बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८

सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

अमरावती, दि.31: लोहपुरुष, देशाचे माजी उपप्रधानमंत्री, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उप आयुक्त (महसूल) गजेंद्र बावणे, उप आयुक्त (पुरवठा) रमेश मावसकर, उप आयुक्त (पुनवर्सन) प्रमोद देशमुख, श्री मोहिते यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त व जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी उपस्थितीतांना राष्ट्रीय एकता व अखंडतेची शपथ दिली.







मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी समारोप
राष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती
-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन
* श्री गुरुदेव मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन
* मोझरी विकासासाठी 58 कोटी निधी
अमरावती, दि. 30 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य अलौकिक आहे. महाराष्ट्र व देशात मोठा समुदाय त्यांच्या विचारांवर चालतो. राष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती आहे. राष्ट्रसंतांच्या विचारानेच राज्य सरकार मार्गक्रमण करीत आहे, असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी समारंभाच्या जाहीर कार्यक्रमात ग्रामगीता विचारपीठावरून व्यक्त केले. 
यावेळी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एन. सुब्बाराव, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदिले, आमदार मितेश भांगडिया, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, गुरुदेव मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, उपाध्यक्ष पुष्पाताई बोंडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, मी आज गुरुदेवांचा अनुयायी म्हणून आलो आहे, मुख्यमंत्री म्हणून नव्हे.या पुण्यभूमीतून राष्ट्रसंतांच्या विचाराची ऊर्जा निश्चितपणे प्राप्त होते. राष्ट्रसंतांचे विचार समाजपरिवर्तनाचे आणि समाजाला सुसंस्कारित करणारे आहेत. समाजपरिवर्तनाची ताकद त्यांच्या विचारात होती. त्यागी व संतांना वंदन करण्याची देशाची  परंपरा आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेने इथल्या माणसांना केवळ भाविक, श्रद्धावान बनवले नाही, तर त्यांच्यात संकटाचा सामना करण्याची वृत्ती पेरली. राष्ट्रसंतांनी समाजात विजिगिषू वृत्ती, शौर्यवृत्तीचे बीजारोपण केले. त्यातून ऊर्जावान समाज तयार झाला. स्त्री पुरुष समतेचा पुरस्कार व जातिभेदाला विरोध त्यांनी प्रखरपणे केला. देशावर संकट आले तेव्हा स्वत: पुढे येऊन कार्य केले.  इंग्रजांच्या काळात देशबांधवांवर अत्याचार होत असताना त्यांनी त्याविरोध प्रखर लढा देऊन समाजाला एकजूट केले.
राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून विश्वरूपी दर्शन दिले, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाची प्रेरणा ग्रामगीतेतून घेण्यात आली आहे. राष्ट्रसंतांनी ग्रामविकासाचा शाश्वत मंत्र ग्रामगीतेच्या माध्यमातून प्रत्येक राज्यकर्त्याला दिला. स्वराज्याला सुराज्यात परिवर्तित करायचे असतील, तर संस्कारित समाजच हे करू शकतो. तशी पिढी राष्ट्रसंतांनी घडवली. आमचे एक हजार गावांसाठीचे महाराष्ट्र सामाजिक ग्रामपरिवर्तन अभियान ही देखील ग्रामगीतेचीच शिकवण आहे.  या अभियानाच्या यशस्वितेसाठी प्रेरणा घ्यायला मी इथे आलो आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रसंतांनी विश्वात्मक विचार मांडला. त्यातून त्यांनी शेवटच्या माणसाचा देखील विचार केला. आनंद हा पैश्यांनी विकत घेता येत नाही. मनाच्या व वागणूकीच्या श्रीमंतीची शिकवण त्यांनी दिली. त्यांच्या भजनात, शब्दांत समाज उभा करण्याची प्रेरणा आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते गुरुदेव सेवा मंडळाच्या श्री गुरुदेव मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.
मोझरी विकासासाठी निधीची कमतरता नाही
मोझरी विकास आराखड्यात 58 कोटी रुपये निधी मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केला. या निधीतून मोझरी येथे अनेक प्रकल्प उभे राहणार आहेत. त्याचप्रमाणे, इतर आवश्यक निधीसाठी तत्काळ प्रस्ताव द्यावा, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मोझरीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. यावेळी अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाचे उपाध्यक्ष पुष्पाताई बोंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रकाश महाराज वाघ यांनी केली. उपस्थितांचे आभार गुरुदेव सेवा मंडळाच्या जनार्दनपंत बोथे यांनी मानले. कार्यक्रमाला राज्यातून आलेले गुरुदेव सेवा मंडळाचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाधीस्थळाचे दर्शन
प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.








दादासाहेब गवई यांचे स्मारक ज्ञानकेंद्र व्हावे
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
*मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी
*स्मारकासाठी 20.03 कोटी मंजूर
अमरावती, दि.30 : दादासाहेब गवई हे ज्ञानी होते आणि त्यांना सर्वसामान्य माणसाच्या व्यथा-वेदनांची जाणीव होती. ज्ञान आणि जाणीवा यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात झाला होता. त्यांचे स्मारक ज्ञानकेंद्र म्हणून ओळखले जावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ परिसारात आज रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई स्मारक संकुलाचा पायाभरणी समारंभ पार पडला. यावेळी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार डॉ. सुनील देशमुख, खासदार आनंदराव अडसूळ, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भुषण गवई, कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, आमदार अरुण अडसड, डॉ. अनिल बोंडे, रवि राणा, अॅड. यशोमती ठाकूर, प्रभूदास भिलावेकर, रमेश बुंदिले, विरेंद्र जगताप, महापौर संजय नरवणे, कमलताई गवई, डॉ. राजेंद्र गवई आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दादासाहेब गवईंनी आमदार-खासदार, सभापती, राज्यपाल म्हणून काम केले. ते ज्या पदावर गेले, त्या पदाचा सन्मान वाढविण्याचे कार्य त्यांनी केले. बिहारमध्ये राज्यपाल असताना त्यांनी प्रामुख्याने शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील प्रयोग राबविले. त्यांच्या या कार्याची आठवण आजही काढली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार उच्चशिक्षीत पिढी तयार होण्यासाठी त्यांनी नागपूर येथे महाविद्यालय सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच तेथे शैक्षणिक क्षेत्रात गुणात्मक वाढ झाली आहे. त्यामुळे आज गुणवंत विद्यार्थ्यांचा ओढा नागपुरातील आंबेडकर महाविद्यालयाकडे असतो. संस्थेच्या विकासासाठी त्यांनी कठोर निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणीही केली. त्यामुळे आज संस्थेचा नावलौकिक आहे.
शिक्षण क्षेत्रासोबतच त्यांनी सामाजिक क्षेत्रात कार्य केले. दिक्षाभूमीच्या उभारणीत त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वात दिक्षाभूमी उभी राहिली आहे. आज संसाधनांची उपलब्धता आहे. परंतू ज्या काळात संसाधने नव्हती, निधीची कमतरता होती, अशा कठिण काळात जगाला अभिमान वाटावे, असे स्मारक उभे राहिले आहे. जगभरातील पर्यटक नागपूरातील दिक्षाभूमीला भेट देतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचा दर्जा स्मारकाला मिळाला आहे.
दादासाहेब गवई हे राजकारणापलीकडील व्यक्तिमत्व होते. त्यांनी सर्वांसोबत पारिवारीक स्नेह जपला. विचारांची देवाण-घेवाण, सौहार्दतेमुळे एका उंचीचा सभापती राज्याला लाभला. त्यामुळे तणावाच्या परिस्थितीत सभागृहातील मोठे नेतेही त्यांचे निर्देश पाळत असत. ज्ञानाचा खजीना, उत्तम जाण, एखाद्या गोष्टीवर प्रभूत्व गाजविण्याची क्षमता, उमदे व्यक्तिमत्व यामुळे ते लोकप्रिय झाले. दादासाहेबांचा मान आणि व्य












क्तिमत्वाला साजेल असे स्मारक येथे होत आहे. त्यांच्या स्मारकातून प्रेरणा मिळेल, त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोचविण्याचे कार्य होईल. विद्यापिठाने या स्मारकाची देखभाल करून ते ज्ञानार्जनाचे केंद्र बनवावे, असे सांगितले.
यावेळी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी दादासाहेब गवई यांच्या नेतृत्वगुणांचा गौरव केला आणि त्यांचे व्यक्तिमत्व चौफेर होते, असे सांगितले. तर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी लक्ष घातल्याने व पुढाकार घेत पाठपुरावा केल्यामुळे हे स्मारक उभे राहत आहे, अशी भावना डॉ. राजेंद्र गवई यांनी व्यक्त केली.
सुरवातीला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रा. सू. गवई यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करुन दिप प्रज्ज्ववलन केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठातर्फे कुलगुरू श्री. चांदेकर यांनी मुख्यमंत्री यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्मारकस्थळी पायाभरणी करून कोनशिलेचे अनावरण केले. बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विवेक साळवे यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी आभार मानले.

