बुधवार, २२ मार्च, २०१७

उन्नत भारत अभियान : ग्रामीण व शहरी भागातील
विकासात महत्वाची भुमिका
                        -जिल्हाधिकारी किरण गित्ते

* www.visionamravati.in संकेतस्थळाचे उद्घाटन
* स्मार्ट अमरावती, डिजीटल अमरावती साठी 2 हजार कोटी रुपयांचा निधी


        अमरावती, दि. 22 (विमाका) : ग्रामीण व शहरी भागातील मुलभूत सोयी सुविधांचा विकास साधावयाचा असल्यास तंत्रज्ञानावर आधारित विकास हा महत्वपूर्ण ठरतो. यासाठी उन्नत भारत अभियानाच्या धर्तीवर उन्नत महाराष्ट्र अभियान जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासात महत्वाची भूमिका निभावणार, असा विश्वास जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी व्यक्त केला.
            येथील टॉऊन हॉल येथे अमरावती महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिजन अमरावती 2017 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उपमहापौर संध्याताई टिकले, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. शिंगाडे, राज्य प्रकल्प युनिटच्या सल्लागार डॉ. अर्चना बारब्दे, सभापती सुनील काळे व कृषी व सामाजिक कवी प्रा. इंद्रजित भालेराव आदी उपस्थित होते.
            प्रारंभी दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते www.visionamravati.in या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. सदर संकेतस्थळाचा निर्माण पोटे कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या शुभम कापसे व तेजश्री कापसे या विद्यार्थ्यांनी केला आहे. या संकेत स्थळावर उन्नत भारत अभियानाविषयी संपूर्ण माहिती व त्याअनुषंगाने करावयाचे विकासकामांची प्रक्रिया नमूद केलेली आहे.
            जिल्हाधिकारी म्हणाले, ग्रामीण व शहरी भागात मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन सर्वांगिण विकास करण्यासाठी मागील वर्षापासून केंद्र सरकारव्दारे उन्नत भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्यातील गावांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासनाव्दारे उन्नत महाराष्ट्र अभियान ही संकल्पना राबविण्यात येत आहे. गावांचा विकास करण्यासाठी नुसते रस्ते किंवा संकुलांचे बांधकाम करुन चालणार नाही तर विज, पाणी, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, अन्नधान्याची उपलब्धता यासारख्या मुलभूत गरजा असलेल्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग करुन तशाप्रकारचे डिजीटल अप्लीकेशन किंवा सॉफ्टवेअर विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. वाफेचे इंजीनाचा शोध, विजेची निर्मिती आणि संगणकाच तंत्रज्ञानाचा शोध मानवाच्या उत्क्रांतीमध्ये फार महत्वाचे घटक ठरले आहेत. या अशा तंत्रज्ञानावर आधारित डिजीटल तंत्रज्ञानाचा उपयोगत करुनच ग्रामीण व शहराच्या विकासातील दरी कमी करता येऊ शकते.
            राज्यातील पहिले डिजीटल गाव म्हणून जिल्हयातील हरिसाल गावाची ओळख निर्माण झाली आहे. डिजीटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने टेलीमेडीसीनचा उपयोग करुन गावाच्या परिसरातील रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. कौशल्य विकास अंतर्गत कौशल्यपूर्ण प्रशिक्षणाचा लाभ युवकांना देण्यात येत आहे. राज्यातील दहा स्मार्ट शहरामध्ये अमरावती शहराचा समावेश झाला आहे. शहर डिजीटली स्मार्ट करण्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला उपस्थित अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अमरावती जिल्हा डिजीटली व स्मार्ट जिल्हा म्हणून उदयास आणण्यासाठी स्ट्रीट लाईट चालू बंद करणे, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ई –क्लासरुम , ई- लर्निंग, गोर गरीबांच्या आरोग्याच्या सोयीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, (युमेक्स बेस्ड ) सुर्यप्रकाशावर आधारित इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, झाडांच्या जैविक गरजा ओळखुन पाणीपुरवठा, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम ई लॉयब्ररी अशा प्रकारचे तांत्रिक प्रकल्प तयार करावे. अमरावती जिल्हाच्या सर्वांगिण विकासाठी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प तयार करण्यासाठी प्रवृत्त होऊन उन्नत भारत अभियान संकल्पना यशस्वी करुन दाखवावी असे आवाहन श्री गित्ते यांनी केले.
            मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार म्हणाले, उन्नत महाराष्ट्र अभियान अंतर्गत अमरावती शहर डिजीटल व स्मार्ट करण्यासाठी शहरातील पाणी विज, रस्ते निर्माण, परिसर स्वच्छता, आरोग्य, नाल्यांची बांधकामे आदी मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यावर मनपा प्रशासनाव्दारे भर देण्यात येत आहे. नगरोत्थान व अमृत योजनांची प्रभावी अमंलबजावणी करुन नगरविकास, पाणीपुरवठा, भुयारी गटार बांधकाम यासारख्या विकासकामांसाठी भरीव निधी प्राप्त झाला आहे. शहरातील प्रत्येक गुन्हेगारी प्रवृत्तीवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, पार्कींगची सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईटस, आरोग्य सुविधासाठी मनपा प्रशासनाव्दारे विकासात्मक कामे करण्यात येणार आहे. आणि शहर स्वच्छ - सुंदर व डिजीटली स्मार्ट बनविण्यासाठी कटीबध्द राहणार आहे.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंत्रशिक्षण विभागाचे प्रा. पासेबंद यांनी केले. त्यांनी उन्नत भारत अभियान व उन्नत महाराष्ट्र अभियान या अभियानात तंत्रशिक्षण विभागाची भूमिका व उद्देश याविषयी माहिती दिली. कार्यक्रमात उपमहापौर सध्यांताई टिकले, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, सभापती सुनील काळे, डॉ. अर्चना बारब्दे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
            कार्यक्रमाचा समारोप कृषी व सामाजिक कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या कृषी व ग्रामीण जीवनावर आधारित    ‘ बाप ’व ‘ माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता’ या दोन बहारदार कविता सादर करुन झाली. यावेळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, मनपा पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.


**************


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा