विशेष लेख दि.
१९ ऑक्टोबर २०२३
कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र
राज्यातील प्रत्येक नोकरी इच्छूक उमेदवाराला रोजगार
मिळवून देणे, युवक-युवती, महिला, विद्यार्थी यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, नवनवीन
संकल्पनांना जन्म देणाऱ्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन आणि चालना देणे, उद्योगांमधील
बदलत्या तंत्रज्ञानास अनुसरून आयटीआयमधील अभ्यासक्रमांचे तसेच आयटीआयचे आधुनिकीकरण
करणे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
नेतृत्वाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाने पुढाकार घेतला
आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग :
कुशल महाराष्ट्र आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र
घडविण्याच्या उद्देशाने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी,
युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यात जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व 288
मतदारसंघात 6 मे ते 6 जून 2023 या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर
शिबीरांचे आयोजन करण्यात आले. या करिअर शिबीरांच्या माध्यमातून विद्यार्थी,
युवक-युवतींना विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन देण्यात आले याचा
मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे.
विभागामार्फत त्याचबरोबर राज्यात सध्या मोठ्या
प्रमाणात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे.
ठिकठिकाणी हजारो विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी होत असून नोकरीसाठी विविध
कंपन्यांकडे मुलाखती देत आहेत. याशिवाय महास्वयंम वेबपोर्टल आणि विभागाच्या इतर
विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योगांमध्ये एप्रिल
2023 मध्ये 13 हजार 082 बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला.विभागाने https://rojgar. mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. नोकरीइच्छुक
उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागाकडे तसेच महास्वयम
वेबपोर्टलवर आतापर्यंत 1 लाख 4 हजार 087 इतक्या सार्वजनिक व खासगी उद्योजकांनी
नोंदणी केली आहे.
तर जानेवारी ते सप्टेंबर 2023 पर्यंत 290 ऑनलाईन आणि ऑफलाईन विविध मेळावे घेण्यात आले असून यामध्ये 1 लाख 40 हजार 110 युवक
आणि युवतींना रोजगार प्राप्त झाला आहे. आतापर्यंत विभागीय रोजगार मेळाव्यासाठी 1
लाख रुपये, तर जिल्हास्तरावरील
रोजगार मेळाव्यासाठी 40 ते 60 हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा होती. सन
2023 पासून मेळावे अधिक प्रभावीरित्या राबविण्यासाठी 5 लाख रूपयांची मर्यादा
वाढविण्यात आली आहे.
राज्यातील युवक-युवतींना रोजगाराची उपलब्धता व्हावी, यासाठी विभागामार्फत विविध 1 हजार 175 नामांकित उद्योजक, कॉर्पोरेट संस्था, औद्योगिक संघटना, प्लेसमेंट एजन्सिज यांच्यासमवेत
सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या करारामार्फत राज्यातील 6 लाख 86 लाख युवक, युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध
होणार आहे.
जागतिक बँकेच्या तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यातून
विभागात विविध प्रकल्प, उपक्रम राबवण्याचे
प्रस्तावित आहे. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 1 मॉडेल आयटीआय
आणि राज्यात मुलींसाठी 17 मॉडेल आयटीआय असे एकूण 53 मॉडेल आयटीआय निर्माण करण्यात
येणार आहेत. त्याचबरोबर सर्व सुविधांनी युक्त असे जागतिक स्किल सेंटर उभारण्यात
येणार आहे. एकात्मिक कौशल्य भवन उभारण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. व्यवसाय
शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून ‘सुचवा तुमच्या
आवडीचे’ कौशल्य अभ्यासक्रम’ ही राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात
आली.
कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी
राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. या
विद्यापीठात नवनवीन अभ्यासक्रम सुरु होत आहेत. विद्यापीठासाठी पनवेल येथे इमारत
उभारण्यात येणार असून नुकतेच त्याचे भूमीपूजन करण्यात आले आहे. विद्यापीठ आणि
रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आरएआय) यांच्या दरम्यान बॅचलर ऑफ बिझनेस
अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) या अभ्यासक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे बिझनेस आणि रिटेलचे आवश्यक ज्ञान आणि उद्योगाचा
अनुभव मिळेल.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता आणि नाविन्यता
विभाग कुशल कर्मचा-यांच्या वाढत्या जागतिक मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि आयटीआय
च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी
आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
आय.टी.आय.च्या विद्यार्थ्यांना परदेशात देखील नोक-या मिळत आहेत.यावर्षी राज्यातील
आय.टी.आय.च्या विद्यार्थ्यांना जपानमध्ये 3 आणि जर्मनीमध्ये 55 अशा एकूण 58 नोकऱ्या परदेशात मिळाल्या आहेत. परदेशात रोजगार प्राप्त
करण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सुविधा
केंद्रा मार्फत लाभ होणार
आहे.राज्यात पाच ठिकाणी हे सुविधा केंद्र
सुरू करण्यात येणार आहे.
युवकांमधील नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्स, युनिकॉर्न्स यांना चालना देण्यात
येत आहे. महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपिटल आहे. देशात नव्याने सुरू झालेल्या
42 यूनिकॉर्नपैकी 11 युनिकॉर्न महाराष्ट्रातील आहेत. स्टार्टअपविषयक
कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत राज्याने मोठी आघाडी घेतली आहे. भारत सरकारच्या उद्योग
आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे (DPIIT) मान्यताप्राप्त असलेल्या देशातील एकूण 88 हजार 136 स्टार्टअपपैकी
सर्वाधिक 16 हजार 250 स्टार्टअप (18 टक्के) महाराष्ट्रातील आहेत.
राज्याचा सन 2023-24 चा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर
करण्यात आला.स्टार्टअप्स सुरू करण्याकरिता आवश्यक प्रशिक्षणासाठी कळंबोली, नवी मुंबई येथे निवासी प्रशिक्षण
व संशोधन संस्था उभारण्यात येणार आहे.गावांतून शहरांकडे होणारे स्थलांतर थांबावे
यासाठी स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगाराकरिता 511 ग्रामपंचायतींमध्ये
कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य
यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात 75 व्हर्चुअल क्लासरूमचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन झाले संपूर्ण राज्यातील
आय.टी.आय.मध्ये अशा प्रकारच्या व्हर्चुअल क्लासरूम भविष्यात असतील. या व्हर्चुअल
क्लासरूममध्ये इंटरॲक्टीव्ह पॅनल,संगणक सेवा, उत्तम बैठक व्यवस्था असणार आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या
संकल्पनेतील ‘स्कील इंडिया’ व ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमातंर्गत
राज्यातील 419 या सर्व
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार
आहे.राज्यातील 419 शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे बळकटीकरण व 547 खाजगी
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सहकार्य करून राज्यात युवक व युवतींना रोजगाराभिमुख
कौशल्य विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे.
लहान मुलांमध्ये कौशल्य शिक्षणाची आवड निर्माण
व्हावी म्हणून शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून मुंबईतील 200 शाळांमध्ये प्रशिक्षणाची
सुरुवात करण्यात येईल. कौशल्यवर्धनाद्वारे युवकांना रोजगारक्षम बनविण्याकरिता
पुढील तीन वर्षात 2 हजार 307 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करून राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची
दर्जावाढ करण्यात येईल.
अर्थसंकल्पात चतुर्थ अमृत ‘रोजगार निर्मिती : सक्षम, कुशल-रोजगारक्षम युवा’ यासाठी कार्यक्रम
खर्चाकरिता एकूण 11 हजार 658 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करण्यात येत असल्याचे
जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील युवक, शेतकरी, महिला अशा सर्व
घटकांना सामावून घेत त्यांना कौशल्याबरोबरच शाश्वत रोजगार मिळण्याच्या अनुषंगाने
राज्य शासन आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग
कटिबद्ध आहे.
शब्दांकन
संध्या गरवारे - खंडारे,
सहायक संचालक,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा