शुक्रवार, २४ जानेवारी, २०२५
देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अर्ज सादर करण्यास दि. 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ
देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
अर्ज सादर करण्यास दि. 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि.24 : देशातील AIIMS, IIM, IIIT, NIT, IISc & IISER, Institution of National Importance & Other Colleges या शैक्षणिक संस्थांसह भारत सरकार मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राबविली जाते. या योजने अंतर्गत सन 2024-25 वर्षाकरिता दि. 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत आवेदन अर्ज मागविण्यात आले आहे, असे समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या/नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निहाय 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. सदर योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठ/संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क संबंधित विद्यापिठ/शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात जमा करण्यात येते. वसतीगृह व भोजन शुल्क यांचा देखील संस्था आकारणीनुसार खर्च देण्यात येणार आहे.
या योजनेविषयी आधिक माहिती, जाहिरात, आवेदन अर्ज व नियमावली शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडी या मथळ्याखाली प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर संकेतस्थळावरुन विहित अर्जाचा नमूना डाऊनलोड करुन तो परिपुर्ण भरुन कागदपत्रासह दि 14 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, 3 चर्च पथ पुणे. येथे सादर करावे. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांना योजनेंतर्गत लाभ देय राहील. सदर योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थानी अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रादेशिक उपायुक्त श्री. वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा