शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२५
पारदर्शी, गतीमान प्रशासनाचा संकल्प करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे *शिक्षण, आरोग्यावर प्राधान्याने निधी देणार
पारदर्शी, गतीमान प्रशासनाचा संकल्प करा
-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
*शिक्षण, आरोग्यावर प्राधान्याने निधी देणार
अमरावती, दि. 31 : जिल्ह्याच्या विकासासाठी शाश्वत विकासाचे ध्येय, जिल्ह्याचा संकल्प आणि पायाभूत सुविधांवर भर दिला जाईल. यासाठी सर्वांनी गतीमान, पारदर्शी प्रशासनाचा संकल्प करावा. असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा नियोजन भवन येथे आज आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या़त जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीत विविध विकासकामांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली, तसेच नाविण्यपूर्ण प्रकल्पांवरही चर्चा झाली. तसेच जिल्हा नियोजनचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी सात दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
खासदार बळवंत वानखडे, आमदार किरण सरनाईक, सुलभा खोडके, रवी राणा, प्रवीण तायडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, राजेश वानखडे, केवलराम काळे, गजानन लवटे, प्रवीण पोटे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीत प्रास्ताविकेत जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.
बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतर्गत सन 2024-25 मधील जानेवारीअखेर झालेल्या 330.72 कोटी रुपयांच्या खर्चाला बैठकीत मान्यता देण्यात आली. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 56.55 कोटी रुपये, तर आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 40.99 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.
वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीमध्ये विविध विकासकामांना चालना देण्यासाठी भरीव तरतुद करण्यात आली. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी 21.45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून 83 कामे पूर्ण होणार असून 40.31 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होतील. इतर जिल्हा मार्गांसाठी 14.14 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ज्यामुळे 28 किलोमीटर रस्त्यांची सुधारणा होईल. जिल्ह्यातील 14 नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकेच्या विकासासाठी 11.83 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्युत विकासासाठी 30 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील ऊर्जा उपलब्धता सुनिश्चित होईल. प्राथमिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांसाठी निधी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यावेळी पुढील वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या अर्थसंकल्पावरही बैठकीत चर्चा झाली. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी 417.78 कोटी रुपये, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 102 कोटी रुपये, तर आदिवासी उपयोजना घटक कार्यक्रमासाठी 117.38 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. सर्व कामे वेळेत आणि उच्च दर्जाची पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना देण्यात आले आहेत.
महानगरपालिका स्थानिक स्वराज्य केंद्र व राज्य शासनाच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वपूर्ण आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शहरात सर्वत्र लवकरच सीसीटीव्ही लावण्यात येतील. चिखलदरा स्कायवॉकच्या काम गतीने पूर्ण करण्यात येईल. मंजूर कामांवरील निधी 31 मार्च 2025 च्या आत खर्च करावा. जिल्हा शल्य चिकित्सा तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अचलपूर येथील आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी अहवाल सादर करावा. मेळघाटातील दुर्गम 22 गावांमध्ये वीज प्रश्न असल्याने याठिकाणी वीज पुरवठा सुरूळीत सुरू रहावा, यासाठी महावितरणने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
महापालिकेसाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी मनपा आयुक्त यांनी इमारतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करुन कार्यवाही करावी. तसेच महानगरपालिकेच्या शाळा अत्याधुनिक करण्यावर भर द्यावा. मनपा शाळा डिजिटल तसेच आधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त व्हाव्यात यासाठी 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात अला. शाळा, तसेच आरोग्य सेवेकडे विशेष लक्ष द्यावे, असे पालकमंत्री म्हणाले.
आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत जिल्ह्यातील नदी, उपनद्या, नाले खोलीकरण करून पाणी जिरवण्यावर भर द्यावा. उपसा करताना निघालेली वाळू शासकीय इमारतीच्या बांधकामासाठी वापरावी. गाव तेथे स्मशानभूमी ही योजना प्रत्येक गावात असणे आवश्यक आहे. तसेच मोर्शी मतदारसंघातील वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताबाबत तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.
पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी अंबादेवी आणि एकवीरा देवीचे आज सकाळी दर्शन घेतले. यावेळी मंदिर संस्थानाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री. वैद्य यांनी श्री. बावनकुळे यांचा हनुमानाची मूर्ती भेट देऊन सत्कार केला. श्री बावनकुळे यांनी क्रीडापटूंची माहिती घेऊन कौतुक केले.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक एकनाथ हिरुळकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी भेट देऊन सांत्वन केले. यावेळी श्री. बावनकुळे यांनी महात्मा गांधी आणि स्व. एकनाथ हिरुळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी कंवर नगर येथील महानुभव आश्रमाला भेट दिली. आश्रमाच्या वतीने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी आज सकाळी भेट दिली. समाधीस्थळी त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच समाधीस्थळाचा विकास ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनीसांगितले. यावेळी आश्रमाच्यावतीने श्री. बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला.
गुरुवार, ३० जानेवारी, २०२५
पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची 'दिलखुलास', 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत
पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची
'दिलखुलास', 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत
मुंबई दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन विभागाचा 'शंभर दिवसाच्या कामकाजाचा आढावा आणि अंमलबजावणी' या विषयावर पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. 3, मंगळवार दि. 4, बुधवार दि.5 फेब्रुवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 4 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
डिसेंबर महिन्यात मंत्रीमंडळाचा विस्तार झाला व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाजाला सुरूवात झाली. पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजाची जबाबदारी या विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सोपविण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाच्या अनुषंगाने सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी राज्यातील पर्यावरणीय दृष्टीकोनातून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये ग्लोबल वार्मिंगचे परिणाम कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, हरित महाराष्ट्र, निल ध्वज, ब्लु फ्लॅग उपक्रम, नमामि चंद्रभागा व नमामि गोदावरी हे अभियान, तलाव संवर्धनासाठी घेण्यात आलेले निर्णय तसेच अगामी कुंभमेळा च्या अनुषंगाने पर्यावरण दृष्टीने खबरदारी म्हणून कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहे अशा महत्वपूर्ण विषयावर या बैठकीत निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची अंमलबजावणी आणि आराखडा कसा तयार करण्यात आला आहे याविषयी मंत्री श्रीमती मुंडे यांनी 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
शुक्रवार, २४ जानेवारी, २०२५
देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अर्ज सादर करण्यास दि. 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ
देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
अर्ज सादर करण्यास दि. 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि.24 : देशातील AIIMS, IIM, IIIT, NIT, IISc & IISER, Institution of National Importance & Other Colleges या शैक्षणिक संस्थांसह भारत सरकार मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राबविली जाते. या योजने अंतर्गत सन 2024-25 वर्षाकरिता दि. 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत आवेदन अर्ज मागविण्यात आले आहे, असे समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या/नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निहाय 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. सदर योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठ/संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क संबंधित विद्यापिठ/शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात जमा करण्यात येते. वसतीगृह व भोजन शुल्क यांचा देखील संस्था आकारणीनुसार खर्च देण्यात येणार आहे.
या योजनेविषयी आधिक माहिती, जाहिरात, आवेदन अर्ज व नियमावली शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडी या मथळ्याखाली प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर संकेतस्थळावरुन विहित अर्जाचा नमूना डाऊनलोड करुन तो परिपुर्ण भरुन कागदपत्रासह दि 14 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, 3 चर्च पथ पुणे. येथे सादर करावे. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांना योजनेंतर्गत लाभ देय राहील. सदर योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थानी अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रादेशिक उपायुक्त श्री. वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
बुधवार, २२ जानेवारी, २०२५
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी पुढील वर्षभर राज्यातील #एसटी च्या सर्व बस स्थानकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ राबवण्यात येणार आहे
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी पुढील वर्षभर राज्यातील #एसटी च्या सर्व बस स्थानकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत तब्बल ३ कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असून ' अ ' वर्गात पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
मंगळवार, २१ जानेवारी, २०२५
#दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी (२१ जानेवारी) महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत.
#दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी (२१ जानेवारी) महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त विविध कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतली व त्यांना गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. #टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट असून टाटा समूह ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.
#WEF25
#MahaAtDavos
#Davos2025
सोमवार, २० जानेवारी, २०२५
मेळघाट हाट येथील खादी महोत्सव 25 जानेवारीपर्यंत
मेळघाट हाट येथील खादी महोत्सव 25 जानेवारीपर्यंत
अमरावती, दि. 20 : प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने बस स्टॉड समोरील सायन्सकोर मैदान येथील मेळघाट हाट येथे खादी महोत्सवाला सुरवात झाली असून 25 जानेवारी 2025 पर्यंत हा महोत्सव चालणार आहे. अमरावतीकरांनी मोठ्या संख्याने खादी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत जिल्ह्यात विकेंद्रीत सोलर चरखा समुह कार्यक्रम राबविण्यात येत असून उद्योग विभागाच्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक समुह विकास कार्यक्रमातंर्गत सोलर चरखा समुहासाठी सामुहिक सुविधा केंद्र अमरावती एम. आय. डी. सी. क्षेत्रात प्रस्थापित करण्यात आले आहे.
या प्रकल्पातंर्गत खादी व सोलर चरख्यापासून अनेक दर्जेदार उत्पादने तयार केले जात असून यामध्ये ग्रामीण भागातील 300 पेक्षा जास्त महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. यामध्ये धारणी तालुक्यातील शंभर महिलांचा समावेश आहे.
या प्रकल्पातंर्गत उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त दि. 20 ते 25 जानेवारी 2025 पर्यंत खादी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये विविध दर्जेदार खादी उत्पादने सवलतीच्या दरात अमरावतीकरांना उपलब्ध होणार आहेत. तसेच मेळघाटातील महिला बचत गटांनी तयार केलेली विविध दर्जेदार उत्पादने मेळघाट हाट येथे विक्रीस उपलब्ध आहेत.
शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५
लेखा व कोषागारे विभागाच्या कला व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
लेखा व कोषागारे विभागाच्या कला व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
सर्वसाधारण विजेते पद अमरावती जिल्ह्याने तर उपविजेता पद वाशीमने पटकाविले
अमरावती. दि, 17 : लेखा व कोषागारे संचालनालयाव्दारे दोन दिवसीय विभागीय कला व क्रीडा स्पर्धा 2025 चे आयोजन वाशिम येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा या पाच जिल्ह्यांतील अधिकारी-कर्मचारी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या विभागस्तरीय स्पर्धेमध्ये अमरावती जिल्ह्याने विशेष कामगिरीची नोंद करत कला व क्रीडा स्पर्धा 2025 चे सर्वसाधारण विजेते पद पटकावले असून सर्वसाधारण उपविजेता वाशिम संघ ठरला.
सांस्कृतिक स्पर्धेमध्ये एकेरी महिला गायन या प्रकारात अमरावतीच्या वरिष्ठ कोषागार अधिकारी श्रीमती शिल्पा पवार यांनी प्रथम स्थान मिळवले. दुहेरी माहिला गायन स्पर्धेमध्ये श्रीमती तृप्ती तिप्पट व श्रीमती भारती वालचाळे यांनी प्रथम स्थान मिळवले. सामुहिक नृत्य प्रकारात अमरावती संघाने व्दितीय स्थान प्राप्त केले.
वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. विभागीय स्तरावर वैयक्तिक, दुहेरी तथा सामुहिक स्पर्धा यावेळी घेण्यात आल्यात. त्यात धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, चालणे, पोहणे, कॅरम, बुध्दिबळ, टेबलटेनिस, बॅडमिंटन, हॉलीबॉल, क्रिकेट, थ्रोबॉल, खो-खो व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या क्रीडा स्पर्धेमध्ये अमरावती जिल्हा क्रिकेट या प्रकारात विजेता ठरला तर खो-खो महिला संघाने प्रथम स्थान पटकावले तसेच थ्रोबॉलमध्ये महिला संघ व्दितीय ठरला .
धावणे 100 मीटर या प्रकारात महिला गटातून अमरावतीच्या आरती जनबंधू यांनी व्दितीय स्थान पटकाविले. धावणे 200 मीटर या प्रकारात महिला गटातून प्रिया कापसे यांनी प्रथम तर पुरुष गटातून श्रीकार माटे यांनी व्दितीय क्रमांक पटकावला. तसेच 100 बाय 4 रिले प्रकारातून पुरुष गटातून अमरावती संघ उपविजेता ठरता यामध्ये भूषण जोशी, रुपेश जयपुरे, मयूर देशमुख व श्रीकार माटे यांनी सहभाग नोंदविला. या प्रकारात अमरावती महिला संघाने सुध्दा व्दितीय क्रमांक पटकावला असून यामध्ये भारती जनबंधू, कोमल गोसावी, प्रतिभा पवार व जागृती चौधरी यांनी सहभाग नोंदविला. नयना सोलव यांनी थाळी फेक महिला प्रकारात प्रथम तर लांब उडी महिला प्रकारात व्दितीय क्रमांक पटकावला. चालणे तीन किमी प्रकारातून सारिका कोरान्ने यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पोहणे 50 मीटर व 100 मीटर या दोन्ही प्रकारात लेखाधिकारी जयदेव देशपांडे यांनी प्रथम स्थान पटकाविले.
कॅरम या खेळ प्रकारात पुरुष गटातून चंदन गजभिये व महिला गटातून प्रिया करडे यांनी व्दितीय स्थान पटकावले. कॅरम दुहेरी महिला यामध्ये प्रिया करडे व राजश्री भोकरे यांचा संघ उप विजयी झाला. बुध्दीबळ मिश्र या प्रकारात राजश्री भोकरे यांनी प्रथम स्थान मिळविले. टेबल टेनिस एकेरी पुरुष यामध्ये अमरावतीचे सहा. संचालक अमोल ईखे यांनी व्दितीय स्थान पटकावले तर टेबल टेनिस पुरुष दुहेरी यामधून अमोल ईखे व विकी रोडे यांचा संघ उप विजयी ठरले. टेबल टेनिस दुहेरी महिला यामधनु प्रिया करडे व राजश्री भोकरे यांनी व्दितीय स्थान मिळविले. बॅडमिंटन एकेरी पुरुष या गटातुन भुषण जोशी उप विजेते ठरले असून बॅडमिंटन एकेरी महिला या गटातून नयना सोलव हया उप विजेत्या ठरल्या. बॅडमिंटन दुहेरी महिला यामध्ये नयना सोलव व प्रिया करडे यांनी व्दितीय स्थान मिळविले.
रांगोळी स्पर्धेत स्त्री सक्षमीकरण या विषयावर रांगोळी काढून अमरावतीच्या यामिनी खरड यांनी प्रथम क्रमांक मिळविला. अमरावती विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये सहसंचालक (लेखा व कोषागारे) श्रीमती प्रिया तेलकुंटे , सहसंचालक (स्थानिक निधी) श्री. गायकवाड साहेब, वरिष्ठ कोषागार अधिकारी श्रीमती शिल्पा पवार तसेच वित्त विभागातील अधिकारी तथा कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
प्रधानमंत्री यांच्या हस्ते स्वामित्व योजनेअंतर्गत आज सनदांचे ऑनलाईन वाटप
अमरावती, दि. 17 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दि. 24 एप्रिल 2020 रोजी स्वामित्व योजनेचे उद्घाटन केले होते. या योजनेचा उद्देश गावांतील आबादी क्षेत्रातील घरांसाठी मालमत्ता पत्रक देणे हा आहे. ही योजना ग्रामीण विकास विभाग, भूमि अभिलेख कार्यालय (महसूल विभाग) आणि सर्व्हे ऑफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम असून यासाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत नकाशांकन तंत्रांचा उपयोग केला जातो. ही योजना ग्रामीण समुदायांच्या आर्थिक समावेशनात सुधारणा, पतपुरवठ्यास सुलभता आणि एकूणच सामाजिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविते.
उदया, शनिवार दि. 18 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वामित्व योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्ड, सनदचे ई-वितरण करतील, तसेच या योजनेतील काही लाभार्थ्यांशी संवाद साधतील. यानंतर मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी, अधिकारी इत्यादींच्या उपस्थितीत स्थानिक कार्यक्रमामार्फत मालमत्ता कार्ड, सनदचे प्रत्यक्ष वितरण करण्यात येणार आहे.
स्वामित्व योजनेचे लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अमरावती विभागातील जिल्ह्यामधील तालुका आणि पंचायत स्तरावर एकुण 149या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या दिवशी स्वामित्व योजनेबाबत माहितीचे सादरीकरण भूमि अभिलेख विभागामार्फत करण्यात येणार असून त्यामुळे जनतेला योजनेच्या लाभाची माहिती मिळणार आहे. सदर कार्यक्रमास भूमी अभिलेख विभाग, ग्रामविकास विभाग, बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी ग्रामीण जनतेस स्वामित्व योजनेतून तयार होणा-या मिळकत पत्रिकेवर मिळणाऱ्या कर्जा च्या योजनांसंबंधी माहिती जनतेस देता येईल.
अमरावती जिल्ह्यातील एकुण 13 तालुक्यातील 34 गावांमध्ये सनद वाटप कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्हा स्तरावरील कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन येथे होणार आहे. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रतापदादा अडसड, रवी राणा, सुलभाताई खोडके, उमेश यावलकर, प्रवीण तायडे, केवळराम काळे, गजानन लवटे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र यांच्या उपस्थितीत मौजे रामगाव तालुका अमरावती या गावाच्या सनद वाटपाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील एकुण 13 तालुक्यातील 50 गावांमध्ये सनद वाटप कार्यक्रम राबविण्यात येणार असून तालुकास्तरावरील कार्यक्रम मोताळा तालुक्यामध्ये होणार असून आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
अकोला जिल्ह्यातील एकुण 7 तालुक्यातील 12 गावांमध्ये सनद वाटप कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्हास्तरावरील कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे होणार असून कार्यक्रम स्थळी मौजे कळंबेश्वर येथील सनद वाटप कार्यक्रम होणार आहे. तसेच तालुका स्तरावरील कार्यक्रम मौजे भोकर तालुका तेल्हारा येथे आयोजित करण्यात आला असून आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थांना सनद वाटप करण्यात येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 44 गावांमध्ये सनद वाटपाचा कार्यक्रम होणार असून आदिवासी विकासमंत्री अशोक ऊईके यांची प्रमुख उपस्थितीत होणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये 2 तालुक्यातील एकुण 9 गावांमध्ये कार्यक्रम होणार असून त्यास मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड उपस्थित राहणार आहेृ
भुमि अभिलेख विभाग व गामविकास विभाग यांचे संयुक्त विद्यामानाने होणा-या सनद वाटप कार्यक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन भूमि अभिलेख विभागाने केले आहे.
गुरुवार, १६ जानेवारी, २०२५
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यावेळी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दीप प्रज्वलन केले. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा व अन्य मान्यवर उपस्थित होते. सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाकडून स्टार्टअपसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रादेशिक विभागाला ३० कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. काळाची गरज ओळखून स्टार्टअप धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. हे देशातील आधुनिक धोरण ठरणार असून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
नव उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती केली जाईल. देशात सुरुवातीला ४७१ स्टार्टअप होते, आज ती संख्या १ लाख ५७ हजार आहे. महाराष्ट्र केवळ भारताच्या #स्टार्टअप क्रांतीत सहभागी नाही तर त्याचे नेतृत्व करत आहे. राज्यात २६ हजार स्टार्टअप आहेत – मुख्यमंत्री
#startupindia
#Startup
बुधवार, १५ जानेवारी, २०२५
भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी एकाच वेळी राष्ट्राला समर्पित
भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी एकाच वेळी राष्ट्राला समर्पित
मुंबई, दि. 15 : निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू असून भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
भारतात निर्मित सूरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) या तीन महत्वाच्या नौका मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नौसेना प्रमुख दिनेशकुमार त्रिपाठी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले की, संपूर्ण विश्व हा परिवार मानून भारत विकासाच्या भावनेने काम करतोय. तीन आघाडीच्या लढाऊ जहाजांचा नौदलामध्ये समावेश एक मजबूत आणि स्वावलंबी संरक्षण दल निर्माण करण्यासाठी भारताची अटल वचनबद्धता अधोरेखित करते. भारतीय समुद्र क्षेत्रात भारत प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून उदयास आला आहे. नौदलाने अनेकांचे जीव वाचवले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सुरक्षित केली आहे. यामुळे जगभरातून भारतावर विश्वास वाढला असून आज जागतिक स्तरावर, विशेषत: ‘ग्लोबल साउथ’मध्ये भारत एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळखला जातो. तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण सैन्याबरोबरच आर्थिक दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जमीन, पाणी, हवा, खोल समुद्र किंवा अनंत अवकाश अशा सर्वच क्षेत्रात भारताने आपले हित जपून तिनही सेनादलांच्या माध्यमातून मागील काही वर्षात आत्मनिर्भर बनण्याची प्रशंसनीय वाटचाल सुरू ठेवली आहे. एकाच वेळी विनाशिका, युद्धनौका आणि पाणबुडी कार्यान्वित होत असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर भारतीय नौदलाने स्वावलंबी होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी यावेळी नमूद केले. भारतीय सैनिकांना आता भारतीय युद्ध सामग्री उपलब्ध होत असून 100 हून अधिक देशांना संरक्षण सामग्री निर्यात केली जात आहे. या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ योजनेचा विस्तार होत असून आर्थिक प्रगतीचे दार उघडून भारताच्या तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्याच्या प्रक्रियेत मोठा हातभार लागत असल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी काढले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की, एकाच वेळी तीन युद्धनौका राष्ट्राला अर्पण होत असल्याने भारतीय समुद्री क्षेत्रात देशाची ताकद आणि महत्व वाढले आहे. या क्षेत्रातून मोठे व्यापार होत असून संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होत आहे. आधुनिकीकरणावर भर देण्यात येत असून या तिनही नौका त्यादृष्टीने सक्षम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नौदल प्रमुख ॲडमिरल श्री. त्रिपाठी यांनी नौदलासाठी गौरव आणि प्रतिष्ठेचा दिवस असल्याचे सांगून या निमित्ताने शक्ती, क्षमता आणि आत्मनिर्भरता साजरी केली जात असल्याचा उल्लेख केला.
युद्धनौकांविषयी थोडक्यात…
आयएनएस सूरत – हे प्रकल्पातील चौथे आणि अंतिम जहाज आहे असून जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक विनाशिकांपैकी एक आहे. या जहाजामध्ये 75 टक्के स्वदेशी घटक असून यात अत्याधुनिक शस्त्र-संवेदक प्रणाली आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमता आहेत.
आयएनएस वाघशीर – स्कॉर्पीन प्रकल्पातील ही सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे. ही भारताच्या पाणबुडी बांधणीतील वाढत्या कौशल्याचे प्रतिनिधित्व करते. फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने ही तयार करण्यात आली आहे.
आयएनएस निलगिरी - स्टेल्थ युद्धनौका प्रकल्पातील ही पहिली नौका आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोने याचे डिझाइन केले आहे. यात टिकाऊपणा, समुद्रात स्थिरता आणि स्टेल्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये आहेत, जी स्वदेशी युद्धनौकांच्या पुढील पिढीचे प्रतिबिंब आहे.
0000
मंगळवार, १४ जानेवारी, २०२५
सोमवार, १३ जानेवारी, २०२५
योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार • एआय तंत्राचाही वापर • नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरीत्या
पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार
• एआय तंत्राचाही वापर
• नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 13 : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात येईल. विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या शंभर दिवस आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ‘माहिती व जनसंपर्क’चे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.
प्रधान सचिव तथा महासंचालक श्री. सिंह यांनी सादरीकरणाद्वारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामकाजात यापुढे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यावर भर द्यावा. डिजिटल माध्यम धोरण तयार करून नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात येणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्राचे विविध पैलू दर्शवणारे कॉफीटेबल बुक तयार करावे. राज्य शासन घेत असलेले निर्णय, योजना व उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत सर्व माध्यमांद्वारे जाणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या प्रतिमा संवर्धनासाठी व माहिती पोहचविण्यासाठी एआय न्यूजरुम तयार करुन त्याद्वारे माहिती लवकरात लवकर प्रसारित करण्याचे नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक साहित्य, मनुष्यबळ घेण्यात यावे. पत्रकारांसाठी असलेल्या आरोग्यविषयक तसेच इतर विविध कल्याणकारी योजनांना गती देण्यात यावी. पत्रकार पुरस्कारांचे लवकर वितरण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यस्तरावर संदर्भ कक्ष
शासकीय योजना, उपक्रम यांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरावर संशोधन आणि संदर्भ कक्ष स्थापन करण्यात यावे. तसेच वर्तमानपत्रे व ईलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच डिजिटल माध्यमांद्वारेही योजना, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी डिजिटल मीडिया धोरण लवकरच तयार करण्यात यावे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
- एआयच्या प्रभावी वापरावर भर
- माहिती जलदगतीने पोचविण्यासाठी यंत्रणा
- महासंचालनालयाच्या बळकटीकरणावर भर
- सध्या अस्तित्वातील सर्व होर्डिंग हे डिजिटल होर्डिंगमध्ये बदलणार
- सोशल मिडियाचा प्रभावी वापर वाढविणार
- एकाच ठिकाणी माहिती उपलब्धतेसाठी संशोधन आणि संदर्भ कक्ष
००००
विभागीय लोकशाही दिनात 6 प्रकरणांवर सुनावणी प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे - उपायुक्त गजेंद्र बावणे
विभागीय लोकशाही दिनात 6 प्रकरणांवर सुनावणी
प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे
- उपायुक्त गजेंद्र बावणे
अमरावती, दि.13 : नागरिकांकडून प्राप्त अर्जावर विहित कालमर्यादेत कार्यवाही होणे आवश्यक
आहे. विभागीय लोकशाही दिनाकरिता दाखल प्रकरणांवर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वेळेत प्राप्त करुन प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी सर्वंकष प्रयत्न करावे. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित तक्रारदारास लेखी पत्राव्दारे कळविण्यात यावे, असे निर्देश उपायुक्त गजेंद्र बावणे यांनी आज येथे दिले. लोकशाही दिनात दाखल एकूण सहा प्रकरणांवर चर्चा करुन त्यानुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी संबंधित विभागाला यावेळी दिल्या.
विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात श्री. बावणे यांच्या अध्यक्षतेखाली आज लोकशाही दिनाचे कामकाज पार पडले. सहाय्यक आयुक्त राजेंद्र फडके, सहा. आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह पोलीस, महापालिका, महसूल, सहकार, कृषी, जलसंधारण व ऊर्जा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाव्दारे सादर करण्यात आलेल्या 4 स्वीकृत अर्ज (प्रलंबित प्रकरणे) व 2 अस्वीकृत अर्ज (सामान्य तक्रार अर्ज) अशा एकूण 6 अर्जावर सविस्तर चर्चा आजच्या विभागीय लोकशाही दिनात झाली.
लोकशाही दिनासाठी उपस्थित तक्रारदारांचे म्हणने ऐकूण घेण्यात आले. प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही श्री. बावणे यांनी संबंधित विभागांना यावेळी दिले.
00000
सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पणन विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा
सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पणन विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा
मुंबई, दि. १३ – दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे पणन विभागाकडून १०० दिवसात करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घेतला, त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणारे ॲग्रो हब, मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत उभे करावेत. या ठिकाणी सर्व-सोयी सुविधा उभारण्यात याव्यात. या ॲग्रो हबसाठीचा आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.
पुढील वर्षापासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावे. त्यामध्ये सर्व सोयी सुविधांचा अंतर्भाव असावा. कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे अशी यंत्रणा उभी करावी. राज्यातील चारही विभागात उभारण्यात येणाऱ्या ॲग्रो लॉजिस्टिक हबचा प्रस्ताव सादर करावा. कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ हा उत्तम पर्याय असून त्यासाठी जास्त मागणीही आहे. त्यामुळे कांदा चाळींची संख्या वाढवावी अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
कोकण भागात माशांसाठी तर आदिवासी भागात तेथील स्थानिक उत्पादनासाठी बाजार समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
पणन विभागाचे सादरीकरण करताना विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी नवी मुंबई येथे महाबाजार उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार असून किमान दोनशे ते अडीचशे एकर जागेमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती उभारण्यात येणार आहे.
राज्यातील १ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांचे एक ते अडीच कोटी, अडीच कोटी ते पाच कोटी, पाच ते दहा कोटी, दहा ते पंचवीस कोटी असे उपवर्गिकरण करणार. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जाभूरगाव येथे ॲग्रो हबची उभारणी पूर्ण झाली असून येत्या ४५ दिवसात त्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही श्री. देवरा यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकोरे – बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, सचिव उपस्थित होते.
००००
रविवार, १२ जानेवारी, २०२५
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी
प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
मुंबई, दि.13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर, 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी, 2025 अशी आहे.
राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई - 32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचं नमुने dgipr.maharashtra.gov.in व www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
पुरस्कारांची माहिती
अ.क्र
पुरस्काराचे नाव
पारितोषिक
1. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय)
1,00,000/- (रुपये एक लाख रोख) (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)
2. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
3. अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
4. बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
5. मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
6. यशवंतराव चव्हाण पुरस्कार
शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
7. पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
8. तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
9. केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
10. समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
11. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
12. पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)
51 जार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
विभागीय पुरस्कार
13. दादासाहेब पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,
या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
14. अनंतराव भालेराव पुरस्कार, (औरंगाबाद आणि लातूर विभाग)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
15. आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
16. नानासाहेब परूळेकर पुरस्कार, (पुणे विभाग)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
17. शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
18. ग.गो.जाधव पुरस्कार, (कोल्हापूर विभाग)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
19. लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
20. ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, (नागपूर विभाग)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
शुक्रवार, १० जानेवारी, २०२५
कर्मवीर दादासाहेबांचे विचार आणि कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचवावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मवीर दादासाहेब कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सोहळा चंद्रपूर येथे संपन्न झाला. कार्यक्रमास राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते. दादासाहेब हे ध्येयवादी नेते होते. राज्याचा आणि जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन ते संपूर्ण जीवन जगले. प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य केंद्र उभारण्याचा सर्वप्रथम विचार त्यांनी मांडला. शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी अनेकांना प्रेरीत केले. अशा नेत्यांचे विचार आणि कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते मा.सा. कन्नमवार गौरव स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजातील डॉ.गजानन कोटेवार, प्रभा चिलखे, रुपेश कोकावार, देवराव कासटवार, गजानन चंदावार यांचा सन्मान करण्यात आला.
गुरुवार, ९ जानेवारी, २०२५
असंघटित कामगारांना योजनांचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील विविध क्षेत्रातील व्यवसायनिहाय वर्गीकरणानुसार असंघटित कामगारांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी एकत्रितपणे आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसात करावयाच्या कामांसंदर्भात कामगार विभागाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री आशिष जैस्वाल, इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, यांच्यासह विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते.
बैठकीतील मुद्दे
- विविध अंमलबजावणी यंत्रणांकडून उपकर जमा करण्यासाठी सेस पोर्टल तयार करणार
- बांधकाम कामगारांसाठी सुधारित योजना राबविणार
- रिएक्टर वापराबाबत नवीन प्रारुप नियम तयार करणार
- महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियमात सुधारणार
- औद्योगिक न्यायाधिकरण नियमांचा प्रस्ताव तयार करणार
- केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेची अंमलबाजवणी
- कुशल मनुष्यबळासाठी आयटीआयच्या सहाय्याने प्रशिक्षण केंद्राची स्थापना
बुधवार, ८ जानेवारी, २०२५
मंगळवार, ७ जानेवारी, २०२५
सात कलमी कृती कार्यक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी ई-प्रणालीद्वारे संवाद साधला. सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला.
प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाच्या कामांबाबत सविस्तर सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. याबाबत १५ एप्रिल २०२५ रोजी आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते.
गुरुवार, २ जानेवारी, २०२५
बुधवार, १ जानेवारी, २०२५
नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना #नववर्ष२०२५ च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी गतीशील बनवायचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी प्रतिज्ञा करूया, एकजूट करुया असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना #नववर्ष२०२५ च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हा निर्धार पूर्ण करण्यासाठी राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगारासह सर्वांचीच साथ लाभेल, असा विश्वास देखील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला व्यक्त केला आहे.
'येणारे वर्ष सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अखंडीत फडकत ठेवण्याची ऊर्जा आणि उर्मी मिळत राहो, हीच मनोकामना. छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक थोर संतांच्या आशीर्वादाच्या छत्रछायेखालील महाराष्ट्राला आधुनिकीकरणाच्या या युगात जगातील सर्वोत्तम राज्य म्हणून अग्रेसर ठेवायचे आहे. आपल्या कष्टकरी, शेतकरी, कामगारांच्या राबणाऱ्या आणि कला-क्रीडा-साहित्य-संस्कृती क्षेत्रातील सर्जक हातांनी या राज्याच्या वैभवात भरच घातली आहे. हा लौकिक आपल्याला वाढवायचा आहे. शेती-माती व सिंचन, शिक्षण, आरोग्य, उद्योग- ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान ते नवनव्या औद्योगिक क्रांती यांना पादाक्रांत करायचे आहे. यासाठी राज्यातील शांतता-सलोखा, परस्पर स्नेह, आदरभाव वृद्धिंगत होईल. पर्यावरण आणि जल-जंगल-जमीन यांचं जतन-संवर्धन होईल, असे प्रयत्न करायचे आहेत. हा संकल्प घेऊन वाटचाल करायची आहे – मुख्यमंत्री
#newyear2025
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)