पाणी टंचाईच्या निवारणार्थ
पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करा
* पाणी व चारा टंचाई, उष्माघातापासून बचावासाठी
उपाययोजनांबाबत घेतला आढावा
अमरावती, दि. ९ : दरवर्षी उन्हाच्या झळा वाढल्या की पाणी टंचाईची समस्या उद्भवते. यावर मात करण्यासाठी पाणी वाचविणे, पाण्याच्या स्त्रोतांचे पुनर्भरण तसेच उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने विभागातील सर्व संबंधित यंत्रणांनी आपसात समन्वय राखून पाणी टंचाईच्या निवारणार्थ आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला आज दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पाणी टंचाई, चारा टंचाई व उष्माघातापासून बचावासंबंधी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाबाबत डॉ. पाण्डेय यांनी आढावा घेतला. यावेळी उपायुक्त संजय पवार, नगरविकास विभागाचे उपायुक्त श्री. फडके, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के प्रत्यक्षरित्या तसेच विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते.
डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी पावसाचे पाणी साठवणे, पाण्याचे पुनर्भरण प्रयोग राबविणे, वनाच्छादित क्षेत्रात वाढ करणे आदी उपाययोजनांसह उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करण्यात करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ज्या गावात पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवली आहे, त्याठिकाणी नियमितपणे टँकरने पाणी पुरवठा सुरु ठेवावा. महसूल व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने आवश्यकतेनुसार परिसरातील सर्व विहीरींचे अधिग्रहण करुन नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे. त्यासाठी सर्वप्रथम विहीरींच्या जलशुध्दीकरणाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. पाणी पिण्यायोग्य असल्याचे खात्री करुनच विहीरींचा पाणी पुरवठा करण्यात यावा. या कामात कुठलिही हयगय होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यातील चारा टंचाईच्या निवारणार्थ जनावरांच्या संख्येनुसार सद्यस्थितीत उपलब्ध चारा व पुढील दोन महिने चारा उपलब्ध होईल, यादृष्टीने आताच नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा सुरु असलेल्या गावांची संख्या, टंचाईग्रस्त गावात पाणी पुरवठ्यासाठीची एकूण टँकर्सची संख्या, संभाव्य टँकर्सची मागणी असलेली गावे, अधिग्रहीत विहीरींची संख्या, पाणी टंचाईच्या निवारणार्थ केलेल्या जिल्ह्यांनी केलेल्या उपाययोजना, जनावरांच्या पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था, चारा टंचाईच्या अनुषंगाने नियोजन, धरणातील पाणी साठा, उपलब्ध पाणी साठा आदीबाबत विभागीय आयुक्तांनी पाचही जिल्ह्यांचा सविस्तर आढावा घेतला.
गत पाच दिवसांत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर आहे. उष्णतेची लाट आगामी काही दिवसांत सुरु राहणार असल्याचे हवामान खात्याने वर्तविले आहे. त्यामुळे उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. उष्माघाताच्या रुग्णांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी आरोग्य विभागाने त्यांच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा, तालुका रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात उपचार केंद्र स्थापित करावीत. त्यात रुग्णांसाठी बेड राखीव ठेवावे. उष्माघाताच्या रुग्णांवर तात्काळ उपचार होण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा व औषधांची तजविज करुन ठेवावी. उष्माघातापासून बचाव व उपाययोजना यासंबंधी व्यापक जनजागृती करावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी बैठकीत दिल्या.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा