रविवार, ३ ऑगस्ट, २०२५
सक्षम मानव संसाधनातून विकसित भारताचे स्वप्न साकारणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ; जिल्हा कोषागार कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहाचे उद्घाटन
सक्षम मानव संसाधनातून विकसित भारताचे स्वप्न साकारणार
-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
• महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संघटनेचा मेळावा संपन्न
• गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
• विधवा, परितक्त्या महिलांना शिलाई मशीनचे वितरण
• जिल्हा कोषागार कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहाचे उद्घाटन
अमरावती, दि. 03 : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित मानव संसाधनाची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी असून याव्दारे विकसित भारत-2047 स्वप्न साकारले जाणार असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संघटनेव्दारे मातोश्री विमलाताई देशमुख समागृह येथे समाज मेळावा, समाजभूषण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच महिलांना शिलाई मशीनचे वितरण आज करण्यात आले. यावेळी आमदार प्रताप अडसड, रामदास तडस, नवनीत राणा, संजय हिंगासपूरे, शंकरकाका हिंगासपूरे, भुषण कर्डीले, संध्या सव्वालाखे, डॉ. मोनीका मांडवे, शिक्षण उपसंचालक निलीमा टाके तसेच तैलिक समाज संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, रोजगार निर्मिती प्रक्रियेला प्रोत्साहन देणे, उत्कृष्ट काम केलेल्यांचा गौरव करणे तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे अशा कार्यक्रमामुळे समाजात चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते. अशा स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करून समाज बांधवांना प्रोत्साहन द्यावे. संघटीत समाज हा देशाच्या ऐक्याचा पाया रचतो. त्यामुळे समाजाने संघटीत होऊन समाजाच्या सर्वांगिण उध्दारासाठी प्रयत्न करावे. जगातील जवळपास 110 देशातील नागरिकांचे आयुर्मान हे 40 ते 45 या वयोगटातील असून ते देश आज वृद्धत्वाकडे झुकलेले आहेत. अन्य देशांकडे काम करण्यासाठी पुरेशी सक्षम युवा पिढी नाही. त्यांना सर्वच क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या मानवसंसाधनाची आवश्यकता आहे. त्यांची ही गरज पूर्ण करण्याची क्षमता आपल्या देशातील युवा पिढीकडे आहे. यामुळे आपल्याकडील युवा पिढीला जगातील सर्वच क्षेत्रात रोजगाराची अनेक नवीन दालने खुली आहेत. यासाठी नवतंत्रज्ञानाचे शिक्षण घेतलेला उच्चशिक्षा विभूषित व संस्कारी युवावर्ग जगाला पुरवण्याची जबाबदारी भारत देश पूर्ण करु शकतो. सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी आहे. आजची युवा पिढी व्यसनापासून दूर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'विकसित भारत 2047' घडविण्यासाठी आतापासून नियोजन सुरू केले आहे. विकसित भारताचा संकल्प हा समाजाच्या विकासाचा संकल्प आहे. विकसित भारताला लागणारे उच्च विभूषित मानवसंसाधन निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षीत समाजाची निर्मिती करण्याची गरज आहे. शिक्षणानेच समाज संस्कारक्षम होऊन सर्व क्षेत्रात प्रगती साध्य करु शकतो. युवा पिढी सर्वगुण संपन्न होण्यासाठी राज्यात आयआयएम, आयआयटी, एनआयटी यासारख्या नामांकीत संस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. समाजातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनींनी याठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी परिश्रम घ्यावे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहचणे आणि या विकासगंगेत सर्वांचा समावेश असणे हे विकसित भारताचे ध्येय आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते तैलिक समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावी, बारावीत गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थींनींचा शालेय साहित्य वितरण करुन गौरव करण्यात आला. एमसीए अभ्यासक्रमात सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या समिक्षा साखरकर यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील विधवा, परितक्त्या महिलांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.
जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन देणार- पालकमंत्री
जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. जिल्हा कोषागार कार्यालयाच्या परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या सर्व सुविधायुक्त ‘जिजाऊ सभागृहा’चे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते आज करण्यात आले.
जिल्हा नियोजन योजनेतून 68 लाख खर्च करुन जिजाऊ सभागृह बांधण्यात आले आहे. या सभागृहात लेखा व कोषागार विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या नवीन प्रणालीचे प्रशिक्षण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी त्रैमासिक सभा, आरोग्य शिबीर, योग- प्राणायम शिबीरे घेण्यात येतील.
यावेळी आमदार संजय खोडके, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, लेखा व कोषागारे सह संचालक प्रिया तेलकुंटे, वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार, सहाय्यक संचालक (निवृत्ती वेतन) अमोल ईखे यांच्यासह लेखा व कोषागारे विभागाचे अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा