पेरणीची घाई नको
कृषी विभागाचा सल्ला
अमरावती दि. 10 (विमाका): सध्या मृग नक्षत्रास सुरूवात झाली असून
अमरावती विभागात दि. 7 जून पर्यंत केवळ 1.9 मिमी पाऊस झालेला आहे. येत्या 14
जूनपर्यत मोसमी वारे सर्वत्र पोहोचून महाराष्ट्रात सार्वत्रिक पावसास सुरूवात
होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तथापि, चांगला पाऊस होऊन जमिनीत पुरेशी ओल निर्माण
होईपर्यंत पेरणी करू नये, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे यांनी
केले आहे.
बदलत्या हवामानानुसार शेती व्यवस्थापन व योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
पावसाचे उशिरा होणारे आगमन, पाऊस
आल्यानंतर पडणारा खंड यामुळे पेरणी व पिके वाया जाऊन श्रम आणि आर्थिक फटका शेतकरी
बांधवांना बसतो. त्यामुळे पेरणीची घाई करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
अमरावती विभागात खरीप हंगामाचे सरासरी पेरणी क्षेत्र 31 लाख 49 हजार 633
हेक्टर आहे. व-हाडातील खरीप हंगामातील मुख्य पिके सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद
ही आहेत. ही पिके बहुतांश ठिकाणी कोरडवाहू पद्धतीने घेतली जातात. सर्व मुख्य
पिकांची पेरणी 30 जूनपर्यंत करता येते. त्याचप्रमाणे, मूग व उडीद ही पिके वगळता
इतर पिकांची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येणे शक्य आहे. त्यामुळे पाऊस लांबला तरीही
पेरणीसाठी पुरेसा अवधी शिल्लक असल्याने पेरणीची घाई न करण्याची सूचना देण्यात आली
आहे.
विभागात शेतकरी बांधवांची शेतीची मशागतीची कामे आटोपली आहेत. पेरणीसाठी
जमिनीमध्ये पुरेशी ओल असणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान 75 ते 100 मिमी पाऊस
झाल्यानंतरच पेरणी करण्यास सुरवात करावी. पुरेसा पाऊस झाल्यावर पेरणी करताना
मूलस्थानी जलसंधरण म्हणून रूंद सरीवरंबा किवा पट्टा पेर पदधतीने पेरणी करावी, असे
आवाहन श्री. मुळे यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा