गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

खोपडा, बोडना व खापरखेडा या गावांच्या
पुनर्वसनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा
                                    -जिल्हाधिकारी अभिजित बांगर

अमरावती, दि. 9 :  मोर्शी तालुक्यातील खोपडा व बोडना तसेच वरुड तालुक्यातील खापरखेडा या तीनही पुरग्रस्त गावांच्या पुनर्वसनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले.
बैठकीला आमदार अनिल बोंडे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) रामदास सिध्दभट्टी, मजीप्राच्या अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, जिल्हा कृषी अधिक्षक अनिल खर्चान, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, सार्व. बांधकाम विभागाचे व लघु पाटबंधारे महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. बांगर म्हणाले, खोपडा, बोडना व खापरखेडा या गावांचे सुनियोजित पुनर्वसन करण्यासाठी तेथील कुटुंबाच्या नावे वाटप करण्यात आलेले भूखंडाची जागा व्यवस्थित करुन घ्यावी. तेथील झाडे झुडपे कापून जागेचे सरळीकरण करुन घ्यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते, नाल्या, स्ट्रीट लाईट व इतर नागरी सुविधांची उभारणी करण्यासाठी नियोजन करुन तातडीने कामाला सुरुवात करावी. उपविभागीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांनी गावस्तरीय समितींची मान्यता घेऊन भुखंड वाटप करावे. पाणी पुरवठा विभागाने (मजीप्रा) तीनही गावांची पेय जलाची मागणी लक्षात घेऊन पाण्याची टाकी निर्माण करण्यासाठी नियोजन करावे. विज वितरण कंपनीने (एमएसईबी) तातडीने वीज पुरवठा उपलब्ध होईल यादृष्टीने विजेचे पोल उभारण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना श्री. बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

आमदार बोंडे म्हणाले, खोपडा, बोडना व खापरखेडा या तीनही गावांचे नागरिक पावसाळ्यातील पुरामुळे त्रस्त आहेत. या तीनही गावांचे पुनर्वसन योग्य पध्दतीने करण्याची मागणी गावकऱ्यांनी बरेच वर्षापासून रेटून धरली आहे. या तीनही गावांचे पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने कामाला सुरुवात करावी. असे त्यांनी सांगितले. पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखडयानुरुप निधीची तरतूद संबंधित यंत्रणेला तातडीने उपलब्ध करुन द्यावी. सर्व संबंधित शासकीय विभागांनी आराखडया अनुसार निधीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करुन घ्यावा, जेणेकरुन तीनही गावात प्राधान्याने पायाभूत सुविधा उभारता येईल. असेही श्री. बोंडे यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा