ज्ञानरचनावाद अध्यापन पध्दती
;
आदिवासी विद्यार्थ्यांची प्रगतीची
गुरुकिल्ली
सातपुडयाच्या पायथ्याशी डोंगरखोऱ्यात चिखलदरा तालुका
वसलेला असून निसर्गाच अप्रतीम सौंदर्य लाभलेले आहे. याच तालुक्यातील अतिदुर्गम
भागात डोमी व मोझरी ही संपूर्ण आदिवासी लोकसंख्या असलेली गावे आहेत. या दोन्ही
गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी ज्ञानरचनावाद या अध्यापन पध्दतीचा अवलंब
करुन आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे उत्तम धडे दिले. आदिवासी विद्यार्थ्यांनी
सुध्दा गुरुजींच्या मार्गदर्शनात अभ्यासाचे धडे गिरवुन आपली शैक्षणिक गुणवत्तेचा
आलेख उंचावून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला.
डोमी व मोझरी ही शंभर टक्के आदिवासी
लोकसंख्या असलेली साधारण: 200 कुंटुंबाची गावे आहे. दोन्ही गावे ही अमरावती शहरापासून
सुमारे दोनशे कि.मी. अंतरावर आहे. दळणवळणाचे किंवा संदेशवहनाचे कुठलेही प्रभावी साधन
नाही. विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर असूनही या गावातील जि.प. प्राथमिक शाळेच्या
शिक्षकांनी आदिवासी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अध्यापनाची मेहनत घेतली. याची फलश्रुती
दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्वच विषयांत उत्तम गुणांकन प्राप्त करुन तालुक्यातील
इतर शाळांच्या तुलनेत या शाळांना प्रथम येण्याचा बहुमान मिळवून दिला. या अध्यापन पध्दतीमुळे
शाळेचे विद्यार्थी शंभर टक्के प्रगत झाले आहे. ज्ञानरचनावाद अध्यापन पध्दतीमध्ये शालेय
शैक्षणिक साहित्याच्या सहाय्याने विद्यार्थी प्रत्यक्ष कृती करतात व शिकतात. चिखलदरा
तालुक्यातील 168 शाळांपैकी 152 शाळांमध्ये या अध्यापन पध्दतीचा अवलंब केला जातो. त्यातल्या
त्यात फक्त डोमी व मोझरी गावच्या प्राथमिक शाळेनी तालुक्यात ज्ञानरचनावाद या अध्यापन
पध्दतीच्या माध्यमातून चांगली प्रगती केली.
नुकतेच 27 जून रोजी शाळेच्या पहिल्या
दिवशी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील अतिदुर्गम आदिवासीबहुल
शाळांची व्हिडिओ कान्फरन्सच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता व सुविधा याबाबत माहिती
जाणून घेतली. मंत्री महोदयांनी शाळांची माहितीसंबंधी प्रत्यक्ष त्या त्या शाळेतील चिमुकल्या
विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला होता.
शाळेत शौचालय आहे का? शौचालयात पाण्याची सोय आहे का ? तेथील
सुविधा योग्य आहेत का ? शाळेला सुरक्षाभिंती आहेत का, शाळेत मुले किती? सर्व शाळेत
आली का, शाळा डिजीटल आहे काय, पिण्याचे पाणी, पाठयपुस्तके, गणवेश, मध्यान्ह भोजन-खिचडी,
स्वच्छतागृह आहे का? शाळेत आणखी काय हवे ? शाळा कशी वाटते, शाळा आवडते काय, शिक्षक
आवडतात का, शिक्षकांची शिकविण्याची पध्दत असे अनेक प्रश्न विचारून विद्यार्थ्यांकडून
उत्तरे जाणून घेतली. या संवादाच्या रुपाने मंत्री महोदयांनी राज्यातील प्राथमिक शाळांच्या
व्यवस्थेसंबंधी माहिती घेतली होती. शाळांच्या प्रगतीबाबत शालेय शिक्षण मंत्र्यांनी
समाधान व्यक्त केले होते.
शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये एक फरक प्रकर्षाने
आढळतो. तो म्हणजे शहरातील पालक आपल्या मुलांवर अपेक्षांचे ओझे टाकून त्यांना स्पर्धेत
सोडून देतात. अगदी बालवयापासून इंटरनेट, मोबाईल, व्हिडीओ गेम्स यासारख्या सुविधा त्यांच्या
हातात देतात आणि मग पहिला क्रमांक मिळविण्याच्या नादात मुले सुसाट धावतात. परंतू विकासाचा
प्रवाह व तंत्रज्ञानापासून दूर असलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये पहिलेच यावे यासासाठीचा
हव्यास नाही किंवा शेवटी येवू याची भितीही नाही. फक्त आनंदासाठीचे शिक्षण व शिक्षणाचा
आनंद एवढेच त्यांना माहिती आहे. मोल-मजुरी करुन मिळेल त्या रोजगारावर पोट भरणारे आई-वडील
जगण्याचे ज्ञान देतात तर शिक्षक त्यांना स्पर्धा ही शिकण्यासाठी असते, हे शिकवतात.
शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमा अंतर्गत नव्या ज्ञानरचनावाद या अध्यापन
पध्दतीमुळे अतिदुर्गम आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना निश्चितच योग्य दिशा मिळेल.
हीच मुले देशाच्या सर्वांगिण विकासात मोलाची कामगिरी बजावतील यात शंकाच नाही.
-- विजय
राऊत
माहिती
सहाय्यक
विभागीय
माहिती कार्यालय, अमरावती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा