मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज


रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज हे लोककल्याणकारी राज्याची स्थापना करणारे लोकहितैषी सहिष्णू आदर्श राजे म्हणून जगभर वंदिले जातात. त्यांनी जनसामान्यांचे स्वराज्य स्थापन करत प्रजाहितदक्ष राज्यव्यवस्थेचे उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले आहे.
छत्रपती शिवराय हे महान योद्धा असण्याबरोबरच सुजाण प्रशासक व द्रष्टे राष्ट्रनिर्माता होते. त्यामुळे त्यांचे जीवन केवळ महाराष्ट्र किंवा देशाच्याच नव्हे तर समस्त जगाच्या इतिहासात देदिप्यमान व अनन्यसाधारण ठरणारे आहे. ते ख-या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्या राज्यकारभारातील प्रत्येक कार्यवाही जनतेच्या हिताची काळजी घेणारी होती. एका आदर्श प्रशासकाला आवश्यक असणारे शिस्त, जोखीम स्वीकारण्याचे धाडस, न्याय, दूरदृष्टी, विवेक, अखंड परिश्रम हे सर्व गुण त्यांच्या ठायी होते.
       महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. शूरवीर, संत आणि महापुरुषांची भूमी असलेल्या महाराष्ट्राच्या जडणघडणीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनन्यसाधारण योगदान आहे. त्यांची शेतीविषयक धोरणे त्यांच्या लोकहितकारी व्यक्तित्वाची ग्वाही देतात.
            शेतक-यांची पिळवणूक थांबविण्यासाठी त्यांनी नवीन रयतवारी पद्धती रूजू केली. तत्पूर्वी जमीनदारी पद्धती होती. त्यामुळे शेतक-यांना जमीनदारांच्या लहरीनुसार सारा भरावा लागे. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी यामुळे शेतीची नासाडी झाली तरी शेतक-यांना जमीनदारांकडे सारा द्यावा लागे. पीक पाहणी होत नसे. छत्रपती शिवरायांनी ही पद्धती बदलली व रयतवारी रूढ केली. जमीनदारी मोडीत काढली. त्यासाठी जमीनदारांचा विरोध पत्करून त्यांना वठणीवर आणले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतवारी पद्धती लागू करताना पीक पाहणी ही  एखाद्या व्यक्तीच्या मर्जीवर अवलंबून न ठेवता गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, अधिकारी यांचा महसूल ठरविण्यासाठी उपयोग करून घेतला. त्यामुळे प्रत्यक्ष पीक कसे आहे, यावर सारा ठरविला जाऊ लागला. रयतेच्या अडचणी शासनाला कळू लागल्या. रयतेवरील अन्याय नष्ट झाला. रयतवारी पद्धतीने गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला.   
राजा किंवा प्रशासक हे प्रजेचे सेवक असतात, ही उच्च भावना बाळगून त्यांनी राज्यकारभार केला. आपल्या अधिपत्याखालील प्रदेशात त्यांनी उत्तम पद्धतीची शासन व्यवस्था व शांतता निर्माण केली. शेतकरी वर्गासाठी हितावह धोरणे आखली. नागरिकांना आवश्यक सुरक्षितता मिळवून दिली.
त्या काळात सतत लढाया होत असल्याने सैन्य एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी असे सर्वदूर फिरत असे.  अशा प्रवासात कोणत्याही मोहिमेवरील कोणत्याही सैन्याच्या तुकडीने शेतक-यांच्या उभ्या पीकांतून जाता कामा नये. पीकांची नासाडी होता कामा नये, अशी आज्ञा छत्रपती शिवरायांनी आपल्या सैन्याला दिली होती.   शेतक-यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, ही त्यांची आज्ञा आजही एका आदर्श प्रशासकाचे वचन म्हणून सुवर्णाक्षरांत कोरली गेली आहे. ‘रयत सुखी, तर राजा सुखी’ ही नीती स्वीकारून त्यांनी शेती व्यवसायात व महसूल व्यवस्थेत अनेक सुधारणा घडविल्या. त्यांच्या उदार, सहिष्णू व लोककल्याणकारी धोरणांमुळे त्यांनी सामान्य रयतेच्या, शेतक-यांच्या, लढवय्या सैनिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले.
राजकीय संघर्षात कोणत्याही महिलेचा अनादर होणार नाही, याची छत्रपती शिवरायांची दक्षता घेतली. सर्व स्त्रियांना आदराची वागणूक द्यावी, असा त्यांचा दंडक होता. महिलांवर अन्याय, अत्याचार करणा-यांची त्यांनी कधीच गय केली नाही. समाजकंटकांना कठोर शिक्षा दिली. परकीय सैन्यातील महिलांचा आदर, सत्कार व संरक्षण करण्याचे त्यांचे धोरण होते.   
त्यांनी सर्व जातीधर्मांतील नागरिकांना एकत्र करून आपले सैन्य उभे केले. आपल्या सहका-यांमध्ये कुठल्याही भेदाभेदाला थारा दिला नाही. शिस्त, कर्तृत्ववानांचा सन्मान, सर्वांना न्याय व समानतेची वागणूक या नेतृत्वगुणांमुळे सैन्याबरोबरच तत्कालीन प्रजेच्या मनातही छत्रपती शिवरायांबद्दल आदर निर्माण झाला. या थोर राजाच्या शब्दांबरहुकूम स्वराज्यनिर्मितीसाठी आपले प्राण त्यागण्याची तयारी असणारे अनेक लढवय्ये व शूर सहकारी निर्माण झाले. शिस्तबद्ध संरक्षण व्यवस्था उभी केली. त्यातून सर्वसमावेशक स्वराज्य उभे राहिले. हे ख-या अर्थाने रयतेचे स्वराज्य होते.
- हर्षवर्धन पवार, जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती
                                    000 

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना 18 फेब्रुवारी ते 23 मार्च पर्यंत समुपदेशनाची सुविधा


दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना 18 फेब्रुवारी ते
23 मार्च पर्यंत समुपदेशनाची सुविधा
अमरावती, दि. 18  : शैक्षणिक वर्ष 2020 मध्ये परीक्षा देणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विभागीय मंडळ स्तरावर समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना परिक्षेसंबंधी असलेल्या समस्यांचे मार्गदर्शन या समुपदेशनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दि. 18 फेब्रुवारी ते 23 मार्च 2020 या कालावधीत सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत विद्यार्थी आपल्या समस्यांचे निराकरण समुपदेशकांना प्रश्न विचारुन करु शकतील. समुपदेशकांची नांवे  व भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.
अमरावती जिल्हृयासाठी सी.एस. कोहळे 9423649541, डी.एस. चौधरी 9421785605, अकोला जिल्ह्यासाठी एच.आर. हिंगणकर 9371641764, एन.आर. गोंडचर 9922063636, यवतमाळ जिल्ह्यासाठी ए.जी. ठमके 9423625414, पी.बी. सुरोशे 9420895934, बुलडाणा जिल्ह्यासाठी व्ही. डी. भारसाकळे 9422926325, एस.एस. लालवाणी 8275232316 तसेच कार्यालयीन हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांक    0721-2662608, असे  विभागीय सचिव अनिल पारधी, अमरावती  विभागीय मंडळ, अमरावती यांनी हे पत्रक प्रसिध्दी दिले आहे.

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा


नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

अमरावती, दि. 18  : अमरावती शहरातील अमरावती चांदूर रेल्वे रामा 297 चे कॉक्रीट रोड बांधकाम रेल्वे स्टेशन ते अंध विद्यालयापर्यंत सुरु आहे. चपराशीपूरा चौकात एका बाजूने बडनेरा कडे जाणाऱ्या पोच रस्त्याचे कॉक्रीटकरणाचे काम करण्यात येणार आहे. मस्जीदच्या बाजूचा रस्ता वाहतूकीस सुरु राहणार असून या लांबीमधील दि. 16 मार्च 2020 पर्यंत या चौकातून उजव्या बाजूची वाहतूक बंद ठेवून चौका पुरती एका बाजूने वाहतूक सुरु ठेवण्यात येणार आहे.  नागरिाकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनी कळविले आहे.

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

पाच दिवसांचा आठवडा निर्णयाचे स्वागत, कामकाजाच्या वेळांचे काटेकोर पालन करावे


पाच दिवसांचा आठवडा
निर्णयाचे स्वागत, कामकाजाच्या वेळांचे काटेकोर पालन करावे
राजपत्रित अधिकारी महासंघाची भूमिका

अमरावती, दि. 13  : राज्य शासनाने येत्या 29 फेब्रुवारीपासून शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य राजपत्रीत अधिकारी महासंघाच्या अमरावती जिल्हा समन्वय समितीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
या संदर्भात प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की महासंघाच्या विविध मागण्यांपैकी पाच दिवसांचा आठवडा ही महत्वपूर्ण मागणी होती आणि ती सरकारने मान्य केली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे पाच दिवसांचा आठवडा हा निर्णय लागू होत असतानाच शासनाने शासकीय कार्यालयांच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळेत बदल करण्याचे ठरवले असून दैनंदि‍न कामकाजाच्या वेळेत वाढ होणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार महिन्यातील सर्व शनिवारी आणि रविवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी राहणार असून कामजाकाजाच्या सर्व दिवशीची कामकाजाची वेळ 45 मिनिटांनी वाढविण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 (सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा) अशी कार्यालयीन कामकाजाची वेळ असेल. 
सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी कामकाजाच्या बदललेल्या वेळेची नोंद घ्यावी आणि त्याची स्वयंस्फूर्तीने काटेकोर अमलबजावनी करावी. जनतेची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी विनंतीही या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या अमरावती समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय फिस्के, जिल्हा सचिव डॉ. शिरीष तेलंग, जिल्हा सहसचिव अनंत धात्रक तसेच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. संदीप इंगळे, राज्य  सहचिटणीस गोपाल बकाले, राज्य सहचिटणीस यशपाल गुडधे, राज्य महिला सरचिटणीस वर्षा भाकरे यांनी हे पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.
000000

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू


जिल्‍ह्यात कलम 37 (1)  व (3) लागू

अमरावती, दि. 07  : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 11 फेब्रुवारी, 2020 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असे अपर  जिल्हा दंडाधिकारी  यांनी कळविले आहे.

राष्ट्रीय नमुना पाहणीला सुरुवात नागरिकांनी आवश्यक सर्व माहिती द्यावी


राष्ट्रीय नमुना पाहणीला सुरुवात
नागरिकांनी आवश्यक सर्व माहिती द्यावी

अमरावती, दि. 06  : केंद्रशासनाच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (Ministry of Statistics & Programme Implementation) अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (National Statistical Office) द्वारे दरवर्षी संपूर्ण देशात राष्ट्रीय नमुना पाहणीच्या विविध विषयावर नियोजनात्मक माहिती व आकडेवारीचे संकलन करण्याचे काम करते. या अनुषंगाने जाने-2020 ते डिसेंबर-2020 या कालावधीत राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 78 व्या फेरीमध्ये "देशांतर्गत पर्यटनावरील खर्च" व ''बहुविध निर्देशांक पाहणी' या विषयावर विस्तृत माहिती गोळा केली जाणार असून महाराष्ट्रामध्ये राज्य नमुन्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत असलेल्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत केली जाणार आहे. 78 व्या फेरीमार्फत गोळा करण्यात येणाऱ्या माहितीचा उपयोग हा पर्यटनाचे देशाच्या आर्थिक स्थितीमधील महत्व, पर्यटनाशी निगडीत विविध क्षेत्रामधील रोजगार निर्मिती, मागास वर्गीयांचा विकास या सारख्या विविध विषयाकरिता, तसेच United Nation ने ठरवून दिलेल्या शाश्वत विकास ध्येय 2030 च्या अनुषंगाने देशस्तरावरील काही महत्वाची निर्देशांक काढण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे.
अमरावती विभागातील सर्व नागरिकांनी, महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत येणाऱ्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामधील अधिकारी/कर्मचारी यांना माहिती गोळा करण्यास सहकार्य करुन आवश्यक व योग्य माहिती द्यावी, असे आवाहन सहसंचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, प्रादेशिक कार्यालय, अमरावती यांनी केले आहे.
000000





मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

शासकीय आश्रम शाळेवर शिक्षक पदभरती प्रक्रिया पात्र उमेदवारांची चाचणी परिक्षा 9 रोजी


शासकीय आश्रम शाळेवर शिक्षक पदभरती प्रक्रिया
पात्र उमेदवारांची चाचणी परिक्षा 9 रोजी

अमरावती, दि. 04 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयाकडून शासकीय आश्रमशाळेवर संगणक शिक्षक व कला कार्यानुभव शिक्षक पदांवर कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. पदभरतीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधून संगणक शिक्षक पदासाठी 114 उमेदवार व कला कार्यानुभव शिक्षक पदासाठी 144 प्रात्र उमेदवारांची यादी कार्यालयात प्रसिध्द करण्यात आली असून पात्र उमेदवारांची चाचणी परिक्षा रविवार, दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 12.30 या वेळेत सिताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिव्हील लाईन येथे घेण्यात येणार आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र परिक्षेच्या तीन दिवस पूर्वी इ-मेलवर प्राप्त न झाल्यास कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावे असे प्रकल्प अधिकारी, यांनी कळविले आहे.
****






शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे सौरउर्जा तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे आयोजन


शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे
सौरउर्जा तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे आयोजन

अमरावती, दि. 4 : ग्रामीण अल्प शिक्षीत युवक व युवतींना स्वयंरोजगारातून स्वावलंबी होता यावे यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्रालय, व केंद्रिय प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलीटेक्निक योजना शासकीय तंत्रनिकेतन,अमरावती येथे राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत स्वंयरोजगारासाठी उपयुक्त तांत्रिक कौशल्य व सौर उर्जेवर आधारित 15 दिवस कालावधीचे नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन संस्थेत करण्यात येत आहे.
 प्रशिक्षणात नाव नोंदविण्यासाठीचे अर्ज कार्यालयामध्ये उपलब्ध असून या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी वयाची अट नाही. मुलाखत पद्धतीने प्रशिक्षणार्थ्याची निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलीटेक्निक योजना कार्यालय, मुलींचे वसतीगृहासमोर, शासकीय तंत्रनिकेतन परीसर गाडगे नगर, अमरावती येथे संपर्क साधावा, असे संस्थेचे प्राचार्य डॉ. आर. पी. मोगरे व योजनेचे समन्वयक प्रा. एस. जे. गायकवाड यांनी कळविले आहे.
00000


सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

शासकीय आश्रम शाळेवर शिक्षक पदभरती प्रक्रिया


शासकीय आश्रम शाळेवर शिक्षक पदभरती प्रक्रिया
पात्र उमेदवारांची चाचणी परिक्षा 9 रोजी

अमरावती, दि. 03 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयाकडून शासकीय आश्रमशाळेवर संगणक शिक्षक व कला कार्यानुभव शिक्षक पदांवर कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. पदभरतीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधून संगणक शिक्षक पदासाठी 114 उमेदवार व कला कार्यानुभव शिक्षक पदासाठी 144 प्रात्र उमेदवारांची यादी कार्यालयात प्रसिध्द करण्यात आली असून पात्र उमेदवारांची चाचणी परिक्षा रविवार, दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 12.30 या वेळेत सिताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिव्हील लाईन येथे घेण्यात येणार आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र परिक्षेच्या तीन दिवस पूर्वी इ-मेलवर प्राप्त न झाल्यास कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावे असे प्रकल्प अधिकारी, यांनी कळविले आहे.
****






महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी कृषीकर्ज खात्याची तातडीने नोंदणी करावी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल




महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी
कृषीकर्ज खात्याची तातडीने नोंदणी करावी
-          जिल्हाधिकारी शैलेश नवाल
अमरावती, दि. 3 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया एक फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. ही माहिती सात फेब्रुवारीपर्यंत पूर्णत: भरण्यात यावी, तसेच यात काही अडचणी येत असल्यास याबाबत जिल्हा प्रशासनास अवगत करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात आज महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया, तसेच या प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी बँकेच्या प्रतिनिधीकडून जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरू शकतील अशा खातेदाराची बँकनिहाय माहिती घेतली. काही बँका एकत्रितपणे नागपूर किंवा मुंबई येथून शेतकऱ्यांची नावे नोंदणी करीत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील किती खातेदारांची नावे नोंदणी करण्यात आली, याची माहिती कळविण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांची माहिती नोंदविण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत कालावधी असला तरी सात फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण नावे नोंदविण्यासाठी प्रयत्न करावे. नावे पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी येत असलेल्या अडचणी जिल्हा प्रशासनास सांगाव्यात. या समस्या शासनास कळविण्यात येतील.
            कर्जदार शेतकरी स्वत:हून बँकांना माहिती देत आहेत. त्यामुळे आलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांची माहिती व्यवस्थित भरावी, यातून कोणताही पात्र लाभार्थी सुटू नये, याची खबरदारी बँकांनी घ्यावी. शेतकरी पात्र असून त्यांची नोंदणी झाली नसल्याचे प्रकार समोर आल्यास, अशा प्रकरणी बँकांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. ज्या अडचणी बँकस्तरावर सोडविणे शक्य आहे, अशा सर्व समस्या त्याच ठिकाणी सोडवाव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
00000