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८


सहजरित्या उपलब्ध होणारा उतारा
संगणीकृत सातबारा …
            अमरावती दि. 10 : शेतकऱ्यांच्या जीवनातील एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ‘सातबाराचा उतारा’ होय. कर्ज असो, सरकारी योजना असो, की त्याशिवाय अन्य कुठेलेही काम, या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी सातबाराचा उतारा आवश्यक असतो. हा सातबाराचा उतारा देणारा तलाठी  कार्यालयात नसल्यास शेतकऱ्यांच्या कामात बाधा उत्पन्न होत असे. या समस्येवर उपाय म्हणून शासनाने संगणीकृत सातबारा देण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिली. आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक कामात अत्यावश्यक असणारा सातबारा आता सहजपणे प्राप्त करता येवू लागला.
            प्रथम संगणीकृत सातबारा राज्यातील अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये दिनांक 20 ऑगस्ट 2014 रोजी देण्यात आला. अमरावती विभागामध्ये डिजीटल स्वाक्षरी झालेल्या सातबारांची संख्या 9 लक्ष 75 हजार 884 आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 2 लक्ष 28 हजार 686, अकोला जिल्ह्यात 1 लक्ष  76 हजार 558, यवतमाळ जिल्ह्यात 2 लक्ष 58 हजार 548, बुलडाणा जिल्ह्यात 1 लक्ष 99 हजार 364 आणि वाशिम जिल्ह्यात 1 लक्ष 12 हजार 728 असे एकूण  9 लक्ष 75 हजार 884 सातबारा संगणीकृत करण्यात आले.
                        अमरावती विभागाचे रि-एडिट मॉड्यूलचे काम महाराष्ट्रात सर्व प्रथम 100 टक्के पुर्ण झाले असून विभागात अंतिम प्रमाणपत्र पुर्ण झालेल्या गावांची संख्या 7 हजार 463 आहे. अकोला जिल्ह्यात 7 तालुक्यातील 1 हजार 36, वाशिम जिल्ह्यात 6 तालुक्यातील 809, बुलडाणा जिल्ह्यात 13 तालुक्यातील 1 हजार 486, यवतमाळ जिल्ह्यात 16 तालुक्यातील 2 हजार 116, अमरावती जिल्ह्यात 14  तालुक्यातील 2 हजार 16 असे शंभर टक्के गावे पूर्ण झाली आहेत. अमरावती विभागात डिजिटल स्वाक्षरी झालेले सातबारा नागरिकांना महाभूमिअभिलेख, सेतु, महा-ई-सेवा केंद्रामार्फत उपलब्ध केले जातात.
            सातबारा उतारा म्हणजे एकप्रकारे जमिनीचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता जमिनीचा संपूर्ण अंदाज आपण घेवू शकतो. सातबारा डिजिटायझेशनमुळे जमिनीच्या नोंदणीतील गैरव्यवहाराला आळा बसला असून संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शी झाली आहे. सातबाराचा उतारा नसल्यामुळे  महत्वाचे महसुली काम होऊ शकले नाही असे प्रसंग शेतकऱ्यांवर आता ओढवणार नाही.संगणीकृत सातबारा कुठल्याही सायबर कॅफे किंवा इटरनेट जोडणी असलेल्या संगणकावरुन प्राप्त करता येईलशासनाच्या डिजिटल महाराष्ट्र अभियानामुळे शेतकऱ्यांसह सर्वाना खुप मोठा दिलासा मिळाला आहे. हे मात्र निश्चित.
असा मिळेल सात बारा
Ø  डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा मिळविण्यासाठी http://mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावे.
Ø  तेथे जिल्हा, तालुका,गाव,सर्व्हे क्रमांक/ गट क्रमांक आदी माहिती भरावी. त्यांनतर पीडीएफ स्वरुपातील डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा दिसेल. त्याची प्रत आपल्याला वापरता येईल.
Ø  सर्व शासकीय कामकाजासाठी हा सातबारा चालणार असून त्यावर पुन्हा कोणाच्याही स्वाक्षरीची गरज नाही.
                                                                                                                         
*****