बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

शिक्षण, आरोग्य, रोजगार क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करावे -वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार




       शिक्षण, आरोग्य, रोजगार क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करावे
                         -वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार
Ø मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेचे अभिनंदन
Ø मागास जिल्हे प्रगत होण्यासाठी प्रयत्न
Ø मेळघाट विकासासाठी प्राधान्याने निधी
अमरावती, दि. 14 : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकासात्मक बाबींसाठी उपलब्ध करून देण्यात येतो. या निधीतून जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, रोजगार या क्षेत्रांसोबतच पिण्याचे शुद्ध पाणी नागरीकांना मिळण्यासाठी हा निधी प्राधान्याने खर्च करावा, असे प्रतिपादन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्त केले.
आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन निधीबाबत विभागीय बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, खासदार संजय धोत्रे, आनंदराव अडसूळ, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर आदी उपस्थित होते.
श्री. मुनगंटीवार म्हणाले, राज्यात कर्जमुक्ती करण्यात आलेली आहे. त्यासाठी मोठा निधी द्यावा लागला आहे, तरीही जिल्हा नियोजनाच्या निधीत कुठलीही कपात करण्यात येणार नाही. संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी हा निधी देण्यात येत असला तरीही लोकप्रतिनिधींनी प्राधान्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करावे. स्थानिक गरजा विचारात घेणे आवश्यक आहे. मात्र निधी मर्यादीत असल्यामुळे प्राधान्य क्षेत्र ठरविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे प्राप्त निधी त्याच्या उद्दीष्टांसाठी वेळेत खर्च होईल, याकडेही लक्ष द्यावे. जिल्हा नियोजनमधून जिल्हा परिषदांना देण्यात येणारा चांगल्या पद्धतीने खर्च करावा.
जिल्हा नियोजनचा निधी नागरीकांना मुलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी खर्च करण्यात यावा. रोजगार निर्मितीवर अधिक भर द्यावा. प्रामुख्याने कृषि क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करून उत्पादन वाढ, शेतमालावर प्रक्रिया उद्योग आणि त्याचे मार्केटींग या बाबी लक्षात घेऊन त्यासाठी उपक्रम राबवावेत. मर्यादीत संसाधनाचा उपयोग योग्य नियोजनातून करून स्थानिक विकासाला गती देण्यासाठी इको-सिस्टीम तयार करावी.
अकोला येथील मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेचे श्री. मुनगंटीवार यांनी कौतुक केले. हे अभियान इतरांनाही दिशादर्शक आहे. वाशिम जिल्हा हा मागास जिल्ह्यांपैकी एक आहे. त्यामुळे याठिकाणी विकासाच्या विविध योजना जाणीवपूर्वक राबवून या जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणावे लागेल. मेळघाट विकासाला शासनाचे प्राधान्य असून त्यासाठी स्वतंत्र निधीचा प्रस्ताव पाठवावा. याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. यवतमाळसह अन्य जिल्ह्यातही मानव-वन्य प्राणी संघर्ष वाढत आहे. हे लक्षात घेऊन वनांलगतच्या गावांमध्ये वैयक्तिक आणि गावस्तरावर कुंपणाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच नागरीकांचा वनांवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर देण्यात यावा.
जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, आमदार सुनिल देशमुख, डॉ. अनिल बोंडे, विरेंद्र जगताप, चैनसुख संचेती, डॉ. अशोक उईके यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
00000

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

महोत्सवाच्या यशस्वितेसाठी समन्वयाने व पारदर्शकपणे काम करावे -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील


चिखलदरा पर्यटन महोत्सवाची जबाबदारी ‘एमटीडीसी’कडे
महोत्सवाच्या यशस्वितेसाठी समन्वयाने व पारदर्शकपणे काम करावे
                                                  -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील
अमरावती, दि.  12 :  जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने चिखलदरा महोत्सव महत्वपूर्ण असून, त्याच्या यशस्वितेसाठी समन्वयाने व पारदर्शकपणे काम करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी आज येथे दिले.
          महोत्सवाबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. चिखलदऱ्याच्या नगराध्यक्ष विजया सोमवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. सवई यांच्यासह जिल्हा परिषद, गृह, पर्यटन, वन, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांचे अधिकारी व चिखलदरा न. प. सदस्य उपस्थित होते.
श्री. पोटे म्हणाले की, येत्या 23,24 व 25 फेब्रुवारी रोजी चिखलदरा महोत्सव जिल्ह्यात साजरा करण्या येणार आहे. महोत्सवाची जबाबदारी यंदा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्यासह  चिखलदरा नगरपरिषद, जिल्हा नियोजन अधिकारी व इतर यंत्रणांनी महोत्सवाच्या यशस्वितेसाठी समन्वयपूर्वक नियोजन करावे. पर्यटन महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी अंदाजपत्रक सादर करावे. विविध कामांसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवावी व स्थानिक, तसेच बाहेरील कंत्राटदारांसाठी प्रक्रिया खुली असावी. निविदा प्रक्रिया संबंधित सर्व आर्थिक कामे पारदर्शकपणे करावीत. महोत्सवात स्थानिक आदिवासी बांधवांच्या कलाकृतींचा समावेश असावा, असेही निर्देश त्यांनी दिले.


महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी चिखलदरा महोत्सव समिती, कार्यक्रम संनियत्रण व नियोजन समिती अशा दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. 5 व 7 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यक्रम व इतर कार्यक्रम व कामांच्या नियोजनासंदर्भात बैठकी झाल्या आहेत. महोत्सवाचे कामे गुणवत्ता व उत्तम दर्जाच्या होण्याच्या दृष्टीने पर्यटन महामंडळाच्या पॅनलवर असणाऱ्या एजन्सीची निवड करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. तसेच महोत्सवाच्या आयोजनाकरिता महामंडळाला, चिखलदरा सिडको प्रशासन व नियोजन विभागांना निधी मिळणेबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहे. पर्यटकांच्या निवासाच्या व्यवस्थेकरीता हॉटेल्स मालकांना पत्र पाठविण्यात आले आहे, अशी माहिती व्यवस्थापक श्री. सवई यांनी दिली.
चिखलदरा नगरपालिकेकडून निधीची मागणी करण्यात आली आहे. त्यावर कार्यवाही केली जाईल.  जिल्हा माहिती कार्यालयाने महोत्सवाच्या प्रसिद्धीची जबाबदारी पाडावी, तसेच विविध विभागांच्या संकेतस्थळांवरही माहिती प्रसारित करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. महोत्सवात लोकनृत्य स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, कवीसंमेलन, साहसी खेळ, नाईट ट्रेकिंग यांच्यासह पतंग महोत्सवाचे आयोजन करण्याचे व महोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत बस सुरु ठेवण्याचे एस. टी. महामंडळाला कळविण्याचे यावेळी ठरले. बैठकीला चिखलदरा येथील व्यावसायिक संघटना व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.


गारपीटीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे
तातडीने सर्वेक्षण करा
                                             -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील      
* नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत 532 गावांची निवड
* दलीत वस्ती सुधारणा योजने अंतर्गत 30 कोटीचा निधी मंजूर
अमरावती, दि.  12 :  जिल्ह्यातील काही भागात 11 फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गारपीटीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे सर्वेक्षण करुन नुकसानीचे अहवाल जिल्हा प्रशासनास तातडीने सादर करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी आज बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांचेसह गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, लीड बँक मॅनेजर, पोकराचे समन्वयक आदी उपस्थित होते.
ना. पोटे-पाटील म्हणाले, जिल्ह्यात 10 व 11 फेबुवारी रोजी गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला आहे. जिल्हयातील 14 तालुक्यापैकी आठ तालुक्यात अवेळी पर्जन्यमान झाले असल्याचे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे. मोर्शी, वरुड, चांदुर बाजार, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी चिखलदरा व धारणी या आठ तालुक्यात गारपीटीसह पाऊस पडला आहे. या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या क्षेत्रातील हरभरा, गहु, केळी, संत्रा पिकांचे नुकसान झाले असल्याचे सकृत दर्शनी दिसून येते. जिल्ह्यातील एकूण 384 गावातील सुमारे 26 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याचे प्राथमिकरित्या दिसून येते. कृषी तसेच महसूल विभागाने तातडीने नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई अहवाल प्रशासनास सादर करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत 532 गावांची निवड
यावेळी जागतिक बॅंक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा (पोकरा) देखील सविस्तर आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. ते म्हणाले की, या प्रकल्पाविषयी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये ग्रामसभा घेऊन जनजागृती करावी. या प्रकल्पा अंतर्गत समुह तसेच वैयक्तिक प्रकल्पांसाठी शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी अनुक्रमे 75 टक्के व 50 टक्के अनुदान दिले जाते. जिल्ह्याला अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्यासाठी भरीव निधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 532 गावांची निवड करण्यात आली असून सुमारे 58 क्लस्टर हे खारपाण पट्टयासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. उपरोक्त सर्व गावांत पाच टप्प्यांत कामे पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. या प्रकल्पात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी, प्रत्येक तालुका अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. लहान शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम करणे, शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी मदत करणे आदी स्वरुपात शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात येणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यासाठी भरीव निधी मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. खर्चान यांनी केले.

दलीत वस्ती सुधारणा योजने अंतर्गत 30 कोटीचा निधी मंजूर
यावेळी नागरी दलीत वस्ती सुधारणा योजनेविषयी पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. सन 2017-18 या वर्षाकरिता सुमारे 30 कोटी निधी दलीत वस्ती सुधारणा अंतर्गत येणाऱ्या विकास कामांसाठी मंजूर झाला आहे.  त्याअनुषंगाने जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती यांना निधीचे वितरण करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या निधीतून प्रत्येक नगरपरिषद/नगरपंचयातींनी रस्ता व नाला बांधणीच्या कामांना प्राधान्य द्यावे. कुठलेही काम करतांना ते गुणवत्तापूर्ण व पारदर्शकपणे होईल याची दक्षता घ्यावी. विकास कामात प्रत्येक पदाधिकाऱ्यांना सहभागी करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी आज बैठकीत दिले.