय आयुक्त कार्यालयातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

00000

 

गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

 




जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

अमरावती, दि. 2 : जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार घडलेला गुन्हा आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आज आढावा घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.

            जुलै महिन्यात शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येकी दोन प्रकरणे घडली. एप्रिल ते जुलैअखेर शहरी हद्दीत 12 तर ग्रामीण हद्दीत 19 अशी 31 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. या प्रकरणांमधे शहरी व ग्रामीण हद्दीतील  अत्याचारग्रस्त व्यक्तींना अर्थसहाय करण्यासाठी 21 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी दिली. अर्थसहायचा प्रलंबित निधी प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, एप्रिल महिन्यातील 15 व मार्च महिन्यापूर्वीची 27 अशी जुलैअखेरपर्यंतची एकूण 42 प्रकरणे पोलिस तपास करीत आहेत. याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे यांनी दिले.

या बैठकीला समाज कल्याण निरिक्षक भरत राऊत,  ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाचे तपन कोल्हे, पोलिस उपअधीक्षक कार्यालयाचे विनोद चिखलकर, पोलिस व इतर विभागातील अधिकारी आदी उपस्थित होते.

000000

 

बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

राजुरा लघु पाटबंधारे प्रकल्पास 193 कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यता

 राजुरा लघु पाटबंधारे प्रकल्पास

193 कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यता

*जिल्ह्यातील सहा गावांतील एक हजार हेक्टर सिंचन

अमरावती, दि. 1 : चांदूरबाजार तालुक्यातील राजुरा लघु प्रकल्पास 193 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाद्वारे 5.989 दलघमी इतका पाणीसाठा होणार असून जिल्ह्यातील सहा गावातील एक हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होऊ शकणार आहे. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नाने सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

राजुरा लघु पाटंबधारे योजनेंतर्गत राजुरा नाल्यावर प्रस्तावित आहे. खारपणा पट्ट्यातील योजना आहे. राजुरा बृहत लघु प्रकल्पामध्ये बेलोरा गावाजवळ काशी नदीवर संधानकातील वळण बंधारा बांधून त्यातून पुरवठा कालव्याद्वारे राजुरा नाल्यावर प्रस्तावित राजुरा धरणात पाणी आणण्यात येणार आहे. या धरणापासून उजव्या कालव्याद्वारे सिंचन करण्याचे या प्रकल्पाचे नियोजन आहे. सदर प्रकल्पाचा उपयुक्त उपलब्ध पाणीसाठा 5.496 दलघमी राहणार आहे.

या योजनेस विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने 44 कोटी 79 लाख रुपये इतक्या रकमेस मुळ प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. प्रकल्पाची सन 2017-18 च्या दरसूचीवर आधारीत 193 कोटी 81 लाख रुपये किंमतीच्या प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावास राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने सहमती दिली आहे. तसेच उप समितीच्या निर्णयानुसार समितीने हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यास मंडळाची मान्यता दिली आहे.

प्रकल्पाच्या किंमतीत झालेली वाढ ही दरसूची मध्ये झालेली वाढ, जास्त दराची निविदा, भूसंपादनातील वाढ, संकल्पचित्रातील बदल, अपुऱ्या सर्वेक्षणामुळे, इतर कारणांमुळे आणि अनुषंगिक खर्चांमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे खास बाब म्हणून या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.

प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यानंतर प्रकल्पास आवश्यक असलेल्या 359.05 हेक्टरपैकी 58.84 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. प्रकल्पास निधी उपलब्ध झाल्यानंतर महामंडळाने उर्वरित भूसंपादनासाठी निश्चित कालावधी ठरवून त्या विहित मुदतीत उर्वरित भूसंपादन पूर्ण करण्याची प्रक्रिया प्राथम्याने पूर्ण करावी लागणार आहे.

सदर प्रकल्पासाठी कोणत्याही प्रयोजनार्थ मंजूर प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेबाहेर जाऊन, निधी वितरण अथवा अतिरिक्त खर्च करता येणार नाही. या संदर्भात जलसंपदा विभागाने प्रचलित शासन निर्णय, नियम, मार्गदर्शक तत्वे, वित्तीय अधिकार मर्यादा, विहित केलेली निविदा कार्यपद्धती यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सदर प्रकल्पावर लाभधारकांची पाणीवापर संस्था स्थापन करण्यात येणार आहे.

00000