‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रमात पाणीपुरवठा
मंत्र्यांचे निर्देश
शासकीय अभिलेख तातडीने संगणकीकृत करा
- बबनराव
लोणीकर
अमरावती, दि. 29 : संपूर्ण देशभरात स्वच्छता
अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय
कार्यालयातही स्वच्छता असणे अपरिहार्य आहे. त्यामुळे मोठी जागा व्यापणारे शासकीय
अभिलेख संगणकीकृत करावे व कार्यालयात सातत्यपूर्ण स्वच्छता निर्माण करावी, असे निर्देश
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज येथे दिले.
‘स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रमांतर्गत श्री. लोणीकर
यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद,
पोलीस आयुक्त कार्यालय व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात जाऊन
तेथील रेकॉर्डरुमची व परिसराची पाहणी केली व अधिकारी- कर्मचा-यांशी संवाद साधला. पालकमंत्री
प्रविण पोटे-पाटील, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता
ढोमणे, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, पोलीस
उपायुक्त चिन्मय पंडित व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ते
म्हणाले की, परिसरातील
स्वच्छतेसोबतच कार्यालयात अनेक वर्षांपासून जतन केलेले अभिलेख व दस्तावेज मोठी
जागा व्यापतात. त्यामुळे ते संगणकीकृत करुन कार्यालयांची स्वच्छता करावी.
श्री. लोणीकर पुढे म्हणाले की, सर्व शासकीय
कार्यालयांमध्ये जुने अभिलेख सुरक्षित ठेवणे आव्हानात्मक असते; पण तंत्रज्ञानाच्या
साह्याने हे काम सुलभ झाले आहे. विशिष्ट आज्ञावलींच्या मदतीने सर्व अभिलेख व
माहिती सुरक्षित ठेवता येते व त्यातून हवी ती माहिती तातडीने मिळणे शक्य होते.
त्यामुळे या अभिलेखांचे संगणकीकरण लवकरात लवकर शासकीय कार्यालयांची स्वच्छ, सुसज्ज करावीत. शासकीय कार्यालयांत जिल्ह्यातील नागरिकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे
स्वच्छता अभियानाचा प्रसार करताना आपले कार्यालयही स्वच्छ असावे, या जाणिवेतून सर्वांनी काम केले पाहिजे.
यावेळी
विविध कार्यालयांचे अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.
00000