गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

पाच दिवसांचा आठवडा निर्णयाचे स्वागत, कामकाजाच्या वेळांचे काटेकोर पालन करावे


पाच दिवसांचा आठवडा
निर्णयाचे स्वागत, कामकाजाच्या वेळांचे काटेकोर पालन करावे
राजपत्रित अधिकारी महासंघाची भूमिका

अमरावती, दि. 13  : राज्य शासनाने येत्या 29 फेब्रुवारीपासून शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य राजपत्रीत अधिकारी महासंघाच्या अमरावती जिल्हा समन्वय समितीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
या संदर्भात प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की महासंघाच्या विविध मागण्यांपैकी पाच दिवसांचा आठवडा ही महत्वपूर्ण मागणी होती आणि ती सरकारने मान्य केली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे पाच दिवसांचा आठवडा हा निर्णय लागू होत असतानाच शासनाने शासकीय कार्यालयांच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळेत बदल करण्याचे ठरवले असून दैनंदि‍न कामकाजाच्या वेळेत वाढ होणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार महिन्यातील सर्व शनिवारी आणि रविवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी राहणार असून कामजाकाजाच्या सर्व दिवशीची कामकाजाची वेळ 45 मिनिटांनी वाढविण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 (सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा) अशी कार्यालयीन कामकाजाची वेळ असेल. 
सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी कामकाजाच्या बदललेल्या वेळेची नोंद घ्यावी आणि त्याची स्वयंस्फूर्तीने काटेकोर अमलबजावनी करावी. जनतेची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी विनंतीही या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या अमरावती समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय फिस्के, जिल्हा सचिव डॉ. शिरीष तेलंग, जिल्हा सहसचिव अनंत धात्रक तसेच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. संदीप इंगळे, राज्य  सहचिटणीस गोपाल बकाले, राज्य सहचिटणीस यशपाल गुडधे, राज्य महिला सरचिटणीस वर्षा भाकरे यांनी हे पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा