सोमवार, २० मार्च, २०१७

आत्मविश्वास व कणखरवृत्तीने स्त्रिया व्यसनमुक्त समाज घडवू शकतात
-पारूमिता गोस्वामी  

       अमरावती, दि. 19 (विमाका) : व्यसनाच्या आहारी गेलेल्या आपल्या नवऱ्यामुळे स्त्रीया सर्वात जास्त प्रमाणात कौटुंबिक हिंसाचाराला  बळी पडतात. कुटुंबाच्या अनेक जबाबदाऱ्या महिलेल्या शिरावर येतात. व घरातील व्यसनाधिन व्यक्तीच्या आत्यंतिक व्यसनामुळे त्या कुटुंबावर घातक परिणाम होतो.  तेव्हा आत्मविश्वास, कणखरवृत्तीने व न डगमगता  परिस्थितीला तोंड देवून स्त्रीया व्यसनमुक्त कुटुंब व समाज  घडवू शकतात. असा विश्वास पारूमिता गोस्वामी यांनी स्त्रीयांना दिला.  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित देशातील पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनातील ‘व्यसनाधिनता व महिलांचा लढा’  या विषयावरील प्रथम चर्चासत्रात  त्या बोलत होत्या. आजच्या या चर्चासत्रात श्रीमती प्रफुल्ला मोहिते  व श्रीमती मुक्ताताई पुणतांबेकर सहभागी झाल्या होत्या. 
                पुढे बोलतांना पारूमिता गोस्वामी यांनी व्यसनाधिनतेमुळे होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराची विदारक उदाहरणे दिली.  कुटुंबाची हानी होत असतांना स्त्रीयांना होणारा त्रास, मारहाणीची सततची भिती, मुलांच्या भविष्याची चिंता व तिला देण्यात येणारा दोष यामुळे घरातील सौख्य हरवून जाते. स्त्रियांच्या नशिबी फक्त व्यसनांविरोधात संघर्ष उभा राहतो. 
                प्रफुल्ला मोहिते म्हणाल्या, लहान मुले वडिलांचे अनुकरण करतात व व्यसनांच्या आहारी जातात.  पाश्चिमात्यांच्या अनुकरणातून  महिला व तरूणींमध्ये सुध्दा आज व्यसनाधिनता वाढत आहे. स्त्रीयांसाठी चालविण्यात येणारे  निशिगंध व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रात आलेल्या अनुभवातून त्या म्हणाल्या, व्यसनाधिनतेमुळे समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे.  घरातील व्यसनाधिन व्यक्तींच्या वागण्याचा बालकांच्या मनावर विपरीत परिणाम होतो यासाठी स्त्रीयांनी कुटूंबातील  व्यसन सोडविण्याचा लढा एकजुटीने द्यावा.  तसेच व्यसनाधिन कुटूंबातील मुले अतिशय आक्रमक बनतात असेही त्या म्हणाल्या.  यावेळी विद्यार्थी, युवक-युवती , महिला, विविध सामाजिक संस्था व  व्यसनमुक्ती केंद्राचे कार्यकर्ते उपस्थित होते.
                व्दितीय चर्चासत्राचा विषय ‘युवकांना व्यसनाचा विळखा’असा होता.  यात श्रीमती सुचिता पाटेकर, दिपक पाटील, अनंत खेडकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. संदीप तांबोळी याचा सहभाग होता.
                श्रीमती सुचिता पाटेकर यांनी सांगीतले, लहान मुले अनुकरणप्रिय असतात म्हणुन व्यसनमुक्तीची सुरूवात कुटुंबापासून होणे गरजेचे आहे. आजच्या शिक्षकांनी सुध्दा व्यसनांपासून दूर रहावे.  दिपक पाटील यांनी सलाम मुंबई या संस्थेने व्यसनमुक्तीसाठी केलेले वैशिष्टपूर्ण कार्य सांगीतले.  यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हापरिषदेच्या  तीन हजार शाळा व्यसनमुक्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यासाठी संस्थेने अनेक जनजागृतीपर कार्यकमाचे आयोजन केले व व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
                  ॲङ अनंत खेडकर यांनी तंबाखूचे व्यसन करणाऱ्या शिक्षकाचे वर्णन आपल्या विनोदी काव्यशैलीतून उपस्थितांसमोर मांडलें.  जीवन आनंदात जगता यावे पंरतू आजचे युवक –युवती अपयशामूळे आत्मविश्वास गमावून बसतात. परिणामी त्यांची संगत बिघडते, ताणतणाव वाढतो.  परिस्थितीला तोंड देण्याएैवजी तो व्यसनाला बळी पडतो.  म्हणून आनंदी राहण्याचा संदेश आजच्या युवकांना त्यांनी दिला.
                बाबा व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ. श्रीकांत देशमुख म्हणाले, काहितरी करून बघण्याच्या नादात अनेक युवक-युवती व्यसनाधिनतेच्या विळख्यात सापडतात.  तारूण्यात नाविन्यतेचा ध्यास असतो.  स्वप्नाळू वृत्ती, शारीरीक बदल, चित्रपटातील नायक नायिकांचे अनुकरण करतांना मनावरील नियंत्रण सुटते व युवक व्यसनांच्या आहारी जातात.  युवकांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात स्वत:ला रमवावे, सर्वांगीण विकासाचा ध्यास धरावा म्हणजे व्यसनाधिनतेचे प्रमाण आपोआप कमी होईल.  डॉ. संदीप तांबोळी म्हणाले, व्यसनाधिनांवर उपचार , विशेष लक्ष व त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी अनेक संस्था पार पाडीत आहे. त्यामुळे आता अनेक युवक व्यसनांमधुन बाहेर पडण्याचे चित्र दिसत आहे.  व्यसनांमुळे होणाऱ्या गंभीर आजारांमूळे आजचा युवक सुदृढ आरोग्याबाबत जागृत  झाला असल्याचे त्यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे संचालन अमोल मडामे यांनी केले. यावेळी युवक-युवती व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

********



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा