कापूस पिकावरील नवीन लष्करी अळी व्यवस्थापन
केंद्र शासनाने सुचवलेली एकात्मिक किड व्यवस्थापन
पध्दती
अमरावती, दि.30 : विभागातील कापूस
पिकावर नवीन लष्करी अळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. याबाबत केंद्र शासनासने सुचविलेली
एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे
करण्यात आला आहे.
शेतामध्ये नियमितपणे निरीक्षणे आणि
देखरेख करुन एकात्मिक कीड व रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. कपाशीची प्रादूर्भावग्रस्त
फुले व हिरवी बोंडे त्वरीत वेचून अळ्यासहित नष्ट करावीत. जेणेकरुन, अळीचा होणारा प्रसार
रोखण्यास मदत होईल. किडीचे वेळेवर व्यवस्थापनासाठी अंडीपुंज असलेली पाने तसेच सुरुवातीच्या
अवस्थेतील अळ्या हाताने गोळा करुन नष्ट कराव्यात.
अडी अवस्थेतील किड नियंत्रणासाठी
ट्रायकोग्रामा या परोपजीवी किटकांचे शेतात प्रसारण करावे अथवा कापूस पिकांच्या पानांस
ट्रायकोकार्ड लावावे. नवीन लष्करी अळी वरील परोपजीवी व परभक्षी किटकांचे संरक्षण आणि
संवर्धनसाठी किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेत कडुलिंबावर आधारित किटकनाशकांचा वापर करावा.
प्रादूर्भावीत पिकांचे अवशेष नष्ट करावेत. प्रौढ नर पतंग नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा
वापर करावा. मुख्य शेत तणविरहीत ठेवणे, तसेच आजुबाजूचे क्षेत्र स्वच्छ ठेवावे.
किटकनाशक नोंदणी समीतीने मंजुर केलेल्या
शिफारशीप्रमाणे नोंदणीकृत किटकनाशकांचा वापर करावा. कापूस एकात्मिक किड व्यवस्थापन
पध्दती http://ppqs.gov.in/sites/default/files/cotton.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध
असून त्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांनी
शिफारस केल्याप्रमाणे कापूस पिकांवर मेटाऱ्हायझियम ॲनिसोप्लि किंवा नोमेरिया रिलाई
या किडरोगजनक बुरशीचा 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर
यांनी शिफारस केल्याप्रमाणे प्रादूर्भावीत कापूस पिकांचे पुढील नुकसान टाळण्याच्या
दृष्टीने त्यावर स्पिनेटोरम 11.7 टक्के एस.सी., 08 मिली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल
18.5 टक्के एस.सी., 0.3 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोक्टीन 5 टक्के एसजी 0.4 ग्रॅम
किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 1.9 टक्के ईसी 1.16 मिली या किटकनाशकांची प्रति लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
नवीन लष्करी अळी (फॉल आर्मीवर्म)
या किडीचे मका हे मुख्य खाद्य असले तरीही ते पिक शेतातून काढुन टाकल्यास किंवा ते पिक
वाढीच्या शेवटच्या टप्प्यात असल्यास त्यांची पसंती कमी होऊन या किडीचा कपाशी, बाजरी
व इतर पर्यायी पिकांवर प्रादूर्भाव होण्याचा धोका आहे. ही किड सुमारे 80 पिकांवर उपजिविका
करत असल्याने खरीपातील मका पिक काढल्यानंतर ती आजूबाजूच्या इतर पिकांवर स्थलांतरीत
होऊ शकते. यावर्षी झालेले पर्जन्यमान विचारात घेता मका व इतर रब्बी पिकांखालील क्षेत्रामध्ये
वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी सतर्क राहून या किडीच्या वेळीच व्यवस्थापन
करावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा