गुरुवार, ३० जून, २०२२

सुसर्दा येथे खवल्या मांजराची शिकार, अवघ्या तीन तासात आरोपी अटकेत

 

                               सुसर्दा येथे खवल्या मांजराची शिकार

            अवघ्या तीन तासात आरोपी अटकेत

अमरावती, दि. 30  : सुसर्दा गावात खवल्या मांजराची (पॅंगोलिन)  शिकार करणा-या आरोपींना तीन तासांत जेरबंद करण्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या पथकाला यश मिळाले.

    परतवाड्याच्या मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या उपवनसंरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यातील बुधवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास धारणी येथील वनपरिक्षेत्र अधिका-यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून संदेश प्राप्त झाला. सुसर्दा गावात खवल्या मांजराची शिकार झाल्याची गोपनीय माहिती मिळाली असून, त्याची शहानिशा करण्याचे आदेश वनसंरक्षक कार्यालयातर्फे देण्यात आले. या माहितीचा तपास धारणी वनपरिक्षेत्र अधिका-यांनी सुरू केला व माहितीत तथ्य असल्याचे परिसरातील गोपनीय सूत्रांकडून निश्चित झाले.  

    दरम्यान, याबाबत एक छायाचित्रही तपास पथकाला प्राप्त झाले. या छायाचित्रात दिसत असलेले ठिकाण सुसर्दा गावात कुठे आहे किंवा कसे, याचा तपास पथकाने सुरू केला. त्यानंतर तशी जागा एका घरामागे आढळली. त्यानुसार पथकाने तेथील रहिवाशी झनकलाल बाट् कास्देकर यांना ताब्यात घेतले. चौकशीत झनकलाल कासदेकर यांनी कबुली दिली. 

    तीनजणांनी मिळून खवल्या मांजर मारले व मेलेले खवले मांजर घरी घेऊन गेले व नंतर शेतात जाऊन काही लोकांनी वाटून ते खाल्ले असल्याचे चौकशीदरम्यान समोर आले.

 आरोपीच्या बयाणानुसार, त्याच्या घरापासून एक किलोमीटर दूर असलेल्या शेतात दर्शविलेल्या जागेवर जाऊन शोध घेण्यात आला. तेथील बांधावर दगडांच्या खाली प्लास्टिकच्या पिशवीत मांजराचे खवले ठेवल्याचे आढळले. ते तत्काळ जप्त करण्यात आले. याबाबत आरोपी झनकलाल बाट् कासदेकर व झनकलाल मुन्शी कासदेकर यांनी कबुलीजवाब दिला. हा गुन्हा दि 19 जूनला घडल्याचे आरोपींनी सांगितले. त्यांच्याविरुद्ध वनगुन्हा जारी करून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना धारणी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास व कार्यवाही सुरु आहे.

                                                                          0000000

 

बुधवार, २९ जून, २०२२

बारावीची पुरवणी परीक्षा 21 जुलै व दहावीची 27 जुलैपासुन सुरु होणार

 

बारावीची पुरवणी परीक्षा 21 जुलै व

 दहावीची 27 जुलैपासुन सुरु होणार

 

         अमरावती दि. 29 (विमाका)- जुलै- ऑगस्ट 2022 मध्ये विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा 21 जुलै पासुन आणि दहावीची पुरवणी 27 जुलै पासुन आयोजित करण्यात आली आहे.

            उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी सर्वसाधारण व द्विलक्षी विषय लेखी परीक्षा दि. 21 जुलै ते 12 ऑगस्ट, बारावी व्यवसाय अभ्यासक्रम 21 जुलै ते 8 ऑगस्ट, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी 27 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 आहे.

              इयत्ता दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. 26 जुलै 2022 ते 8 ऑगस्ट 2022 व इयत्ता बारावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 20 जुलै, 2022 ते सोमवार दि. 8 ऑगस्ट 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे अमरावती विभागीय मंडळाचे सहसचिव तेजराव काळे यांनी कळविले आहे.

0000000

बियाण्याची उगवण न झालेल्या शेतीक्षेत्राचे पंचनामे करण्याचे निर्देश, बोगस बियाणे विकणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

बियाण्याची उगवण न झालेल्या शेतीक्षेत्राचे पंचनामे करण्याचे निर्देश

बोगस बियाणे विकणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

-            पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 29 (विमाका) : बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेबाबत तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. बोगस बियाणे विकणा-या कंपन्या व विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. त्याचप्रमाणे, उगवण न झालेल्या शेतीक्षेत्राचे पंचनामे करण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. 

 

जिल्ह्यात बोगस बियाणे विकणे, बियाण्याची उगवण न होणे आदी तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. तिवसा तालुक्यात ‘विक्रांत’ या व्हेरायटीचे सोयाबीन बियाणे पेरल्यानंतर उगवण न झाल्याची तक्रार शेतकरी बांधवांनी केली आहे. या क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करून घ्यावेत. प्रत्येक शेतकरी बांधवाशी संवाद साधून माहिती जाणून घ्यावी. त्याचप्रमाणे, बोगस बियाणे विकणा-यांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

 

खते, बी-बियाणे यांचा काळा बाजार, साठेबाजी, बोगस बियाणे विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी व संबंधित सर्व विभागांनी काटेकोर कार्यवाही करावी. भरारी पथकांनी सक्रिय होऊन सातत्याने तपासण्या कराव्यात. शेतकरी बांधवांची फसवणूक झाल्यास खपवून घेतले जाणार नाही. कुठेही गैरप्रकार आढळून येत असतील तर दोषींवर कडक कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.

 

जिल्ह्यात कुठेही बोगस, अनधिकृत बियाणे विक्री आदींची माहिती मिळाल्यास तत्काळ भरारी पथकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जादा दराने विक्री, मुदतबाह्य मालाची विक्री, साठेबाजी, अनधिकृत निविष्ठांची विक्री अशा तक्रारींचे निराकरण करण्यासाठी भरारी पथक व तक्रार निवारण कक्ष स्थापण्यात आला आहे. जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्षाचा भ्रमणध्वनी क्र. 9325962775 आणि कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-233-4000 असा आहे.

 

00000

शुक्रवार, २४ जून, २०२२

राज्य मागासवर्ग आयोगामार्फत जन सुनावणी 5 जुलै रोजी

 

राज्य मागासवर्ग आयोगामार्फत जन सुनावणी 5 जुलै रोजी

         अमरावती दि. 24 (विमाका) : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने पुणे, अमरावती व नाशिक येथे आयोगाने जन सुनावणी आयोजित केलेली आहेत. अमरावती विभागातील ही सुनावणी दिनांक 5 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील  सभागृहात सकाळी 11 वाजता होणार असुन या सुनावणीस हलवाई, हलबा कोष्टी, अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर, गुरुडी, गुरुड, गुरड, कापेवार, गु. कापेवार, गुरुड कापेवार, गुरुडा कापेवार इत्यादी, हडगर, तेलंगी ऐवजी तेलगी अशी दुरुस्ती करणेबाबत, केवट समाजातील तागवाले-तागवाली या जाती/जमाती उपस्थित  राहतील असे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे संशोधन अधिकारी मेघराज भाते यांनी कळविले आहे.

00000

वैयक्तिक पाणी उपसा परवाना करिता 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावे

 

वैयक्तिक पाणी उपसा परवाना करिता

31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावे 

अमरावती, दि.24 (विमाका)  : अमरावती पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या जलाशयातुन व जलाशयालगतचे पाणी ज्या शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनाकरिता उपसा करावयाचे आहे, त्या शेतकऱ्यांनी याबाबत परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यांनी नियोजित पाणी वापर संस्था कार्यालये किंवा वैयक्तिक पाणी उपसा परवाना करिता दि. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज तसेच अर्जासोबत मूळ सातबारा उतारा सादर करावा. विहीत अर्जाचा नमुना उपविभागीय कार्यालयात उपलब्ध आहे.

दर्यापुर तालुक्यातील सामदा (सौं) लघु पाटबंधारे प्रकल्प या जलाशयालगतचे क्षेत्र ८ हे. मौजा- कासमपुर, क्षेत्र ११ हे. मौजा- सामदा, क्षेत्र ८ हे. मौजा-बाभळी, क्षेत्र १९ हे. मौजा- सांगळुद, जलाशयालगतच्या क्षेत्राचा समावेश आहे. अमरावती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी कळविले आहे.

                                                   0000000

वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण करुन पर्यटनदृष्ट्या विकसीत करणार - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 







वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण करुन

पर्यटनदृष्ट्या विकसीत करणार

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

अमरावती दि. 24 (विमाका) : अमरावती महापालिका क्षेत्रात येणाऱ्या वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व येथील परिसर पर्यटनदृष्ट्या विकसीत करण्यासाठी गतीने कार्यवाही करावी. या स्थळाच्या विकास कामांना चालना मिळण्यासाठी पर्यटन विभाग, वन विभाग व नगररचना विभागाने समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज दिल्या.

वडाळी तलाव व परिसराचे सौंदर्यीकरण व येथील निसर्ग पर्यटन विकसीत करण्याच्या दृष्टीने श्रीमती कौर यांनी पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.महापालिका आयुक्त प्रविण आष्टीकर, सहायक आयुक्त नंदकिशोर तिखीले, सहायक संचालक नगररचना रंकाळे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, तांत्रिक सल्लागार जीवन सदार, शहर अभियंता रविंद्र पवार, प्रकल्प अभियंता राजेश आगरकर, उपअभियंता प्रमोद तिरपुडे आदी उपस्थित होते.

वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व निसर्ग पर्यटन क्षेत्र निर्माण करण्यासाठी महापालिकेकडुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यात‍ आला होता. त्या अनुषंगाने अमृत सरोवर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीपैकी प्रथम 20 कोटी रुपये प्राप्त होणार असुन त्यात करण्यात येणाऱ्या कामांची माहिती श्रीमती कौर यांनी घेतली. या निधीअंतर्गत तलावातील पाण्याचे शुद्धीकरण, तलावात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया, तलाव परिसरात दगडांची फरसबंदी आदी कामे योग्य पद्धतीने करण्याच्या सुचना श्रीमती कौर यांनी संबंधितांना दिल्या.

वनविभाग क्षेत्रात येणाऱ्या परिसरात निसर्ग पर्यटन विकसीत करण्यासाठी वनविभागाने प्रस्ताव सादर करावे. या कामासाठी जिल्हा नियोजन विकास निधीतुन 1 कोटी प्राप्त होणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली. या परिसरात निसर्ग पर्यटनाच्या निर्मितीसाठी पर्यटन विभाग, वनविभाग व नगरविकास विभागाने निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तात्काळ करण्यात यावे, असे श्रीमती कौर यांनी सांगितले. यावेळी वनविभाग, नगर रचना, पर्यटन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

000000

गुरुवार, २३ जून, २०२२

शेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाला प्राधान्य द्यावे - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 









शेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाला प्राधान्य द्यावे

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

शेतीपुरक व्यवसायाचे प्रशिक्षण आयोजन करण्याच्या सुचना

 

अमरावती दि. 23 (विमाका) : शेती व्यवसायातुन अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.  कृषी विभागाने प्रगतीशील शेतकऱ्यांना सहभागी करुन प्रशिक्षणाचे आयोजन करावे. प्रशिक्षणाच्या माध्यमातुन कुक्कूटपालन, पशुपालन आदींबाबत माहीती शेतकऱ्यांना देण्यात यावी. कृषी क्षेत्रात उत्पादनवाढीसाठी जोड व्यवसायाबाबत प्रशिक्षण देणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले.

अंजनगाव बारीचे म्हासला गावातील प्रगतीशील शेतकरी रविंद्र मेटकर यांच्या मातोश्री फार्मला श्रीमती कौर यांनी भेट दिली व पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. पशुसंवंर्धन उपायुक्त संजय कावरे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी पुरुषोत्तम सोळंके, तहसिलदार संतोष काकडे, प्रकल्‍प संचालक (आत्मा) अर्चना निस्ताने, पशुधन विकास अधिकारी डॉ. जयंत माहुरे, गटविकास अधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख, तालुका कृषी अधिकारी किशोर हतांगळे, मंडळ कृषी अधिकारी गीता कवने, घातखेड कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रश्र डॉ. अतुल कळसकर, विषयतज्ञ डॉ. शरद कठाळे व श्री मेटकर यांच्यासह कुटुंबिय उपस्थित होते.

कुक्कुटपालनासाठी कोंबडीच्या जातीची निवड, शेडची रचना, पक्ष्यांची वाढ आणि त्यानुसार व्यवस्थापन, पक्ष्यांचे खाद्य व पाणी व्यवस्थापन, पक्ष्यांसाठी योग्य तापमान व्यवस्थापन व पक्ष्यांच्या खाद्यपदार्थाच्या निर्मितीबाबतची माहिती श्रीमती कौर यांनी घेतली.

वर्ष 2008 मध्ये श्री मेटकर यांनी बँक ऑफ इंडिया कडून 25 लाखाचे कर्ज घेत कोंबड्यांचा व्यवसाय सुरु केला. त्या कोंबड्यांची संख्या आता दिड लाखांपर्यंत झाली आहे. या कोंबड्यांपासून प्रति दिवस जवळपास 90 हजार अंडी मिळतात. कुकुटपालना बरोबरच कापूस, विविध फळे-पिकांची लागवड सेंद्रिय पध्दतीने करत कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्याचे प्रयोग श्री मेटकर यांनी यशस्वी केले आहेत. आजघडीला त्यांच्या फार्ममध्ये स्वयंचलित पोल्ट्री फार्ममध्ये थ्रीटायर पध्दतीचे आठ शेड आहेत. त्यात दीड लाख पक्षी आहेत. त्यापासून वर्षभरात त्यांना दीड कोटी रुपये उत्पन्न मिळते. सात एकर मध्ये संत्रा, मोसंबी, चिकु, आंबा, पेरु, फणस, विविध मसाले, नारळाचे उत्पन्न फळबागेतुन घेत असल्याची माहिती श्री मेटकर दिली.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आदर्श शेतकरी पुरस्कार, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा नवसंशोधक पुरस्कार, राज्यशासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल श्रीमती कौर यांनी श्री मेटकर यांचे अभिनंदन केले. श्रीमती कौर यांनी यावेळी मिनी ट्रक्टर चालवण्याचा अनुभव यावेळी घेतला.

000000

सोमवार, २० जून, २०२२

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विभागीय क्रीडा संकुलात मंगळवारी योग कार्यक्रम

 योगा फॉर ह्युमॅनिटी

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विभागीय क्रीडा संकुलात मंगळवारी योग कार्यक्रम

अमरावती, दि. 19 : ‘मानवतेसाठी योग’ (योगा फॉर ह्युमॅनिटी) असे ब्रीद घेऊन यंदाचा आंतरराष्ट्रीय योगदिन मंगळवारी (21 जून) साजरा करण्यात येत आहे. शासनाचे विविध विभाग व संघटनांच्या सहकार्याने अमरावतीत विभागीय क्रीडा संकुलात मंगळवारी सकाळी 7 ते 8 योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी दिली.

योगशास्त्र ही प्राचीन भारतीय संस्कृतीची अवघ्या जगाला मिळालेली अमूल्य देणगी आहे. योग व्यक्तीला अंतर्बाह्य निरोगी करून दीर्घायुष्य प्रदान करते. जीवन तणावमुक्त, भयमुक्त व निरामय राहण्यासाठी योगाचा स्वीकार सर्वत्र व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येत आहे.

            विभागीय क्रीडा संकुलातील कार्यक्रमात अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी, ज्येष्ठ योग प्रसारक, क्रीडापटू उपस्थित राहणार आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. संतान, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी यांनी केले आहे.

            क्रीडाप्रेमी व नागरिकांनी विभागीय क्रीडा संकुलात सकाळी 6.30 वाजता उपस्थित राहावे व येताना पाण्याची बाटली व चटई सोबत आणावी, असे आवाहनही त्यांनी केले.

            या उपक्रमाला जिल्हा प्रशासन, पोलीस, शिक्षण विभाग, विद्यापीठ, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, क्रीडाभारती, नेहरू युवा केंद्र, बृहन्महाराष्ट्र योग परिषद, भारत स्वाभिमान ट्रस्ट, युवा भारत व किसान पंचायत, श्री शिवाजी शिक्षण संस्था, वंदे मातरम योग प्रसारक मंडळ यांचे सहकार्य मिळाले आहे.

शुक्रवार, १७ जून, २०२२

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा सुरु

 

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा सुरु

 

         अमरावती दि. 17 (विमाका) : दहावीच्या निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे शिक्षण मंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरु ठेवण्यात येत आहे. सदर समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.

त्यानुसार 8432592358, 7249005260, 7387400970, 9307567330, 7822094261, 9579159106, 9923042268, 7498119156, 8956966152 हे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील याची विद्यार्थी, पालक यांनी नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

000000

शुक्रवार, १० जून, २०२२

पेरणीची घाई नको

 

पेरणीची घाई नको

कृषी विभागाचा सल्ला

अमरावती दि. 10 (विमाका):  सध्या मृग नक्षत्रास सुरूवात झाली असून अमरावती विभागात दि. 7 जून पर्यंत केवळ 1.9 मिमी पाऊस झालेला आहे. येत्या 14 जूनपर्यत मोसमी वारे सर्वत्र पोहोचून महाराष्ट्रात सार्वत्रिक पावसास सुरूवात होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तथापि, चांगला पाऊस होऊन जमिनीत पुरेशी ओल निर्माण होईपर्यंत पेरणी करू नये, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे यांनी केले आहे.

बदलत्या हवामानानुसार शेती व्यवस्थापन व योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. पावसाचे उशिरा होणारे आगमन, पाऊस आल्यानंतर पडणारा खंड यामुळे पेरणी व पिके वाया जाऊन श्रम आणि आर्थिक फटका शेतकरी बांधवांना बसतो. त्यामुळे पेरणीची घाई करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

अमरावती विभागात खरीप हंगामाचे सरासरी पेरणी क्षेत्र 31 लाख 49 हजार 633 हेक्टर आहे. व-हाडातील खरीप हंगामातील मुख्य पिके सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद ही आहेत. ही पिके बहुतांश ठिकाणी कोरडवाहू पद्धतीने घेतली जातात. सर्व मुख्य पिकांची पेरणी 30 जूनपर्यंत करता येते. त्याचप्रमाणे, मूग व उडीद ही पिके वगळता इतर पिकांची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येणे शक्य आहे. त्यामुळे पाऊस लांबला तरीही पेरणीसाठी पुरेसा अवधी शिल्लक असल्याने पेरणीची घाई न करण्याची सूचना देण्यात आली आहे.

विभागात शेतकरी बांधवांची शेतीची मशागतीची कामे आटोपली आहेत. पेरणीसाठी जमिनीमध्ये पुरेशी ओल असणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्यास सुरवात करावी. पुरेसा पाऊस झाल्यावर पेरणी करताना मूलस्थानी जलसंधरण म्हणून रूंद सरीवरंबा किवा पट्टा पेर पदधतीने पेरणी करावी, असे आवाहन श्री. मुळे यांनी केले आहे.

000000

वन्यजीव हत्याप्रकरणी तपास सुरू; शवविच्छेदनानंतर नमुने प्रयोगशाळांना पाठविले उपवनसंरक्षक दिव्य भारती यांची माहिती

 

वन्यजीव हत्याप्रकरणी तपास सुरू;

शवविच्छेदनानंतर नमुने प्रयोगशाळांना पाठविले

उपवनसंरक्षक दिव्य भारती यांची माहिती

अमरावती दि. 10 (विमाका): सिपना वन्यजीव विभागांतर्गत मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील रायपूर परिक्षेत्रात पाच चौसिंगा व दोन भेकर अशा एकूण सात वन्यप्राण्यांची हत्या झाल्याचे निदर्शनास आल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास होत आहे. या प्राण्यांचे शवविच्छेदनानंतर नमुने तपासणीसाठी हैदराबाद व नागपूर येथील प्रयोगशाळेला पाठविण्यात आल्याची माहिती उपवनसरंक्षक दिव्य भारती यांनी दिली.

 

उपवनसंरक्षक श्रीमती भारती, सहायक वनसंरक्षक के. एस. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एम. शेलार, वनपाल शेख इक्बाल आदींसमक्ष चिखलद-याचे पशुवैद्यकीय अधिकारी अनिल पुंड व त्यांच्या चमूने  मृत सात वन्यप्राण्यांचे शवविच्छेदन करुन दिले. शवविच्छेदनाचे, तसेच घटनास्थळी प्राप्त नमुने हैदराबादेतील शासकीय प्रयोगशाळा व नागपूरमधील गोरेवाडा आणि अमरावतीतील प्रादेशिक न्यायसहायक वैद्यकीय प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले आहेत.

वनविभागातील अधिकारी व वनकर्मचारी यांनी या क्षेत्रामध्ये पायदळ गस्त घालून तपास केला. प्राथमिक माहितीनुसार संशयितांची चौकशी करून बयाण नोंदविण्यात आले आहे. पुढील तपास सुरु आहे, उपवनसंरक्षकांनी सांगितले.

000000

बारावीच्या विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षेचे अर्ज 17 जून पर्यंत सादर करावे

 

बारावीच्या विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षेचे

अर्ज 17 जून पर्यंत सादर करावे

अमरावती दि. 10 (विमाका): इयत्ता बारावीच्या मार्च-एप्रिल 2022  मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जून 2022 मध्ये जाहीर करण्यात आला. बारावीची शिक्षण मंडळामार्फत पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये घेण्यात येणार आहे.

या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सादर करावे. विद्यार्थ्यांनी आपले अर्ज नियमित शुल्कासह शुक्रवार दि. 10 ते 17 जून 2022 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरावयाचे आहे, असे अमरावती विभागीया महामंडळाचे सहसचिव तेजराव काळे यांनी कळविले आहे.

000000

 

 

 

 

गुरुवार, ९ जून, २०२२

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा सुरु

 

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा सुरु

अमरावती दि. 09 (विमाका):  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचा निकाल आज दिनांक 8 जून रोजी ऑनलाईन जाहीर झाला. निकालानंतर अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्यमंडळ स्तरावरुन ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरु करण्यात आली आहे. या समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे  आहेत.

8432592358, 7249005260, 7387400970, 9307567330, 897547847, 7822094261, 9579159106, 9923042268, 7498119156, 8956966152.

भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुदेशक परीक्षेच्या निकालानंतर 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील, असे अमरावती विभागीय मंडळाचे सहसचिव तेजराव काळे यांनी कळविले आहे.

000000

विभागीय लोकशाही दिन 13 रोजी

 

विभागीय लोकशाही दिन 13 रोजी

अमरावती दि. 09 (विमाका): दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 13 जून रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी शासकीय विभागाशी निगडित आपल्या तक्रारी, गाऱ्हाणी इत्यादी संदर्भातील प्रकरणे, निवेदन लेखी स्वरुपात सादर करावे. नागरिकांनी त्यांच्या तक्रारीं पोस्टाद्वारे, dcgamravati@gmail.com/dcg_amravati@rediffmail.com या संकेतस्थळावर किंवा व्यक्तीश: विभागीय आयुक्त कार्यालयात हजर राहावे. तसेच उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक उपायांचे पालन करावे असे विभागीय उपआयुक्त संजय पवार यांनी कळविले आहे.

000000

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा

 

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात

शिवस्वराज्य दिन साजरा

अमरावती दि. 09 (विमाका):  शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे प्रभारी प्राचार्य प्रा. जी. ए. ढोमाणे, प्रा. डॉ. ए. एम. महल्ले समन्वयक, अध्यापक, व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.  शिवस्वराज्य दिनानिमित्त  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवचरित्रपर व्याख्यान, गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन/लघूपट प्रदर्शन स्पर्धा, प्रदर्शन/रांगोळी स्पर्धेचे आयोजन, सामाजिक संदेश देणारी शिवज्योत रॅलीचे आयोजन इत्यादी कार्यक्रमात विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले. सहभागी विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या हस्ते बक्षिस वितरीत करण्यात आले.

000000

बुधवार, ८ जून, २०२२

शेतीपुरक व्यवसायातील अडचणींबाबत सर्वेक्षण करा - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 

जलसंपदा राज्यमंत्र्यांकडून पशुसंवर्धन व जलसंपदा विभागाचा आढावा





शेतीपुरक व्यवसायातील अडचणींबाबत सर्वेक्षण करा

-          राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

अमरावती दि. 08 (विमाका): चांदुर बाजार व अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडील दुभत्या, भाकड जनावरांच्या माहितीच्या संकलनाबरोबरच शेतकऱ्यांना पूरक व्यवसायात येणाऱ्या समस्यांची माहिती कोष्टक स्वरूपात सादर करावी. याबाबत सर्व शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत उपाययोजना करण्यात याव्या असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज दिले.

पशुसंवर्धन व जलसंपदा विभागाच्या विविध विषयांचा आढावा शासकिय विश्रामगृहात  घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ संजय कावरे, सहायक आयुक्त डॉ राजेंद्र पेठे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ पुरुषोत्तम सोळंके आदी उपस्थित होते.

चांदुर बाजार तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाला अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. आवश्यक जागेच्या मागणीबाबत प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचा सूचना त्यांनी दिल्या. धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन झाले असून रुग्णालयानजिक असलेला पशुवैद्यकीय दवाखाना नगरपंचायतीच्या जागेवर तातडीने स्थलांतरित करण्यात यावा. यासाठी प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाकडून हा प्रस्ताव देऊन  पाठपुरावा करण्याचे निर्देश श्री. कडू यांनी दिले.

पुनवर्सन प्रक्रियेतील समस्या प्राधान्याने सोडवाव्या

            मोर्शी तालुक्यातील निम्न चारगड प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित कामांचा आढावा  घेताना १७० कुटूंबियांच्या घराच्या मुल्यांकनात राहिलेल्या त्रुटीबाबत अहवाल सादर करण्यात यावा. तक्रारदात्यांच्या घराच्या फेरमुल्यांकनाची प्रक्रिया व त्याबाबतचे फेरनिवाडे तात्काळ करण्यात यावे. येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेतील समस्या प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश त्यांनी दिले. वरुड तालुक्यातील नागठाणे गावाला मुबलक पाणी मिळण्यासाठी जलवितरण वाहिनीतील दोष दुर करणे व  पुरेसा विसर्ग  मिळणे आवश्यक आहे. हे काम संबंधित कंत्राटदाराने पुर्ण न केल्यास त्याला काळया यादीत टाकण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. मुख्य अभियंता अभय पाठक, अधिक्षक अभियंता मेघा आक्केवार, उपविभागीय अभियंता सोहन मडघे आदी उपस्थित होते.

000000

मंगळवार, ७ जून, २०२२

तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण आरोग्ययंत्रणा बळकट करा - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 




तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण

आरोग्ययंत्रणा बळकट करा 

-         राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

प्रायोगिक तत्वावर ग्रामीण भागात टेलिमेडिसीन सेवा  

अमरावती दि. 07 (विमाका): ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषोपचार व कुशल तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान प्रणाली व यंत्रणेचा वापर करावा. धारणी व चिखलदरासारख्या  दुर्गम भागातील रुग्णालयांमध्ये टेलिमेडिसीन प्रणाली सुरळीत व नियमीत करावी. तेथील नागरिकांना मुंबई, पुणे, नागपुर येथील तज्ञ डॉक्टरांचे उपचार मिळवुन द्यावेत त्याचप्रमाणे प्रायोगिक तत्वावर ग्रामीण भागात टेलिमेडिसीन सेवा सुरु होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले.

जलसंपदा राज्यमंत्र्यांनी आरोग्य विभाग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा आढावा शासकीय विश्राम गृहात स्वतंत्र बैठकांद्वारे घेतला. त्यावेळी ते बोलत होते.  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ सुरेंद्र ढोले, चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ संजय पवार, डॉ रविंद्र चव्हाण, चुरणीचे वैद्यकीय अधिक्षक रामदेव वर्मा आदी उपस्थित होते.

योग्य नियोजन करण्यात यावे

राज्यमंत्री श्री कडू म्हणाले की, धारणी चिखलदरा बरोबरच लगतच्या अचलपुर, चांदुर बाजार, अकोट येथील रुग्णालयांतही अद्ययावत तंत्रज्ञान प्रणाली विकसीत करावी.  रुग्णालयांमध्ये डिजीटल कक्षाची उभारणी करण्यात यावी. तांत्रीकदृष्ट्या या कक्षात सर्व सुविधांची निर्मिती करण्यात यावी. सर्व तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधुन दुरदृष्यप्रणालीद्वारे त्यांच्या उपलब्धतेच्या वेळापत्रकानुसार रुग्णांवर उपचार करण्यात यावे. याबाबतचे माहिती देणारे फलक रुग्णालयांमध्ये लावण्यात यावे. बालरोग, स्त्रीरोग, ह्दयरोग, यकृत, मेंदू रोग, मानसिक आजार, जुनाट आजार आदी आजांरावर उपचार करण्याऱ्या तज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात यावे. यासाठी सामाजीक उत्तरदायित्व निधीची मदत घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले. टेलीमेडिसीन सेवा अव्याहत चालण्यासाठी इंटरनेट सेवा सुरळीत असणे आवश्यक आहे. तशी सुविधा उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जलसंपदा राज्यमंत्र्यांनी बांधकाम विभागाच्या विविध कामांचा आढावा घेतला. साबांविचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते. चांदुर बाजार वळण रस्ता, बहिरम वळण रस्ता, अचलपुर बायपास व धारणी खामला रस्ता तसेच मोझरी बहिरम रस्ता निर्मितीच्या कामाची माहिती श्री कडू यांनी घेतली. ही कामे लवकरात लवकर पुर्ण करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.  

                                                        0000000000    

 

 

 

सोमवार, ६ जून, २०२२

श्री रूक्मिणीमातेच्या पालखीचे अमरावतीत भव्य स्वागत

 









श्री रूक्मिणीमातेच्या पालखीचे अमरावतीत भव्य स्वागत

पालकमंत्र्यांसह अनेक मान्यवरांकडून पूजन

लोकसेवेसाठी तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण

अमरावती, दि. ६ : विदर्भातील ४२७ वर्षांची प्राचीन परंपरा असलेल्या श्री रुक्मिणी मातेच्या पालखीचे भव्य स्वागत अमरावतीतील बियाणी चौकात करण्यात आले. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, श्री राजराजेश्वर महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखीपूजन व वारकऱ्यांचे स्वागत केले. श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेच्या वतीने तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पायदळ दिंडी पालखीच्या दर्शनासाठी शेकडो अमरावतीकर उपस्थित होते. पालखीच्या स्वागतानिमित्त बियाणी चौकात व्यासपीठ उभारण्यात येऊन श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. त्यासभोवती फुलांच्या माळा, रांगोळ्या, स्वागतफलकांनी संपूर्ण चौक सुशोभित करण्यात आला होता. सुमधूर अभंगवाणी सादर करणाऱ्या संगीत पथकासाठी स्वतंत्र व्यासपीठ उभारण्यात आले होते. अशा उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पालखी चौकात येताच वारकरी व भाविकांनी 'रुक्मिणीवल्लभ कृष्ण हरी'चा एकच जयघोष केला. यावेळी भक्तिमय अभंगवाणी व टाळमृदंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते. कोविड साथीमुळे दोन वर्षाच्या निर्बंध संपल्यानंतर मुक्त वातावरणात पालखीचे अंबानगरीत आगमन झाल्यामुळे वारकरी बांधवांमध्ये उत्साह संचारला होता. श्री राजराजेश्वर माऊली महाराज यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पालखीचे पूजन पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या व विविध मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी श्री विठ्ठल, श्री रूक्मिणीमातेची आरती करण्यात आली. प्रत्येक भाविकाला पालखीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी चौकाच्या मधोमध उभारलेल्या व्यासपीठावर पालखी थांबवून भाविकांना पूजन व दर्शनाची सोय करून देण्यात आली. बाजूला महिला भाविकांनी गोल रिंगण करून विठ्ठलरुक्मिणीच्या नामघोषात फेर धरला. पालकमंत्री श्रीमती ठाकूर याही त्यात सहभागी झाल्या. काहींनी फुगड्याही खेळल्या. श्री पांडुरंग व श्री रुक्मिणीमातेचा जयघोष करत भक्तिरसात भाविक दंग झाले होते.  

 राज्यात यंदा सर्वत्र चांगला पाऊस होऊ दे. धनधान्य पिकू दे. बळीराजा समृद्ध होऊ दे. सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थना सर्वांनी विठुराय व रुक्माईचरणी यावेळी केली. या स्वागतसोहळ्याला माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अनेक पदाधिकारी, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

लोकार्पण झालेल्या तीन रूग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिका पालखीसमवेत जाणार आहे. डॉक्टरसमवेत सर्व उपचार सुविधा त्यात उपलब्ध असतील.

०००००००