गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन






राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन
अमरावती, दि. 30 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, सामान्य प्रशासन उपायुक्त संजय पवार, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख यांनीही तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

रविवार, २६ एप्रिल, २०२०

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून दि. 26.4.2020 रोजी प्राप्त

(मार्च 2020 पासून अद्यापपर्यंतचा) अहवाल

 

दैनिक संशयित : 148

तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 6078

सध्या भरती असलेले संशयित : 46

अद्यापपर्यंत एकूण भरती संशयित (Progressive) : 427

एकूण दाखल पॉझिटिव्ह : 10

आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 45

अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive)  : 850

अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 712

प्रलंबित अहवाल : 111

अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 20 (6 मयत, 10 दाखल, 4 बरे होऊन घरी गेलेले)

अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 4

विभागीय आयुक्त कार्यालयात 
महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन
अमरावती, दि. २६ : विभागीय आयुक्त कार्यालयात आज महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त संजय पवार यांनी प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी नाझर श्री. पेठे यांच्यासह आधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

बुधवार, १५ एप्रिल, २०२०

गरजेच्या वेळी घरपोच पोषण आहार पोहोचल्याचे समाधान



गरजेच्या वेळी घरपोच पोषण आहार पोहोचल्याचे समाधान

*कळमखार, जुटपाणी येथील महिलांच्या भावना
*धारणी आदिवासी प्रकल्प विभागाचा पुढाकार
*मेळघाटातील दूर्गम भागात घरपोच पोषण आहार
अमरावती, दि. 15 : पूर्वी अंगणवाडीमध्ये जाऊन पोषण आहार घेत होतो. मधल्या काळात आलेल्या संचारबंदीच्या निर्बंधामुळे अंगणवाडीत जाणे शक्य होत नव्हते. आता गेल्या दहा दिवसांपासून अंगणवाडी ताईच घरी पोषण आहार पोहोचविते. या पोषण आहाराचा दर्जा उत्तम आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शासनाने आमची काळजी घेतली याचे समाधान आहे, अशा भावना धारणी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या आखत्यारितीतील कळमखार आणि जुटपाणी येथील महिलांनी व्यक्त केली.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून सध्या अंमलात असेलल्या निर्बंधामुळे गरोदर आणि स्तनदा मातांना आता घरपोच पोषण आहार पोहोचविला जातो. पूर्वी त्यांना अंगणवाडीत येऊन पोषण आहार घ्यावा लागत होता. याबाबत कळमखार आणि जुटपाणी येथील लाभार्थ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेतल्या. कळमखार येथील नसरीन लखन कासदेकर, शिवानी लखन कराते, गौरी प्रकाश टिंगणे, कविता कमलेश उमरकर तर जुटपाणी येथील सैफी विवेक कासदेकर, भुलई सोहनलाल धांडे यांनी घरपोच पोषण आहाराबद्दल सकारात्मक भावना व्यक्त केल्या.
कळमखार येथील नसरीन कासदेकर म्हणाल्या, कोरोनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गरजू महिलांच्या आरोग्याची काळजी घेऊन अंगणवाडी सेविका घरी पोषण आहार पोहोचवित आहे. ही सुविधा अत्यंत चांगली आहे. शिवानी कराटे यांना 6 एप्रिलपासून घरपोच आहार मिळत आहे. ज्याप्रमाणे अंगणवाडीत आहार मिळत होता, त्याचप्रमाणे घरीही आहार मिळत आहे. घरी पोषण  आहार मिळत असल्याने सोय झाली आहे, असे सांगितले. गौरी टिंगणे यांनी ज्या काळात पोषण आहार आवश्यक आहे, त्याच काळात घरपोच सोय झाली आहे. अंगणवाडी सेविकांनी घरपोच आहार देण्याबाबत माहिती दिली आहे. शासनातर्फे आमच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे, याबाबत समाधान व्यक्त केले. कविता उमरकर यांनी पोषण आहार भरपूर मिळतो. दररोजच वेगवेगळी भाजीही देण्यात येते. घरपोच सुविधेमुळे प्रामुख्याने गरोदर मातांची चांगली सोय झाली असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली.
जुटपाणी येथील सैफी कासदेकर यांनी चांगला पोषण आहार मिळत आहे. ज्याप्रमाणे अंगणवाडीत आहार मिळतो, त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका आहार पोहोचवित असल्याचे सांगितले, तर भुलई धांडे यांनी पोषण आहार चांगल्या दर्जाचा मिळतो. दुपारी बारा ते दोन दरम्यान दररोज घरपोच आहार मिळत असल्याचे सांगितले. 
पुरक पोषण आहारांतर्गत तीन पोळ्या, वरण, भात, भाजी, एक अंडे, शेंगदाणाचा लाडू अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पोहोचवितात. हा आहार ताजा आणि गरम पोहोचवावा यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये आहार तयार करताना पुरेशी काळजी घेतली जात आहे. सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत हा आहार तयार करून त्यानंतर मदतनीसांच्या सहकार्याने गरोदर आणि स्तनदा मातांच्या घरापर्यंत हा पोहोचविला जातो.
00000










सोमवार, १३ एप्रिल, २०२०

विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


विभागीय आयुक्त कार्यालयात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
अमरावती, दि 14 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल उपायुक्त  गजेंद्र बावणे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  उपायुक्त संजय पवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक आयुक्त श्री. काळकर, तहसिलदार वैशाली पाथरे, रवी महाले, नाझर श्री. पेठे यावेळी उपस्थित होते.
000000



विभागीय माहिती कार्यालयात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
अमरावती, दि 14 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय माहिती कार्यालयात उपसंचालक (माहिती) राधाकृष्ण मुळी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सहायक संचालक गजानन कोटुरवार, लिपिक रुपेश सवई, छायाचित्रकार मनीष झिमटे. विजय आठवले, कोमल भगत यावेळी उपस्थित होते.

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

पायाभूत सुविधा क्षेत्रातील एमईआयल कंपनीकडून मुख्यमंत्री सहायता निधीत दोन कोटी रुपये जमा


पायाभूत सुविधा क्षेत्रातील एमईआयल कंपनीकडून
मुख्यमंत्री सहायता निधीत दोन कोटी रुपये जमा
अमरावती दि.9 : -  कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य एकजूटीने मुकाबला करत आहे. यासाठी आवश्यक अशा निधीसाठी दानशूर व्यक्ती, संस्था आदी घटकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या अनुषंगाने आता मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचा ओघ सुरु झाला आहे. त्यामध्ये आज मेघा इंजिनीयरिंग अण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेड (एमईआयल) या कंपनीने दोन कोटी रुपयांचे योगदान जमा केले.
एमईआयल ही पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत कंपनी आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीव्ही कृष्णा रेड्डी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली आहे. आपल्या या योगदानाबाबत त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्राद्वारे अवगतही केले आहे. पत्रात त्यांनी कंपनी स्वयंस्फुर्तीने हे योगदान जमा करत असल्याचे नमूद करतानाच महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी व्यापक आणि दृढ असे प्रयत्न होत असल्याचाही उल्लेख केला आहे.
000000

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

यशकथा - लाख मोलाची मदत


यशकथा
लाख मोलाची मदत
जगभर कोरोनाचा वाढता प्रार्दुभावाला थांबविण्यासाठी वेगवेगळी पाऊले उचलेली जात आहेत. यातच भारतात 24 मार्चपासून भारत सरकारने देशभर लॉकडाऊनचा निर्णय घेतला. ‘जे लोक जिथे असतील त्यांनी तिथेच राहावे’ त्यांच्या जीवनावश्यक गरजांची सोय शासन यावेळी पुर्ण करणार, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहेत.
व्यवसाय, नोकरी करणा-यांना घरीच राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. ज्यांची कामे घरून होत असतील त्यांनी ती कामे घरी राहूनच करावी. केवळ जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, औषधी विक्रेत्यांची दुकानांना यातून वगळण्यात आलेले आहेत. यासह आवश्यक सेवेमध्ये मोडणा-या अधिकारी-कर्मचारी यांना आळीपाळीने येण्याची सोय लॉकडाऊन असेपर्यंत राहणार आहे. ही सर्व व्यवस्था कोरोनाचा संसर्ग होऊ नये, प्रकोप वाढू नये या दृष्टीने करण्यात आलेली आहे.
            महाराष्ट्र शासनानेही वेगवेगळया उपयायोजना आखून प्रत्येकाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तात्पुरत्या निवा-याची, जेवणाची, आदि सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.  माझ्या बाबांचे निधन 15 मार्चला झाल्यामुळे मी नागपूरला आले होते. प्रथेप्रमाणे सर्व सोपस्कार आटोपून मी 22 तारखेला अमरावती येथे सासरच्या नातेवाईकांकडे आले. रविवार दिनांक 23 तारखेला देशभर ‘जनता कर्फ्युं’ लावण्यात आला होता. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुढे 24 तारखेपासून सुरक्षितेतेसाठी देशभर लॉकडाऊन घोषित केल्यामुळे नवी दिल्ली येथे जाता आले नाही. सर्वांनाच घरी रहावे लागत आहे. यामुळे कोरोनाच्या संक्रमनापासून बचाव होतच आहे, हे खरेच आहे.  
जे लोक दारिद्रय रेषेखाली आहेत त्यांची गैरसोय टाळण्यासाठी शासनातर्फे त्यांना घरपोच अन्न-धान्य पुरविण्यात आलेले आहे. सध्या मी अमरावतीतील यशोदा नगर या परिसररात नातेवाईकांकडे आहे. घराच्या बाजुला असलेली ज्येष्ठ नागरीक पार्वताबाई गडलींग वय जवळपास 65 वर्ष असेल या एकटयाच राहतात. त्यांच्या मागे पुढे कुणीच नाही. या कठीण समयी शासनाच्यावतीने त्यांना महिनाभर पुरेल येवढे साहित्य पोलीसांमार्फत घरपोच मिळालेले आले. यामध्ये तांदुळ, गव्हाचे पीठ, दाळ, तेल, तीखट, मीठ, चहापत्ती, साखर असे सर्व किराणा साहित्य आहे.
शासनाकडून मिळालेल्या या मदतीबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, ‘माझ्या नात्यातल जवळ कुणीच नाही आहे, शासनाकडून अशा काळात मिळालेली ही मदत माझ्यासाठी फार मोठी आहे, लाख लाख धन्यवाद…  
शासनाकडून मिळालेली ही मदत त्यांच्यासाठी सध्याच्या घडीला लाख मोलाची ठरत आहे.
                                                                                                                                     अंजु निमसरकर
                                                                                                                             माहिती अधिकारी


अमरावतीत मिळाला श्रमजिवींना आश्रय!














अमरावतीत मिळाला श्रमजिवींना आश्रय!
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दि. 24 मार्च रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून प्रवासावर निर्बंध लादण्यात आले. प्रवासात असलेल्या आणि कंत्राटदाराने काम बंद केल्याने विविध प्रकल्पांवर रोजंदारीवर काम करणाऱ्या श्रमिकांची गैरसोय झाली. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत निवारा आणि जेवणाची सोय होणे महत्त्वाचे होते. श्रमिकांची गैरसोय लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने या नागरिकांसाठी तातडीने निवास आणि जेवणाची व्यवस्था केली. ऐन गरजेच्या वेळी केलेल्या या व्यवस्थेमुळे या ठिकाणी असलेल्या श्रमिकांनी समाधान व्यक्त केले.
अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत आलेल्या प्रवासी नागरिक आणि श्रमिकांना निंभोरा येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात आश्रय देण्यात आला आहे. दि. 29 मार्चपासून 12 श्रमिकांपासून झालेली सुरवात दि. 1 एप्रिल रोजी 144 पर्यंत पोहोचली आहे. यात 101 पुरूष, 25 महिला आणि 18 लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांना त्यांच्या सोयीप्रमाणे स्वतंत्र खोल्या देण्यात आल्या आहे. सामाजिक अंतर राहावे यासाठी खोल्यांचे वाटप करताना लगतची एक खोली मोकळी सोडून दुसरी खोली देण्यात आली आहे.
सुमारे एक हजार नागरिकांच्या निवाऱ्याची सोय याठिकाणी आहे. वसतीगृहाच्या एका खोलीत कमाल चार खाटांची सोय करण्यात आलेली आहे. मास्क, पिण्याचे पाणी, हात धुण्यासाठी साबन, मच्छर अगरबत्ती आदी वस्तु पुरवण्यात आल्या आहेत. सकाळी चहा-नास्ता, दुपारी आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था वसतीगृहाच्या भोजनगृहामध्ये करण्यात आली आहे. याठिकाणी असलेले नागरिक एकमेकांच्या सानिध्यात येऊ नये यासाठी जेवणाच्या वेळी तसेच खोलीमध्ये सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याठिकाणच्या व्यवस्थेची जबाबदारी अमरावतीचे तहसिलदार संजय काकडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच दोन मंडळ अधिकारीही प्रत्यक्ष लक्ष ठेऊन आहेत.
अमरावती येथील निवाऱ्यात सर्वाधिक 44 श्रमिक हे मध्यप्रदेशातील आहेत. इतर लोक हे तेलंगणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, झारखंड आदी राज्यातील आहेत. विविध प्रकल्पांवर कामासाठी आलेले हे श्रमिक कंत्राटदारांनी कामे बंद केल्याने गावी जाण्यासाठी निघाले होते. पायी आणि मिळेल त्या वाहनाने जात असताना जिल्ह्याच्या सिमा आणि तपासणी नाक्यांवर त्यांना अडविण्यात आले. वैद्यकीय तपासणी करून त्यांची रवानगी या प्रवासी निवाऱ्यात करण्यात आली. या नागरिकांना निर्बंधाच्या कालावधीत म्हणजेच दि. 14 एप्रिलपर्यंत याचठिकाणी ठेवण्यात येईल.
सध्या परिस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असू शकते. खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणी स्वतंत्र वैद्यकीय पथक नेमण्यात आले आहे. येथील नागरिकांमध्ये अद्यापपर्यंत संशयित रूग्ण आढळलेला नाही. तरीही याठिकाणी वास्तव्यास असलेल्या प्रत्येक नागरिकाची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. येथील नागरिकांना खोलीमध्ये राहताना आणि जेवताना सामाजिक अंतर राखण्यास सांगण्यात येत आहे. तसेच सर्दी, कोरडा खोकला, ताप आदी लक्षणे आढळल्यास तात्काळ संपर्क साधण्यास सांगण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून औषधांचे वाटप करण्यात येत आहे. याठिकाणी कोणत्याची आजाराची लागण होणार नाही, यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.
अमरावतीतील निवास व्यवस्थेबाबत मुळचे झारखंड येथील प्रदीप यादव यांनी समाधान व्यक्त केले. ते मुंबई येथून झारखंड येथे जाण्यास निघाले होते. दरम्यानच्या काळात प्रवासावर निर्बंध घातल्यामुळे पोलिसांनी त्यांना अमरावती येथे थांबवून त्यांच्या निवासाची व्यवस्था केली. याठिकाणी जेवण आणि राहण्याची उत्तम सोय केल्याबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.
नागरिकांच्या सोयीसाठी याठिकाणी तीन मंडळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जबाबदारी सोपविण्यात आलेले मंडळ अधिकारी नागरिकांसाठी जेवण आणि निवास परिसराची निगराणी राखत आहेत. खोलीमध्ये राहताना आणि जेवणाच्या वेळी नागरिकांनी अंतर राखून उभे राहण्यावर त्यांनी लक्ष ठेवले आहे.
गरजूंना तातडीने निवारा आणि जेवणाची व्यवस्था व्हावी, यासाठी अमरावतीतील सेवाभावी संस्था समोर आल्या आहेत. त्यांनी स्वयंसेवक नेमून विविध माध्यमातून त्यांचा संपर्क क्रमांक जाहिर केला. त्यामुळे या निवाऱ्याबाबत प्रवासात असणाऱ्या नागरिकांना माहिती मिळाली. केवळ एका संपर्कावर स्वयंसेवकांकडून योग्य माहिती पुरविण्यात येत आहे. तसेच आवश्यक असल्यास त्यांना वाहनांचीही सुविधा देऊन निवाऱ्यापर्यंत घेऊन येण्यात येत आहे. त्यांची उत्तमप्रकारे सोय होईल, याकडेही या स्वयंसेवी संस्था लक्ष ठेऊन आहे.

गजानन कोटुरवार,
सहायक संचालक (माहिती),
विभागीय माहिती कार्यालय, अमरावती.
00000