गारपीटीमुळे
नुकसान झालेल्या क्षेत्राचे
तातडीने
सर्वेक्षण करा
-पालकमंत्री प्रविण
पोटे-पाटील
*
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत 532 गावांची निवड
*
दलीत वस्ती सुधारणा योजने अंतर्गत 30 कोटीचा निधी मंजूर
अमरावती, दि. 12 : जिल्ह्यातील काही भागात 11 फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व
गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गारपीटीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे
सर्वेक्षण करुन नुकसानीचे अहवाल जिल्हा प्रशासनास तातडीने सादर करावे, असे निर्देश
पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी आज बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन
व्यवहारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांचेसह गटविकास अधिकारी,
तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, लीड बँक मॅनेजर, पोकराचे समन्वयक आदी उपस्थित
होते.
ना. पोटे-पाटील म्हणाले, जिल्ह्यात 10 व 11 फेबुवारी रोजी
गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला आहे. जिल्हयातील 14 तालुक्यापैकी आठ तालुक्यात अवेळी
पर्जन्यमान झाले असल्याचे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या वतीने कळविण्यात आले
आहे. मोर्शी, वरुड, चांदुर बाजार, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी चिखलदरा व
धारणी या आठ तालुक्यात गारपीटीसह पाऊस पडला आहे. या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या
पीकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या क्षेत्रातील हरभरा, गहु, केळी, संत्रा
पिकांचे नुकसान झाले असल्याचे सकृत दर्शनी दिसून येते. जिल्ह्यातील एकूण 384
गावातील सुमारे 26 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याचे प्राथमिकरित्या दिसून
येते. कृषी तसेच महसूल विभागाने तातडीने नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करुन नुकसान
भरपाई अहवाल प्रशासनास सादर करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत 532
गावांची निवड
यावेळी जागतिक बॅंक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी
संजीवनी प्रकल्पाचा (पोकरा) देखील सविस्तर आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. ते
म्हणाले की, या प्रकल्पाविषयी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी प्रत्येक
ग्रामपंचायती मध्ये ग्रामसभा घेऊन जनजागृती करावी. या प्रकल्पा अंतर्गत समुह तसेच
वैयक्तिक प्रकल्पांसाठी शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी अनुक्रमे 75 टक्के व 50 टक्के
अनुदान दिले जाते. जिल्ह्याला अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्यासाठी भरीव निधी
मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 532 गावांची निवड करण्यात
आली असून सुमारे 58 क्लस्टर हे खारपाण पट्टयासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. उपरोक्त
सर्व गावांत पाच टप्प्यांत कामे पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. या प्रकल्पात
अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी, प्रत्येक तालुका अधिकाऱ्यांना सूचित
करण्यात आले आहे. लहान शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम
करणे, शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी मदत करणे आदी स्वरुपात
शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात येणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यासाठी भरीव
निधी मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. खर्चान यांनी केले.
दलीत वस्ती सुधारणा योजने
अंतर्गत 30 कोटीचा निधी मंजूर
यावेळी नागरी दलीत वस्ती सुधारणा योजनेविषयी
पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. सन 2017-18 या वर्षाकरिता सुमारे 30 कोटी निधी दलीत
वस्ती सुधारणा अंतर्गत येणाऱ्या विकास कामांसाठी मंजूर झाला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील महानगरपालिका,
नगरपरिषदा/ नगरपंचायती यांना निधीचे वितरण करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या
निधीतून प्रत्येक नगरपरिषद/नगरपंचयातींनी रस्ता व नाला बांधणीच्या कामांना
प्राधान्य द्यावे. कुठलेही काम करतांना ते गुणवत्तापूर्ण व पारदर्शकपणे होईल याची
दक्षता घ्यावी. विकास कामात प्रत्येक पदाधिकाऱ्यांना सहभागी करावे, असे निर्देश
पालकमंत्र्यांनी आज बैठकीत दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा