जीव वाचविण्यासाठी रक्तदान महत्त्वपूर्ण
-रमेश मावस्कर
Ø 21 कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान
Ø अधिकारी-कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
अमरावती, दि. 27 : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. वैद्यकीय क्षेत्रात रक्तदानाला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्या रक्तदानाने एखाद्याचा जीव वाचविण्यास मदत होत असल्यामुळे प्रत्येकाने सातत्याने रक्तदान करावे, असे आवाहन पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे आज रक्तदान व ओराग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. अपर आयुक्त मंगेश देशमुख, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख, उपायुक्त श्री. निपाने, सहायक आयुक्त जी. व्ही. सुरंजे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. नानवाणी, युनिक हेल्थकेअर ॲन्ड मेडिकल सर्व्हिसेसचे संचालक डॉ. नरेंद्र पाटील, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे गजेंद्र बेलसरे, मनोज सहारे, उद्धव जुकरे यांच्यासह आरोग्य विभागाचे डॉक्टर आणि अधिपरिचारीका उपस्थित होत्या.
श्री. मावस्कर म्हणाले, ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या म्हणण्यानुसार अपघातग्रस्त किंवा आजारी व्यक्तीचा जीव वाचविणारे रक्तदान खऱ्या अर्थाने अतिशय श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे रक्तदात्यालाही अनेक फायदे होतात. मात्र रक्तदान करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तसंक्रमणातून होणारे संसर्ग आजारी व्यक्तीचा जीव घेण्यास कारणीभूत ठरु शकतो. प्रत्येक नागरिकाने रक्तदान करावे. मनातील गैरसमज दूर करून न घाबरता रक्तदान करण्याची आवश्यकता आहे. रक्तदानाने दात्यास कोणताही धोका नसतो.
“रक्तदान करताना डोके आणि मन शांत ठेवणे गरजेचे आहे. रक्तदानासाठी वापरली जाणारी पिशवी आणि सुई नवीन असल्यास काळजीचे कोणतेही कारण नसते. पहिल्यांदाच रक्तदान करीत रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांकडून यासंबंधीची काळजी घेण्यात येते”, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. नरेंद्र पाटील यांनी कुटुंब स्वास्थ योजनेची वैशिष्ट्ये आणि युनिक हेल्थकेअर ॲन्ड मेडिकल सर्व्हिसेस या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेविषयी सविस्तर माहिती दिली. कॅशलेस वैद्यकीय प्रतिपूर्ती संदर्भात कंपनीद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांविषयी माहिती दिली. राज्यातील मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापुर, जळगाव, धुळे, पुणे, सोलापूर, कोकण या शहरात युनिक हेल्थकेअरव्दारे पॅनल असलेल्या नामांकीत रुग्णालयात उपचार करण्यासाठी शासकीय कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना कॅशलेस उपचार पद्धतीचा लाभ देण्यात येतो. राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी कुटुंब स्वास्थ योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिबिरात विविध रक्त चाचण्या, रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, एचआयव्ही संदर्भात अधिकारी-कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली. व्यसनाचे दुष्परिणाम, थॅलेसिमिया, हिमोफिलीया, सिकलसेल, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग प्रतिबंध आणि नियंत्रण, महालॅब्स आदीविषयी मनोज सहारे आणि उद्धव जुकरे यांनी माहिती दिली. शिबिरात विभागीय आयुक्त कार्यालयातील 21 अधिकारी-कर्मचारी यांनी रक्तदान केले. तसेच सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विविध आरोग्य तपासण्या केल्या.
कार्यक्रमासाठी तहसीलदार वैशाली पाथरे, विवेक काळकर, रवि महाले, प्रशांत अडसूळे तसेच विभागीय आयुक्त कर्मचारी संघटनेचे उद्धव काळे, सुजन सोळंके, राजेश चौधरी, सुधीर धावळे, संजय कडू, शरद लोणारे, अतुल बुटे, रविंद्र मोहोड, संबंधा ठाकरे, रुपाली चन्ने, कल्पना वरोकार, विजय इंगळे, उमेश मोहुर्ले आदींनी पुढाकार घेतला. सर्व कर्मचाऱ्यांनी आरोग्य शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा