बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८


सहजरित्या उपलब्ध होणारा उतारा
संगणीकृत सातबारा …
            अमरावती दि. 10 : शेतकऱ्यांच्या जीवनातील एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ‘सातबाराचा उतारा’ होय. कर्ज असो, सरकारी योजना असो, की त्याशिवाय अन्य कुठेलेही काम, या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी सातबाराचा उतारा आवश्यक असतो. हा सातबाराचा उतारा देणारा तलाठी  कार्यालयात नसल्यास शेतकऱ्यांच्या कामात बाधा उत्पन्न होत असे. या समस्येवर उपाय म्हणून शासनाने संगणीकृत सातबारा देण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिली. आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक कामात अत्यावश्यक असणारा सातबारा आता सहजपणे प्राप्त करता येवू लागला.
            प्रथम संगणीकृत सातबारा राज्यातील अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये दिनांक 20 ऑगस्ट 2014 रोजी देण्यात आला. अमरावती विभागामध्ये डिजीटल स्वाक्षरी झालेल्या सातबारांची संख्या 9 लक्ष 75 हजार 884 आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 2 लक्ष 28 हजार 686, अकोला जिल्ह्यात 1 लक्ष  76 हजार 558, यवतमाळ जिल्ह्यात 2 लक्ष 58 हजार 548, बुलडाणा जिल्ह्यात 1 लक्ष 99 हजार 364 आणि वाशिम जिल्ह्यात 1 लक्ष 12 हजार 728 असे एकूण  9 लक्ष 75 हजार 884 सातबारा संगणीकृत करण्यात आले.
                        अमरावती विभागाचे रि-एडिट मॉड्यूलचे काम महाराष्ट्रात सर्व प्रथम 100 टक्के पुर्ण झाले असून विभागात अंतिम प्रमाणपत्र पुर्ण झालेल्या गावांची संख्या 7 हजार 463 आहे. अकोला जिल्ह्यात 7 तालुक्यातील 1 हजार 36, वाशिम जिल्ह्यात 6 तालुक्यातील 809, बुलडाणा जिल्ह्यात 13 तालुक्यातील 1 हजार 486, यवतमाळ जिल्ह्यात 16 तालुक्यातील 2 हजार 116, अमरावती जिल्ह्यात 14  तालुक्यातील 2 हजार 16 असे शंभर टक्के गावे पूर्ण झाली आहेत. अमरावती विभागात डिजिटल स्वाक्षरी झालेले सातबारा नागरिकांना महाभूमिअभिलेख, सेतु, महा-ई-सेवा केंद्रामार्फत उपलब्ध केले जातात.
            सातबारा उतारा म्हणजे एकप्रकारे जमिनीचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता जमिनीचा संपूर्ण अंदाज आपण घेवू शकतो. सातबारा डिजिटायझेशनमुळे जमिनीच्या नोंदणीतील गैरव्यवहाराला आळा बसला असून संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शी झाली आहे. सातबाराचा उतारा नसल्यामुळे  महत्वाचे महसुली काम होऊ शकले नाही असे प्रसंग शेतकऱ्यांवर आता ओढवणार नाही.संगणीकृत सातबारा कुठल्याही सायबर कॅफे किंवा इटरनेट जोडणी असलेल्या संगणकावरुन प्राप्त करता येईलशासनाच्या डिजिटल महाराष्ट्र अभियानामुळे शेतकऱ्यांसह सर्वाना खुप मोठा दिलासा मिळाला आहे. हे मात्र निश्चित.
असा मिळेल सात बारा
Ø  डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा मिळविण्यासाठी http://mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावे.
Ø  तेथे जिल्हा, तालुका,गाव,सर्व्हे क्रमांक/ गट क्रमांक आदी माहिती भरावी. त्यांनतर पीडीएफ स्वरुपातील डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा दिसेल. त्याची प्रत आपल्याला वापरता येईल.
Ø  सर्व शासकीय कामकाजासाठी हा सातबारा चालणार असून त्यावर पुन्हा कोणाच्याही स्वाक्षरीची गरज नाही.
                                                                                                                         
*****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा