बुधवार, २२ मार्च, २०१७

उन्नत भारत अभियान : ग्रामीण व शहरी भागातील
विकासात महत्वाची भुमिका
                        -जिल्हाधिकारी किरण गित्ते

* www.visionamravati.in संकेतस्थळाचे उद्घाटन
* स्मार्ट अमरावती, डिजीटल अमरावती साठी 2 हजार कोटी रुपयांचा निधी


        अमरावती, दि. 22 (विमाका) : ग्रामीण व शहरी भागातील मुलभूत सोयी सुविधांचा विकास साधावयाचा असल्यास तंत्रज्ञानावर आधारित विकास हा महत्वपूर्ण ठरतो. यासाठी उन्नत भारत अभियानाच्या धर्तीवर उन्नत महाराष्ट्र अभियान जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासात महत्वाची भूमिका निभावणार, असा विश्वास जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी व्यक्त केला.
            येथील टॉऊन हॉल येथे अमरावती महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिजन अमरावती 2017 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उपमहापौर संध्याताई टिकले, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. शिंगाडे, राज्य प्रकल्प युनिटच्या सल्लागार डॉ. अर्चना बारब्दे, सभापती सुनील काळे व कृषी व सामाजिक कवी प्रा. इंद्रजित भालेराव आदी उपस्थित होते.
            प्रारंभी दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते www.visionamravati.in या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. सदर संकेतस्थळाचा निर्माण पोटे कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या शुभम कापसे व तेजश्री कापसे या विद्यार्थ्यांनी केला आहे. या संकेत स्थळावर उन्नत भारत अभियानाविषयी संपूर्ण माहिती व त्याअनुषंगाने करावयाचे विकासकामांची प्रक्रिया नमूद केलेली आहे.
            जिल्हाधिकारी म्हणाले, ग्रामीण व शहरी भागात मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन सर्वांगिण विकास करण्यासाठी मागील वर्षापासून केंद्र सरकारव्दारे उन्नत भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्यातील गावांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासनाव्दारे उन्नत महाराष्ट्र अभियान ही संकल्पना राबविण्यात येत आहे. गावांचा विकास करण्यासाठी नुसते रस्ते किंवा संकुलांचे बांधकाम करुन चालणार नाही तर विज, पाणी, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, अन्नधान्याची उपलब्धता यासारख्या मुलभूत गरजा असलेल्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग करुन तशाप्रकारचे डिजीटल अप्लीकेशन किंवा सॉफ्टवेअर विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. वाफेचे इंजीनाचा शोध, विजेची निर्मिती आणि संगणकाच तंत्रज्ञानाचा शोध मानवाच्या उत्क्रांतीमध्ये फार महत्वाचे घटक ठरले आहेत. या अशा तंत्रज्ञानावर आधारित डिजीटल तंत्रज्ञानाचा उपयोगत करुनच ग्रामीण व शहराच्या विकासातील दरी कमी करता येऊ शकते.
            राज्यातील पहिले डिजीटल गाव म्हणून जिल्हयातील हरिसाल गावाची ओळख निर्माण झाली आहे. डिजीटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने टेलीमेडीसीनचा उपयोग करुन गावाच्या परिसरातील रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. कौशल्य विकास अंतर्गत कौशल्यपूर्ण प्रशिक्षणाचा लाभ युवकांना देण्यात येत आहे. राज्यातील दहा स्मार्ट शहरामध्ये अमरावती शहराचा समावेश झाला आहे. शहर डिजीटली स्मार्ट करण्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला उपस्थित अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अमरावती जिल्हा डिजीटली व स्मार्ट जिल्हा म्हणून उदयास आणण्यासाठी स्ट्रीट लाईट चालू बंद करणे, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ई –क्लासरुम , ई- लर्निंग, गोर गरीबांच्या आरोग्याच्या सोयीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, (युमेक्स बेस्ड ) सुर्यप्रकाशावर आधारित इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, झाडांच्या जैविक गरजा ओळखुन पाणीपुरवठा, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम ई लॉयब्ररी अशा प्रकारचे तांत्रिक प्रकल्प तयार करावे. अमरावती जिल्हाच्या सर्वांगिण विकासाठी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प तयार करण्यासाठी प्रवृत्त होऊन उन्नत भारत अभियान संकल्पना यशस्वी करुन दाखवावी असे आवाहन श्री गित्ते यांनी केले.
            मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार म्हणाले, उन्नत महाराष्ट्र अभियान अंतर्गत अमरावती शहर डिजीटल व स्मार्ट करण्यासाठी शहरातील पाणी विज, रस्ते निर्माण, परिसर स्वच्छता, आरोग्य, नाल्यांची बांधकामे आदी मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यावर मनपा प्रशासनाव्दारे भर देण्यात येत आहे. नगरोत्थान व अमृत योजनांची प्रभावी अमंलबजावणी करुन नगरविकास, पाणीपुरवठा, भुयारी गटार बांधकाम यासारख्या विकासकामांसाठी भरीव निधी प्राप्त झाला आहे. शहरातील प्रत्येक गुन्हेगारी प्रवृत्तीवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, पार्कींगची सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईटस, आरोग्य सुविधासाठी मनपा प्रशासनाव्दारे विकासात्मक कामे करण्यात येणार आहे. आणि शहर स्वच्छ - सुंदर व डिजीटली स्मार्ट बनविण्यासाठी कटीबध्द राहणार आहे.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंत्रशिक्षण विभागाचे प्रा. पासेबंद यांनी केले. त्यांनी उन्नत भारत अभियान व उन्नत महाराष्ट्र अभियान या अभियानात तंत्रशिक्षण विभागाची भूमिका व उद्देश याविषयी माहिती दिली. कार्यक्रमात उपमहापौर सध्यांताई टिकले, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, सभापती सुनील काळे, डॉ. अर्चना बारब्दे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
            कार्यक्रमाचा समारोप कृषी व सामाजिक कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या कृषी व ग्रामीण जीवनावर आधारित    ‘ बाप ’व ‘ माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता’ या दोन बहारदार कविता सादर करुन झाली. यावेळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, मनपा पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.


**************


मंगळवार, २१ मार्च, २०१७

सर्वच गरीबांना हक्काची घरे
                             -पालकमंत्री प्रविण पोटे

v  उद्दिष्टपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा
v  धडक सिंचन विहिरीव्दारे प्रभावी सिंचनाची सोय
v  अनुकंपाधारकांना नियुक्ती

        अमरावती, दि. 21 (विमाका) : राज्यातील प्रत्येक गरीब कुटुंबाला हक्काची घरे मिळावी यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी पॅकेज आवास योजना तसेच म्हाडामार्फत विकसीत करण्यात येत असलेली संकुल आदी योजना राज्य शासनाव्दारे राबविण्यात येतात. या योजनांतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबाला हक्काची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित शासकीय विभागांनी उद्दिष्टपूर्ण होईल अशारितेने कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्री प्रविण पोटे यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात घरकुल योजना, धडक सिंचन विहिरी, अनुकंपाधारकांना नियुक्ती याविषयाबाबत श्री पोटे यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत  होते. बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, सहायक जिल्हाधिकारी ष्णमुखराजन एन., उपजिल्हाधिकारी श्री काळे यांचेसह शासकीय विभागांचे प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
            पालकमंत्री म्हणाले, प्रत्येक गरीब कुटुंबाला हक्काचे घर मिळावे हे राज्य शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी पॅकेज आवास योजना आदी योजनासह पंडीत दिनदयाल उपाध्याय योजनाव्दारे पात्र गरीब लोकांना घरकुलाचे बांधकाम करुन देण्यात येते. जिल्ह्यात सदर योजने अंतर्गत पूर्ण व अपूर्ण घरकुलांच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा पालकमंत्री महोदयांनी घेतला. अपूर्ण व प्रस्तावित घरकुलांचा गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी संयुक्तपणे पाहणी करुन निधी मागणीचा प्रस्ताव येत्या 10 एप्रिल पर्यंत महसूल विभागास सादर करावे. ज्याठिकाणी जमनीचे भाव जास्त आहे अशा ठिकाणी शासनाच्या ताब्यातील ई क्लास भुखंडाची यादी तर कमी भाव असलेल्या खाजगी मालकीच्या भुखंडाची जिल्हा प्रशासनास सादर करावी. अशा सूचना त्यांनी दिल्या.
            राज्यात मोठया प्रमाणात सिंचनाची सोय व्हावी यादृष्टीने धडक सिंचन व मनरेगा योजने अंतर्गत विहिर बांधकामे करण्यात येतात. विहिरींचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी शासनाव्दारे निधीचा वाटप करण्यात आला आहे. जिल्ह्याला दिलेले लक्षांक पूर्ण करण्यासाठी सर्व गटविकास अधिकारी यांनी प्रत्यक्षपणे दौरे करुन विहिरींच्या सद्यस्थिती बाबत पाहणी करावी. गावातील प्रत्येक लाभार्थ्यांना भेट देऊन योजनेची माहिती द्यावी. अपूर्ण विहिरी पूर्ण करण्यासाठी यथोचित प्रयत्न करावे, अशा सूचना श्री पोटे यांनी दिल्या.
            जिल्ह्यातील विविध शासकीय विभागात अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी सुमारे 90 उमेदवारांनी पालकमंत्री महोदयांना निवेदन सादर केली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची नावे संबंधित विभागांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामुहिक यादीमध्ये समाविष्ठ करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावीत. यावेळी सर्व शासकीय विभागात रिक्त अनुकंपा पदांचा आढावा त्यांनी घेतला. अनुकंपाधारकांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री महोदयांनी दिले. बैठकीला सर्व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

***********




सोमवार, २० मार्च, २०१७

पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचा
दिंडी व रॅलीने शुभारंभ

* सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दाखविली हिरवी झेंडी
* व्यसनमुक्तीच्या ज्वलंत संदेशांनी लोकांचे प्रबोधन
*व्यसने सोडा मानसे जोडा, व्यसन विनाशाचे प्रतिक

            अमरावती, दि. 19 (विमाका) : देशातील पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचा व्यसनमुक्तीचे संदेश असलेल्या दिंडी व रॅलीने आज सकाळी शुभारंभ करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे आयोजित दिंडी व रॅलीला राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी हिरवी झेंडी दाखवून आरंभ केला.
            यावेळी राष्ट्रीय प्रबोधनकार, सप्त खंजेरीवादक सत्यपाल महाराज, उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रविण पोटे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दिपक वडकुते, सहाय्यक आयुक्त प्राजक्ता इंगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण, जनसंपर्क अधिकारी मंगला देशमुख, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काळे, डॉ. गणेश बुब यांचेसह शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी, ओम शांती ओम चे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
            रॅलीची सुरुवात नेहरु मैदान येथुन झाली. त्यांनतर जयस्तंभ चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयास ना. बडोले यांच्या हस्ते हारार्पण करुन अभिवादन करण्यात आले. पुढे इर्विन चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास मंत्री महोदयांच्या हस्ते हारार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर पुढे ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात संत गाडगेबाबा यांच्या पुतळयास हारार्पण व अभिवादन करुन रॅलीची सांगता झाली.
            व्यसनमुक्ती साहित्य संमेलनानिमित्त आयोजित दिंडी व रॅलीमध्ये सामाजिक न्याय विभागाचा व्यसनमुक्ती चित्ररथ, येडाई व्यसनमुक्ती केंद्र ता. कळबं जि. उस्मादाबाद येथील चित्ररथ, ओम शांती ओम सदस्यांचा रथ, मुकबधीर विद्यालयांच्या विद्यार्थींनींचे लेझीम पथक, भातकुली तालुक्यातील रामा येथील वारकरी भजनी मंडळी, समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच अन्य शाळेच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. रॅलीच्या शुभारंभा अगोदर नेहरु मैदानात विविध पथकांनी पथनाटय सादर केलीत. यानंतर उपस्थितांना व्यसनमुक्ती संबंधी थपथ देण्यात आली.
            रॅलीत सहभागी सदस्यांच्या हाती असलेल्या व्यसनमुक्त घर सुखाचे आगार, जो व्यसनाच्या आहारी, तो मृत्युच्या दारी, निर्व्यसनी महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र, संतभुमी मे संदेश हमे फैलाना है, नशे को मार भगाना है, तम्बाखु को जिसने गले लगाया, मौत को उसने पास बुलाया, यही है नारा हमारा, नशामुक्त बने प्रदेश हमारा, वही परिवार पावन है, जहॉ मद्यनिषेध कायम है, अशा अनेक व्यसनमुक्तीच्या संदेशांनी उपस्थितांचे व पादचारी लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते.


********



आत्मविश्वास व कणखरवृत्तीने स्त्रिया व्यसनमुक्त समाज घडवू शकतात
-पारूमिता गोस्वामी  

       अमरावती, दि. 19 (विमाका) : व्यसनाच्या आहारी गेलेल्या आपल्या नवऱ्यामुळे स्त्रीया सर्वात जास्त प्रमाणात कौटुंबिक हिंसाचाराला  बळी पडतात. कुटुंबाच्या अनेक जबाबदाऱ्या महिलेल्या शिरावर येतात. व घरातील व्यसनाधिन व्यक्तीच्या आत्यंतिक व्यसनामुळे त्या कुटुंबावर घातक परिणाम होतो.  तेव्हा आत्मविश्वास, कणखरवृत्तीने व न डगमगता  परिस्थितीला तोंड देवून स्त्रीया व्यसनमुक्त कुटुंब व समाज  घडवू शकतात. असा विश्वास पारूमिता गोस्वामी यांनी स्त्रीयांना दिला.  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित देशातील पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनातील ‘व्यसनाधिनता व महिलांचा लढा’  या विषयावरील प्रथम चर्चासत्रात  त्या बोलत होत्या. आजच्या या चर्चासत्रात श्रीमती प्रफुल्ला मोहिते  व श्रीमती मुक्ताताई पुणतांबेकर सहभागी झाल्या होत्या. 
                पुढे बोलतांना पारूमिता गोस्वामी यांनी व्यसनाधिनतेमुळे होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराची विदारक उदाहरणे दिली.  कुटुंबाची हानी होत असतांना स्त्रीयांना होणारा त्रास, मारहाणीची सततची भिती, मुलांच्या भविष्याची चिंता व तिला देण्यात येणारा दोष यामुळे घरातील सौख्य हरवून जाते. स्त्रियांच्या नशिबी फक्त व्यसनांविरोधात संघर्ष उभा राहतो. 
                प्रफुल्ला मोहिते म्हणाल्या, लहान मुले वडिलांचे अनुकरण करतात व व्यसनांच्या आहारी जातात.  पाश्चिमात्यांच्या अनुकरणातून  महिला व तरूणींमध्ये सुध्दा आज व्यसनाधिनता वाढत आहे. स्त्रीयांसाठी चालविण्यात येणारे  निशिगंध व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रात आलेल्या अनुभवातून त्या म्हणाल्या, व्यसनाधिनतेमुळे समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे.  घरातील व्यसनाधिन व्यक्तींच्या वागण्याचा बालकांच्या मनावर विपरीत परिणाम होतो यासाठी स्त्रीयांनी कुटूंबातील  व्यसन सोडविण्याचा लढा एकजुटीने द्यावा.  तसेच व्यसनाधिन कुटूंबातील मुले अतिशय आक्रमक बनतात असेही त्या म्हणाल्या.  यावेळी विद्यार्थी, युवक-युवती , महिला, विविध सामाजिक संस्था व  व्यसनमुक्ती केंद्राचे कार्यकर्ते उपस्थित होते.
                व्दितीय चर्चासत्राचा विषय ‘युवकांना व्यसनाचा विळखा’असा होता.  यात श्रीमती सुचिता पाटेकर, दिपक पाटील, अनंत खेडकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. संदीप तांबोळी याचा सहभाग होता.
                श्रीमती सुचिता पाटेकर यांनी सांगीतले, लहान मुले अनुकरणप्रिय असतात म्हणुन व्यसनमुक्तीची सुरूवात कुटुंबापासून होणे गरजेचे आहे. आजच्या शिक्षकांनी सुध्दा व्यसनांपासून दूर रहावे.  दिपक पाटील यांनी सलाम मुंबई या संस्थेने व्यसनमुक्तीसाठी केलेले वैशिष्टपूर्ण कार्य सांगीतले.  यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हापरिषदेच्या  तीन हजार शाळा व्यसनमुक्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यासाठी संस्थेने अनेक जनजागृतीपर कार्यकमाचे आयोजन केले व व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
                  ॲङ अनंत खेडकर यांनी तंबाखूचे व्यसन करणाऱ्या शिक्षकाचे वर्णन आपल्या विनोदी काव्यशैलीतून उपस्थितांसमोर मांडलें.  जीवन आनंदात जगता यावे पंरतू आजचे युवक –युवती अपयशामूळे आत्मविश्वास गमावून बसतात. परिणामी त्यांची संगत बिघडते, ताणतणाव वाढतो.  परिस्थितीला तोंड देण्याएैवजी तो व्यसनाला बळी पडतो.  म्हणून आनंदी राहण्याचा संदेश आजच्या युवकांना त्यांनी दिला.
                बाबा व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ. श्रीकांत देशमुख म्हणाले, काहितरी करून बघण्याच्या नादात अनेक युवक-युवती व्यसनाधिनतेच्या विळख्यात सापडतात.  तारूण्यात नाविन्यतेचा ध्यास असतो.  स्वप्नाळू वृत्ती, शारीरीक बदल, चित्रपटातील नायक नायिकांचे अनुकरण करतांना मनावरील नियंत्रण सुटते व युवक व्यसनांच्या आहारी जातात.  युवकांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात स्वत:ला रमवावे, सर्वांगीण विकासाचा ध्यास धरावा म्हणजे व्यसनाधिनतेचे प्रमाण आपोआप कमी होईल.  डॉ. संदीप तांबोळी म्हणाले, व्यसनाधिनांवर उपचार , विशेष लक्ष व त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी अनेक संस्था पार पाडीत आहे. त्यामुळे आता अनेक युवक व्यसनांमधुन बाहेर पडण्याचे चित्र दिसत आहे.  व्यसनांमुळे होणाऱ्या गंभीर आजारांमूळे आजचा युवक सुदृढ आरोग्याबाबत जागृत  झाला असल्याचे त्यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे संचालन अमोल मडामे यांनी केले. यावेळी युवक-युवती व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

********