महिलांनी उद्योग उभारुन
इतरांना रोजगारक्षम करावे
-पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील
* ‘अस्मिता योजना’ महिला बचत गटाव्दारे राबविणार
* महिला किसान सशक्तीकरण परियोजना,
श्रीमती सुमतीबाई सुकळीकर उद्योगीनी योजनांव्दारे महिलांचे सक्षमीकरण
अमरावती, दि. 24 : महिलांचा सर्वांगिण विकास व सक्षमीकरणासाठी शासन अनेक
उपक्रम राबवित आहे. महिला बचत गटांनी स्वत:चा उद्योग उभारुन आर्थिक स्थैर प्राप्त करणे आवश्यक आहे. यासाठी महिलांनी लघु व गृह उद्योग उभारुन आपल्या क्षेत्रातील इतर महिलांना रोजगार मिळवून द्यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सांयन्स कोअर मैदानावर आयोजित ‘विकास गंगोत्री’
या महिला बचत गटाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री यांचे हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार आनंदराव अडसूळ, धामनगाव रेल्वे पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक के. एम.
अहमद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माया वानखडे यांचेसह जि.प.
सदस्य तसेच चौदाही तालुक्याचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.
श्री. पोटे-पाटील म्हणाले, महिला बचत गटाव्दारे उत्पादीत मालास बाजारपेठ मिळावी तसेच मालाची मागणी वाढावी या हेतूने राज्यात विविध स्तरावर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनीच्या माध्यमातून महिला बचत गटाव्दारे तयार केलेल्या उत्पादनांची ओळख जगपातळीवर होत आहे. जिल्ह्यात सुध्दा अशाप्रकारच्या प्रदर्शनींचे
आयोजन करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने महिला बचत गटाव्दारे निर्मित उत्पादनांना कायमस्वरुपी बाजारपेठ मिळण्यासाठी तालुक्याच्या व जिल्हयाच्या ठिकाणी स्टॉल्स व जागेची
उपलब्धता करुन द्यावी.
महिला उद्योजकांविषयी दाखले देऊन ते पुढे म्हणाले, महिला उद्योजक सक्षम होण्यासाठी एमआयडीसीमध्ये महिलांसाठी
भूखंडाचे आरक्षण लागू करण्यात आले आहे. महिलांना उद्योग उभारणीसाठी पाच लाखापासून ते एक कोटीचे कर्ज वितरण अल्प व्याजदरात बँकेव्दारे करण्यात येत आहे. 60 संख्या असलेल्या महिला बचत गटास 35 टक्के अनुदान सुध्दा राज्य शासनाकडून देण्यात येत आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन सर्वतोपरी त्यांच्या पाठीशी उभे आहे. महिलांनी जास्तीत जास्त उद्योगांची उभारणी करुन ग्रामीण भागातील अधिकाधिक महिलांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहनही श्री. पोटे-पाटील यांनी यावेळी केले.
खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले, महिलांना घरात येणाऱ्या पैशाची बचत करण्याची सवय असते. कुटुंबाची खरी प्रगती महिलांच्या काम करण्यातून व पैश्याच्या बचतीतून होत असते. त्यामुळे जिल्ह्याची प्रगती साधावयाची असल्यास जिल्हा प्रशासनाने महिला बचत गटांव्दारे निर्मित उत्पादनांना कायमस्वरुपी बाजारपेठ मिळवून द्यावी. राज्य शासनाच्या अस्मिता योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी सॅनीटारी नॅपकीन महिला व किशोरवयीन
मुलींना पुरविण्याचे काम महिला बचत गटाव्दारेच करण्यात यावेत, असेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांचा कृषी क्षेत्रामध्ये सहभाग वाढविण्यासाठी तसेच त्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्याकरीता शासनातर्फे महिला किसान सशक्तीकरण परियोजना (MKSP) योजना राबविण्यात
येत आहे. महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे. श्रीमती सुमतीबाई सुकळीकर उद्योगीनी महिला सक्षमीकरण योजने अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या बचत गटांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात येते. या योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन
त्यांनी यावेळी केले. महिलांनी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी बचत गटाच्या माध्यमातून तसेच कठीण परिश्रम करुन सहकार्य करावे. शासन राबवित असलेल्या विविध योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा. महिला व
किशोरवयीन मुलींसाठी अल्प दरात सॅनीटारी नॅपकीन पुरविण्यासाठी असणाऱ्या अस्मिता योजनेत सुध्दा बचत गटांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमानंतर पालकमंत्री महोदय व मान्यवरांनी महिला बचत गटाव्दारे लावण्यात आलेल्या स्टॉल्सला भेट देऊन पाहणी केली.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान ( उमेद ) आणि विकास गंगोत्री या अभियाना विषयी प्रकल्प संचालक के. एम.
अहमद यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन प्राजक्ता राऊत यांनी केले. यावेळी विभागातून मोठया संख्येने महिला मंडळी उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा