शुक्रवार, २१ जुलै, २०२३

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

 अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी संकेतस्थळावर

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ 

अमरावती दि. 21 :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी प्रणालीवर विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती, फ्रीशिप व इतर शैक्षणिक योजनांचे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन भरण्यासाठी तसेच सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील अर्ज पुन्हा सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना दि.31 जुलैपर्यंत शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे, अमरावती समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी कळविले आहे.

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना आदी शिष्यवृत्ती योजना अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येतात.

महाडीबीटी प्रणालीवरील अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्यास वारंवार मुदतवाढ देण्यात आलेली आहे. परंतु अद्यापपर्यंत काही विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरलेले नाही.

सद्यस्थितीत शैक्षणिक सत्र 2023-24 सुरु झालेले असून या शैक्षणिक वर्षातील अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरु झाले असून ज्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अद्याप पर्यंत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील अर्ज महाडीबीटी पोर्टल भरलेले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी तसेच सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील अर्ज Re-apply करण्यासाठी विद्यार्थ्यांना दि.31 जुलै, 2023 पर्यंत शासनाकडून अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यानंतर मागील वर्षाचे अर्ज भरण्यास कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही.

या जाहीर आवाहनाद्वारे विद्यार्थी व महाविद्यालयांना कळविण्यात येते की, अनुसूचित जाती प्रवर्गातील योजनेस पात्र सर्व विद्यार्थी यांनी शासनाच्या https://mahadbtmahait.gov.in  महाडीबीटी या संकेत स्थळावर दि.31 जुलै, 2023 पर्यंत अर्ज भरण्यात यावेत. तसेच सर्व महाविद्यालयीन प्राचार्य यांना सुद्धा कळविण्यात येते की, आपले महाविद्यालयात प्रवेशित योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील संपुर्ण विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी संकेत स्थळावर विहित मुदतीपूर्वी अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज भरण्यापासून व शिष्यवृत्ती लाभा पासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य यांची असून अशा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक शुल्क महाविद्यालयास आकारता येणार नाही, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

0000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा