सोमवार, २ जुलै, २०१८




उगवण नसलेल्या बियाण्यांची पाहणी करुन उपाययोजना करावी
                                                                                                            -पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील
* पीक आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले आदेश
अमरावती, दि. 2 : संपूर्ण जिल्ह्यात जूनअखेरपर्यंत पेरणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी उपयोगात आणलेली बियाणे उगवणक्षम असल्याबाबतची खात्री कृषि विभागाने करावी, शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या बियाण्यांची उगवणक्षमता नसल्यास तात्काळ उपाययोजन करावी, असे आदेश पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी यांनी दिले. जिल्ह्यातील पिक परिस्थितीचा आढावा, त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.
 बैठकीत पालकमंत्री श्री. पोटे यांनी बियाण्यांची  बीज प्रमाणिकरणाच्या माहितीच्या आधारे नोंद घ्यावी. अशा शेतकऱ्यांना खात्रीशीर बियाणे पुरवावे. बियाणे उगविली नसल्यास दुबार पेरणीची संधी घेता यावी, यासाठी तात्काळ उपाययोजना करावी, असे निर्देश कृषी विभागाला दिले. बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल खर्चान आदी उपस्थित होते.
            उगवणक्षम नसलेल्या बियाण्यांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विज्ञान केंद्र आणि प्रादेशिक संशोधन केंद्राच्या बियाणे तज्‍ज्ञांनी तात्काळ पाहणी करावी. शेतकऱ्यांना आवश्यकता असल्यास पर्यायी बियाणे उपलब्ध करुन द्यावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. रा्ष्‍ट्रीय कृषी विस्तार आणि तंत्रज्ञान अभियानांतर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमात 31 हजार 961 शेतकऱ्यांना बियाणे परमिट वाटप झाले आहे. यातून जिल्ह्यात 16 हजार 272 एवढी खरेदी झाली आहे. तालुका कृषि केंद्राकडे 913 परमिट उर्वरीत आहे. शेतकऱ्यांकडे बियाणे परमिट असूनही बियाणे मिळाले नाहीत, अशी समस्या उद्‌भवू नये. पेरणी क्षेत्राची नोंद अचूक होण्याकरीता खातेदारनिहाय याद्या कराव्यात आणि पेरणी क्षेत्राची माहिती घ्यावी, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.
धारणी भागात युरिया खताचा वापर होतो. पावसाळ्यात खतांचा पुरवठा नियोजितरित्या करण्यात यावा. फवारणीच्या वेळी विशेष काळजी घेण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, तसेच किटकनाशके फवारणीच्या सदोष पंपावर बंदी आणण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांचे आवाहन
ज्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये बियाणे पेरले परंतू ते उगवलेच नाही, अश्या शेतकऱ्यांनी दुकान किंवा कृषी केंद्रातून बियाणे विकत घेतले आहे, त्या ठिकाणाहून देयकाची पावती आवर्जुन प्राप्त करुन घ्यावी.
पंचनामा करण्यासाठी आपला सातबारा, पेरेपत्रक, बियाणे खरेदीची पावती यासह लेखी तक्रार कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे करावी किंवा पालकमंत्री यांना थेट भेटून अथवा संपर्क करुन तक्रार करावी. पंचनामा करताना शेतकऱ्यांनी पुरावा म्हणून फोटो कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष काढावा जेणे करुन भरपाई मिळण्यास अडचण होणार नाही.
प्रवीण पोटे-पाटील
पालकमंत्री, अमरावती
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा