शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

शेती व शेतकऱ्यांच्या समस्या प्राथमिकतेने सोडविणे आवश्यक
-         पालकमंत्री प्रविण पोटे

·        शोभा फडणवीस लिखीत धांडोळा शेतीचा पुस्तकाचे
पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन
अमरावती, दि. 15 : शेती आणि शेतकरी जगले तरच देश जगेल. सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रथम शेतीविषयक समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे. वर्तमानातून भविष्यात पाहतांना शेती व शेतकऱ्यांच्या हिताकडे प्राथमिकतेने पाहणे गरजेचे आहे. धांडोळा शेतीचा या पुस्तकाच्या माध्यमातून श्रीमती शोभा फडणवीस यांनी शेतीच्या समस्यांवर प्रभावी उपाय सूचविले आहेत. हा प्रयत्न शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त समस्या सोडवण्यात यशस्वी होईल, असा विश्वास पालकमंत्री प्रविण पोटे यांनी व्यक्त केला. श्रीमती शोभा फडणवीस लिखीत धांडोळा शेतीचा या पुस्तकाच्या विमोचन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. टाऊन हॉल येथे आयोजित कार्यक्रमात उपमहापौर संध्या टिकले, खासदार रामदास तडस, आमदार रमेश बुंदिले, ॲड. यशोमती ठाकूर, मनपा स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, वनस्पतीशास्त्रज्ञ केशव ठाकरे, मनपाचे झोन सभापती लविना हर्षे व सुरेखा लुंगारे, शिक्षण सभापती चेतन गावंडे, उपसभापती पद्मजा कौंडण्य उपस्थित होते.
प्रविण पोटे म्हणाले, राज्यात शेती व शेतकऱ्यांच्या असंख्य समस्यांनी उग्र रुप धारण केले आहे. त्याचे परिणाम शेतकरी बांधवांसह समाजातील सर्व घटक भोगत आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भविष्यातील शेती नियोजन व परिवर्तनाच्या दिशेने सूचविलेल्या उपाययोजनांचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल. सिंचन, कर्ज, हमी भाव, खत विषयक समस्या यावरील उपायांच्या प्रभावी अंमलबजावणीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देता येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
श्रीमती शोभा फडणवीस यांनी धांडोळा शेतीचा या पुस्तकाच्या विषयाबाबत पार्श्वभूमी सांगितली. शेतकरी बांधवांच्या समस्या, त्यांचे उध्वस्त होणारे कुटुंब, आत्महत्या या सोबतच शेतकरी ह्या स्थितीपर्यंत का पोहोचला यावरही चिंतन व उपाय करणे गरजेचे आहे. पंचवार्षिक योजना, शाश्वत शेतीचा विकास, सेंद्रिय खत वापरण्याबाबत मार्गदर्शन या सर्व बाबींवर पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे. शासन, प्रशासन व समाजाने या क्षेत्रातील त्रृटी दूर करण्याला प्राथमिकता द्यावी, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी केले. खासदार रामदास तडस व वनस्पतीशास्त्रज्ञ केशव ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन क्षिप्रा मानकर यांनी केले. कार्यक्रमाला महिला, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.         

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा