बुधवार, १५ एप्रिल, २०२०

गरजेच्या वेळी घरपोच पोषण आहार पोहोचल्याचे समाधान



गरजेच्या वेळी घरपोच पोषण आहार पोहोचल्याचे समाधान

*कळमखार, जुटपाणी येथील महिलांच्या भावना
*धारणी आदिवासी प्रकल्प विभागाचा पुढाकार
*मेळघाटातील दूर्गम भागात घरपोच पोषण आहार
अमरावती, दि. 15 : पूर्वी अंगणवाडीमध्ये जाऊन पोषण आहार घेत होतो. मधल्या काळात आलेल्या संचारबंदीच्या निर्बंधामुळे अंगणवाडीत जाणे शक्य होत नव्हते. आता गेल्या दहा दिवसांपासून अंगणवाडी ताईच घरी पोषण आहार पोहोचविते. या पोषण आहाराचा दर्जा उत्तम आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शासनाने आमची काळजी घेतली याचे समाधान आहे, अशा भावना धारणी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या आखत्यारितीतील कळमखार आणि जुटपाणी येथील महिलांनी व्यक्त केली.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून सध्या अंमलात असेलल्या निर्बंधामुळे गरोदर आणि स्तनदा मातांना आता घरपोच पोषण आहार पोहोचविला जातो. पूर्वी त्यांना अंगणवाडीत येऊन पोषण आहार घ्यावा लागत होता. याबाबत कळमखार आणि जुटपाणी येथील लाभार्थ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेतल्या. कळमखार येथील नसरीन लखन कासदेकर, शिवानी लखन कराते, गौरी प्रकाश टिंगणे, कविता कमलेश उमरकर तर जुटपाणी येथील सैफी विवेक कासदेकर, भुलई सोहनलाल धांडे यांनी घरपोच पोषण आहाराबद्दल सकारात्मक भावना व्यक्त केल्या.
कळमखार येथील नसरीन कासदेकर म्हणाल्या, कोरोनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गरजू महिलांच्या आरोग्याची काळजी घेऊन अंगणवाडी सेविका घरी पोषण आहार पोहोचवित आहे. ही सुविधा अत्यंत चांगली आहे. शिवानी कराटे यांना 6 एप्रिलपासून घरपोच आहार मिळत आहे. ज्याप्रमाणे अंगणवाडीत आहार मिळत होता, त्याचप्रमाणे घरीही आहार मिळत आहे. घरी पोषण  आहार मिळत असल्याने सोय झाली आहे, असे सांगितले. गौरी टिंगणे यांनी ज्या काळात पोषण आहार आवश्यक आहे, त्याच काळात घरपोच सोय झाली आहे. अंगणवाडी सेविकांनी घरपोच आहार देण्याबाबत माहिती दिली आहे. शासनातर्फे आमच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे, याबाबत समाधान व्यक्त केले. कविता उमरकर यांनी पोषण आहार भरपूर मिळतो. दररोजच वेगवेगळी भाजीही देण्यात येते. घरपोच सुविधेमुळे प्रामुख्याने गरोदर मातांची चांगली सोय झाली असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली.
जुटपाणी येथील सैफी कासदेकर यांनी चांगला पोषण आहार मिळत आहे. ज्याप्रमाणे अंगणवाडीत आहार मिळतो, त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका आहार पोहोचवित असल्याचे सांगितले, तर भुलई धांडे यांनी पोषण आहार चांगल्या दर्जाचा मिळतो. दुपारी बारा ते दोन दरम्यान दररोज घरपोच आहार मिळत असल्याचे सांगितले. 
पुरक पोषण आहारांतर्गत तीन पोळ्या, वरण, भात, भाजी, एक अंडे, शेंगदाणाचा लाडू अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पोहोचवितात. हा आहार ताजा आणि गरम पोहोचवावा यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये आहार तयार करताना पुरेशी काळजी घेतली जात आहे. सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत हा आहार तयार करून त्यानंतर मदतनीसांच्या सहकार्याने गरोदर आणि स्तनदा मातांच्या घरापर्यंत हा पोहोचविला जातो.
00000










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा