कृषी विकास परिषद 2017 चे वरुड येथे आयोजन
* 7 ते 10
डिसेंबर दरम्यान कृषी तज्ञांचे
मार्गदर्शन
* कृषी
प्रदर्शनी व शासकीय योजनांचे स्टॉल्स
अमरावती, दि. 9 : येत्या डिसेंबर महिन्यात 7
ते 10 डिसेंबर पर्यंत वरुड येथे कृषी विकास
परिषद 2017 चे भव्य आयोजन करण्यात येत आहे. या परिषदेमध्ये वरुड व मोर्शी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी
संत्रा उत्पादन वाढविण्यासाठी संशोधनात्मक प्रयत्न, शेतीपुरक
व्यवसाय, शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग, शेतमालाचे उत्तम मार्केटींग, शेतीच्या मशागतीसाठी लागणारे
अत्याधुनिक साहित्य व उपकरणे याविषयी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीव्दारे
मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परिषदेचे आयोजन कृषी विभाग,
कृषी मित्र इव्हेंट कंपनी, जैन इरिगेशन सि.
लि. यासारख्या नामवंत कंपन्यांव्दारा करण्यात
येत आहे. या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शासकीय विभाग
प्रमुखांनी सहकार्य करावे, असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष तथा
आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात
कृषी विकास परिषद 2017 च्या आयोजनाबाबत पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित बांगर, निवासी
उपजिल्हाधिकारी नितिन व्यवहारे, जिल्हा कृषी अधिक्षक श्री.
खर्चान, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू यांचेसह
कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार श्री. बोंडे म्हणाले की,
या परिषदेच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह अन्य
गणमान्य मंत्री उपस्थित राहणार आहेत. कमी खर्चात जास्त शेती
उत्पादन कसे घ्यावे, संत्रा उत्पादन क्षेत्रातील नवनवीन
संशोधन, कापूस, सोयाबीन, कडधान्य या पीकांचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी काय करावे, शेतीपुरक व्यवसाय व शेती साहित्य- उपकरणांचा उपयोग
आदी विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांची
माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या
आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी, शेतीतील उत्पादन वाढविणे,
शेतीपुरक व प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती
साधणे हा या कृषी विकास परिषदेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. कृषी विभागाने परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी.
यासंबंधी प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला
सादर करावेत. असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. बांगर म्हणाले की,
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन संशोधन व केंद्र
शासन राबवित असलेल्या कृषी विकासाच्या योजना याविषयी माहिती होण्यासाठी परिषदेच्या
आयोजनामागील उद्देश आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी संलग्नीत
शासकीय विभागांनी (सहकार, पदूम,
केम, एमटीडीसी, खादी
ग्रामोद्योग, जिल्हा उद्योग केंद्र) या
परिषदेमध्ये सहभाग घ्यावा. कृषी विभागाने योग्य नियोजन करुन
निधी मागणीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा. कृषी क्षेत्रात
उत्पादन वाढीसाठी उपयोगी ठरलेल्या मॉडेलचे स्टॉल्स , विविध
कल्याणकारी योजना आदी संबंधी दर्शनी भागात स्टॉल्स् उभारण्यात यावे. दिनांक 7 ते 10 डिसेंबर
दरम्यान होणाऱ्या या परिषदेत व्याख्यान देण्यासाठी येणाऱ्या व्याख्यातांची
राहण्याची व इतर व्यवस्था सुरळीत करावी, अशा सूचनाही त्यांनी
यावेळी दिल्या.
******
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा