बुधवार, १४ जून, २०१७

कृषी विभागाने योजनांतून
शेतीची उत्पादकता वाढविण्यावर भर द्यावा
                                 -पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील

* आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना पालकमंत्र्यांच्या हस्ते
बि-बियाणे व रासायनिक खतांचे वाटप

       अमरावती, दि. 13 : आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी या उद्देशाने राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकरी हितार्थ योजना राबवून शेतीतील उत्पादकता वाढेल या दृष्टीने कामे करावी, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज केले.
            जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मंत्री महोदयांच्या हस्ते बि-बियाणे व रासायनिक खतांचे वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, भाजपचे पदाधिकारी दिनेश सूर्यवंशी, तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री महोदयांच्या हस्ते त्यांच्या स्वनिधीतून व कृषी विभागाच्या सहाय्याने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना सोयाबीन बियाणे व डीएपी जैविक खतांच्या चार-चार बॅगचे वाटप करण्यात आले.
            श्री. पोटे- पाटील म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा आधार होणार असून आर्थिक स्थैर्य त्यांना प्राप्त होणार आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी कर्जमाफीच्या निर्णयातून पाच एकर जमीनीचा निकष वगळण्यात आला आहे.     
ते पुढे म्हणाले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने कृषी क्षेत्राशी निगडीत प्रभावी उपाययोजना आखल्या आहेत. सुलभ पीक-कर्ज वितरणासह प्रभावी सिंचन सुविधाही शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आरोग्य, सिंचन, रोजगार या सुविधेसाठी शासनाव्दारे नवीन संकल्पना राबविण्यात येत आहेत. पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत गोरगरीब शेतकरी कुटुंबांना रुग्णालयात उपचार घेत असताना रामरोटीचे वाटप करण्यात येत आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी याकरिता सुमारे 12 हजार विद्यार्थी दत्तक घेण्यात आले असून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचा पुस्तकांचा खर्च भागविता यावा यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने दरदिवशी पाच रुपये प्रमाणे वर्षाला 1800 रुपये जमा करावे, असे भावनिक आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केले.
प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेताच्या बांधावर चिंच, फणस, निंबू, सीताफळ यासारखी फळझाडे लावावी. यामुळे चार एकरमध्ये 180 झाडांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी एक ते चार लाखाचे उत्पन्न मिळू शकते, महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्यासाठी कृषी विभागाने उत्पादनवाढीच्या योजना राबवाव्यात, असेही त्यांना सांगितले.
            प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. खर्चान यांनी योजनांची माहिती दिली.  


000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा