अमरावतीत मिळाला श्रमजिवींना आश्रय!
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दि. 24 मार्च
रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून प्रवासावर निर्बंध लादण्यात आले. प्रवासात असलेल्या
आणि कंत्राटदाराने काम बंद केल्याने विविध प्रकल्पांवर रोजंदारीवर काम करणाऱ्या श्रमिकांची
गैरसोय झाली. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत निवारा आणि जेवणाची सोय होणे महत्त्वाचे
होते. श्रमिकांची गैरसोय लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने या नागरिकांसाठी तातडीने निवास
आणि जेवणाची व्यवस्था केली. ऐन गरजेच्या वेळी केलेल्या या व्यवस्थेमुळे या ठिकाणी असलेल्या
श्रमिकांनी समाधान व्यक्त केले.
अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत आलेल्या प्रवासी नागरिक आणि
श्रमिकांना निंभोरा येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात आश्रय देण्यात आला आहे.
दि. 29 मार्चपासून 12 श्रमिकांपासून झालेली सुरवात दि. 1 एप्रिल रोजी 144 पर्यंत पोहोचली
आहे. यात 101 पुरूष, 25 महिला आणि 18 लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांना त्यांच्या
सोयीप्रमाणे स्वतंत्र खोल्या देण्यात आल्या आहे. सामाजिक अंतर राहावे यासाठी खोल्यांचे
वाटप करताना लगतची एक खोली मोकळी सोडून दुसरी खोली देण्यात आली आहे.
सुमारे एक हजार नागरिकांच्या निवाऱ्याची सोय याठिकाणी आहे.
वसतीगृहाच्या एका खोलीत कमाल चार खाटांची सोय करण्यात आलेली आहे. मास्क, पिण्याचे पाणी,
हात धुण्यासाठी साबन, मच्छर अगरबत्ती आदी वस्तु पुरवण्यात आल्या आहेत. सकाळी चहा-नास्ता,
दुपारी आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था वसतीगृहाच्या भोजनगृहामध्ये करण्यात आली आहे.
याठिकाणी असलेले नागरिक एकमेकांच्या सानिध्यात येऊ नये यासाठी जेवणाच्या वेळी तसेच
खोलीमध्ये सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याठिकाणच्या व्यवस्थेची
जबाबदारी अमरावतीचे तहसिलदार संजय काकडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच दोन मंडळ
अधिकारीही प्रत्यक्ष लक्ष ठेऊन आहेत.
अमरावती येथील निवाऱ्यात सर्वाधिक 44 श्रमिक हे मध्यप्रदेशातील
आहेत. इतर लोक हे तेलंगणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, झारखंड आदी राज्यातील आहेत. विविध
प्रकल्पांवर कामासाठी आलेले हे श्रमिक कंत्राटदारांनी कामे बंद केल्याने गावी जाण्यासाठी
निघाले होते. पायी आणि मिळेल त्या वाहनाने जात असताना जिल्ह्याच्या सिमा आणि तपासणी
नाक्यांवर त्यांना अडविण्यात आले. वैद्यकीय तपासणी करून त्यांची रवानगी या प्रवासी
निवाऱ्यात करण्यात आली. या नागरिकांना निर्बंधाच्या कालावधीत म्हणजेच दि. 14 एप्रिलपर्यंत
याचठिकाणी ठेवण्यात येईल.
सध्या परिस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता
असू शकते. खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणी स्वतंत्र वैद्यकीय पथक नेमण्यात आले आहे.
येथील नागरिकांमध्ये अद्यापपर्यंत संशयित रूग्ण आढळलेला नाही. तरीही याठिकाणी वास्तव्यास
असलेल्या प्रत्येक नागरिकाची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. येथील नागरिकांना
खोलीमध्ये राहताना आणि जेवताना सामाजिक अंतर राखण्यास सांगण्यात येत आहे. तसेच सर्दी,
कोरडा खोकला, ताप आदी लक्षणे आढळल्यास तात्काळ संपर्क साधण्यास सांगण्यात येत आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून औषधांचे वाटप करण्यात येत आहे. याठिकाणी कोणत्याची आजाराची लागण
होणार नाही, यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.
अमरावतीतील निवास व्यवस्थेबाबत मुळचे झारखंड येथील प्रदीप
यादव यांनी समाधान व्यक्त केले. ते मुंबई येथून झारखंड येथे जाण्यास निघाले होते. दरम्यानच्या
काळात प्रवासावर निर्बंध घातल्यामुळे पोलिसांनी त्यांना अमरावती येथे थांबवून त्यांच्या
निवासाची व्यवस्था केली. याठिकाणी जेवण आणि राहण्याची उत्तम सोय केल्याबद्दल त्यांनी
जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.
नागरिकांच्या सोयीसाठी याठिकाणी तीन मंडळ अधिकाऱ्यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. जबाबदारी सोपविण्यात आलेले मंडळ अधिकारी नागरिकांसाठी जेवण
आणि निवास परिसराची निगराणी राखत आहेत. खोलीमध्ये राहताना आणि जेवणाच्या वेळी नागरिकांनी
अंतर राखून उभे राहण्यावर त्यांनी लक्ष ठेवले आहे.
गरजूंना तातडीने निवारा आणि जेवणाची व्यवस्था व्हावी, यासाठी
अमरावतीतील सेवाभावी संस्था समोर आल्या आहेत. त्यांनी स्वयंसेवक नेमून विविध माध्यमातून
त्यांचा संपर्क क्रमांक जाहिर केला. त्यामुळे या निवाऱ्याबाबत प्रवासात असणाऱ्या नागरिकांना
माहिती मिळाली. केवळ एका संपर्कावर स्वयंसेवकांकडून योग्य माहिती पुरविण्यात येत आहे.
तसेच आवश्यक असल्यास त्यांना वाहनांचीही सुविधा देऊन निवाऱ्यापर्यंत घेऊन येण्यात येत
आहे. त्यांची उत्तमप्रकारे सोय होईल, याकडेही या स्वयंसेवी संस्था लक्ष ठेऊन आहे.
गजानन कोटुरवार,
सहायक संचालक (माहिती),
विभागीय माहिती कार्यालय, अमरावती.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा