मुलांना
शिकवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणा
-
आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
बडनेरा येथे मुलींच्या
वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन
अमरावती, दि. 17 : आदिवासी, पारधी
मुला-मुलींसाठी चांगल्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी, यासाठी शासन सर्वतोपरी
प्रयत्न करीत आहे. यासाठी समाज बांधवानीही आपल्या मुलांना शाळेत शिकवून समाजाच्या
मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ.
विजयकुमार गावित यांनी आज बडनेरा येथे केले.
सार्वजनिक बांधकाम आदिवासी
मंडळ, नागपूर आणि अमरावती तसेच सार्वजनिक बांधकाम आदिवासी उपविभाग, धारणी यांच्या
संयुक्त विद्यमाने बडनेरा येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेजवळील मुलींच्या
वसतिगृहाचे भूमिपूजन आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते करण्यात आले,
त्यावेळी ते बोलत होते. आमदार रवि राणा, आमदार प्रताप अडसड, धारणी एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सावनकुमार,
अमरावती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखडे, सामाजिक बांधकाम मंडळाचे
कार्यकारी अभियंता गणेश रंभाड, अधीक्षक अभियंता उज्ज्वल डाबे, उपविभागीय अभियंता
श्रीकांत आवतकर, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेचे मुख्यध्यापक आर. जी काळे आदी
मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आदिवासी,
पारधी समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी शासन विविध योजना राबवित
आहे, असे सांगून आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणाले की, आदिवासी मुलींना
चांगल्या शिक्षणासह निवाऱ्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी येथे वसतिगृह
उभारण्यात येत आहे. येत्या सहा महिन्यामध्ये मुलांच्याही वसतिगृहाचे भूमिपूजन
करण्यात येईल व लवकरच मुलांसाठीही वसतिगृह उभारण्यात येईल. आदिवासी, पारधी समाज
बांधवांनी मुलांना शाळेत पाठवावे. मुलांचे
शिक्षण अर्ध्यावर सोडू नका. तुम्ही मुलांना शाळेत पाठविले तरच त्यांना शासकीय
योजनांचा लाभ घेता येईल. शासनामार्फत मुलांना शालेय शिक्षणासोबत व्यावसायिक
शिक्षणाचे प्रशिक्षण देवू. जेणेकरुन त्यांना स्वयंरोजगार निर्माण करता येईल. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर
ॲकेडमी’ची स्थापना करुन त्यात स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच
खेळात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांनाही क्रीडा प्रकारात मार्गदर्शन करण्यात
येईल.
येत्या दोन वर्षांत सर्वांना घरे
मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी गरजूंनी घरासाठी प्रशासनाकडे अर्ज
सादर करावा. एकही आदिवासी बांधव घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही. बचत गटाच्या
महिलांना शासनामार्फत प्रोत्साहन देण्यात येवून महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत
आहे. यासाठी बचत गटांच्या वस्तूंच्या निर्मितीद्वारे महिलांनी आर्थिक
स्वावलंबित्त्वासाठी प्रयत्न करावे. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची गळती
रोखण्यासाठी शिक्षक व पालकांनी पुढाकार घ्यावा. मुलांना शिक्षणाविषयी गोडी निर्माण
व्हावी, यासाठी त्यांना इयत्ता पहिली व दुसरीमध्ये त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण
देण्यात येईल. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचा गुणवत्तात्मक विकास व्हावा, यासाठी
प्रयत्न करावा. यासाठी विशेष प्रयत्न केलेल्या शिक्षकांना गौरविण्यात येईल. आश्रम
शाळेजवळील रस्त्याचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही डॉ. गावित यावेळी
म्हणाले.
आमदार रवि राणा म्हणाले,
शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेच्या परिसरात मुलींच्या वसतिगृहाची नितांत आवशकता
होती. शिक्षणाची व निवाऱ्याची सोय एकाच ठिकाणी असल्यामुळे आता मुलींना
शिक्षणांपासून वंचित रहावे लागणार नाही. येथे 144 विद्यार्थींनीच्या राहण्याची
व्यवस्था करण्यात येणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी 9 कोटी 83 लक्ष 42 हजार
शासनाने मंजूर केले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी आदिवासी, पारधी समाजातील
विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत वसतिगृहाची निर्मिती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले
.
आदिवासी लाभार्थी व बचतगट यांना
शासनांच्या विविध योजनाच्या लाभ देण्यासाठी आदेश व धनादेशाचे यावेळी वाटप करण्यात
आले. यामध्ये लाभार्थ्यांना व्हिडिओ शुटिंग कॅमेरा, पीठ गिरणी, मंडप साहित्य,
विहीर खोद कामासाठी क्रेन मशीन खरेदी करण्याकरिता अर्थसाह्य करण्यासाठी धनादेशाचे
वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक
आर. जी. काळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्राथमिक शिक्षक वंदना कुलट व आशिष
जवंजाळ यांनी तर आभार प्राथमिक शिक्षक अकुंश गाडगे यांनी मानले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा