खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी बाह्यरूग्ण
तपासणी सुरू ठेवावी
-
विभागीय आयुक्त पियूष सिंह यांचे
आवाहन
Ø रूग्णालये
बंद ठेवल्यास डॉक्टर्स, वैद्यकीय
व्यावसायिकांवर कारवाई करणार
अमरावती, दि. २७ : कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने विभागातील काही डॉक्टर्स
आणि वैद्यकीय व्यावसायिक बाह्यरूग्ण तपासणी आणि रूग्णालये बंद ठेऊन वैद्यकीय सेवा
देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी
बाह्यरूग्ण तपासणी सुरू ठेवावी असे आवाहन विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी केले
आहे.
कोरोना विषाणू हा तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा असल्याने याबाबत
तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपायायेजना करणे आवश्यक आहे. मात्र काही
डॉक्टर्स आणि वैद्यकीय व्यावसायिक संसर्गाच्या भितीने रूग्णालये बंद ठेवत असल्याचे
निदर्शनास आले आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सर्व वैद्यकीय
व्यावसायिकांनी आपल्या सेवा सुरळीत सुरू ठेवाव्यात. तसेच आवश्यकता भासल्यास त्याठिकाणी
त्यांची सेवा अधिग्रहित करण्याच्या सुचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय सेवा
बाह्यरूग्ण तपासणी आणि रूग्णालये सुरळीत सुरू राहतील याची दक्षता घेण्याच्या सूचना
विभागीय आयुक्तांनी केल्या आहेत. वैद्यकीय सेवा बंद ठेवल्यास या निर्देशाचे
उल्लंघन करणाऱ्या डॉक्टर्स, वैद्यकीय व्यावसायिक यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन
अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र कोवीड उपाययोजना नियम 2020, तसेच साथरोग अधिनियम 1897
नुसार कारवाई करावी, तसेच रूग्णालयांची नोंदणी रद्द करण्यासाठी इंडियन मेडीकल
कौन्सिल तसेच आवश्यक त्या सक्षम प्राधिकरणासही कळविण्यात यावे, असे निर्देश
विभागीय आयुक्त यांनी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
00000