सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

शुभमंगल सामुहिक विवाह योजनेतून 
1583 जोडपे परिणयबध्द
1583 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 1 कोटी 71 लक्ष 96 हजार रुपये अनुदान जमा
अमरावती दि. 29 : मुलींच्या किंवा मुलांच्या विवाहावर फार मोठा खर्च होतो. सामान्य शेतकरी किंवा गरीब कुटुंबांना हा खर्च परवडण्यासारखा नसतो. विवाहावरचा खर्च भागविण्यासाठी शेतकरी वर्ग सावकाराकडून कर्ज घेऊन कर्जबाजारी होतो. शेतकरी आत्महत्या करण्यामागे हे सुध्दा प्रमुख कारण आढळून आले आहे. या प्रश्नावर मात करण्यासाठी तसेच शेतकरी, शेतमजूर यांचा विवाहवरचा खर्च वाचविण्यासाठी महिला व  बालवीकास विभागाद्वारे शुभमंगल सामुहिक विवाह योजना/नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तसेच कर्जबाजारीपणा वाढू नये म्हणून ही योजना सन 2008 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेची व्याप्ती शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात आहे.
           या योजनेअंतर्गत सन 2016-17 मध्ये अमरावती विभागातील 1583 लाभार्थ्यांना सामुहिक विवाह योजनेतून 1 कोटी 76 लाख 96 हजार रुपये अनुदान महिला व बालविकास विभागाकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील 241 लाभार्थ्यांना 28 लक्ष 92 हजार रुपये विवाह खर्च देण्यात आला. अकोला जिल्ह्यातील 108 लाभार्थ्यांना 10 लक्ष 80 हजार रुपयाचा निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील  167 लाभार्थ्यांना 20 लक्ष 4 हजार रुपये,  बुलडाणा जिल्ह्यातील 925 लाभार्थ्यांना 1 कोटी  11 लक्ष रुपये तर वाशिम जिल्ह्यातील 142 लाभार्थ्यांना 1 लक्ष 20 हजार रुपये विवाह खर्च अनुदान स्वरुपात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.
अशी आहे योजना :-
या योजने अंतर्गत सामुहिक विवाहात सहभागी होणाऱ्या शेतकरी/शेतमजूर यांच्या मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तुंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपे 10 हजार रुपये एवढे अनुदान वधुच्यवडिलांच्या नावाने, वडिल हयात नसल्यास वधुच्या आईच्या नावाने व आई-वडिल दोन्हीही हयात नसल्यास वधुच्या नावाने धनादेश देण्यात येते. याशिवाय या योजनेंतर्गत जे जोडपे सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणीकृत विवाह करतात,  त्यांनाही 10 हजार रुपये अनुदान देण्यात येते. सामुहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनाकरिता  संबंधित संस्थेस प्रति जोडपे दोन हजार एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान (विवाह नोदंणी शुल्कासह) विवाह योजनेसाठी  देण्यात येते. या योजनेमुळे अनेक गोर-गरीब शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह झाले असून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुध्दा ही योजना प्रभावी ठरली आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा