सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्याकडून सेतु केंद्राची पाहणी

ऑनलाईन प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी
-         पालकमंत्री प्रविण पोटे- पाटील
अमरावती. दि. 28 : छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत पीक कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज विनामूल्य भरण्याची प्रक्रिया सेवा केंद्रांद्वारे होत आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री प्रविण पोटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सेतु , भातकुली तहसील सेतु व गाडगेनगर महा- ईसेवा केंद्र या केंद्रांना भेट दिली आणि ही प्रक्रिया 15 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार श्री. मालठाणे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी श्री. रणविर, विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री. पोटे यांनी ऑनलाईन प्रक्रियेची संपूर्ण माहिती घेतली व कर्मचा-यांकडून अडचणी जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी सेतू केंद्राचे संचालक झियाऊर रहेमान यांनी ऑनलाईन प्रक्रियेची संपूर्ण माहिती पालकमंत्र्यांना दिली.
  कर्जमाफीसाठी शेतक-यांकडून ऑनलाईन फॉर्म जिल्ह्यात सुमारे 600 केंद्रांवर विनामूल्य भरुन घेण्यात येत आहेत. या प्रक्रियेला गती येण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहायक, गटसचिव, संबंधित केंद्रचालक यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कर्जमाफी फॉर्म भरुन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश श्री. पोटे यांनी दिले.
           योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या केंद्रांच्या संचालकांचे प्रशिक्षणही घेण्यात आले आहे, तसेच सर्व केंद्रांना माहिती तंत्रज्ञान संचालनालयाकडूनन बायोमेट्रिक यंत्रणा व इतर साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे, अशी माहिती श्री. खुशालसिंह परदेशी यांनी दिली.


00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा