महिला सक्षमीकरण
योजनांच्या अंमलबजावणीत सर्व विभागांत समन्वय आवश्यक
- श्रीमती ज्योतीताई
ठाकरे
अमरावती, दि. २ : महिला सक्षमीकरणासाठी
विविध विभाग अनेक योजना राबवतात. योजनांच्या एकसंध परिणाम व प्रभावी
अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे करण्याचे निर्देश महिला आर्थिक
विकास महामंडळाच्या अध्यक्ष श्रीमती ज्योतीताई ठाकरे यांनी दिले. जिल्हाधिकारी
कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित विविध विभागाच्या समन्वय सभेत त्या बोलत
होत्या.यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी
अधिकारी महिला व बालविकास
प्रशांत थोरात, जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा अग्रणी बँकेचे यवस्थापक
जितेंद्र कुमार झा, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र
रहाट, सुनील खराटे, विभागीय सनियंत्रण अधिकारी केशव पवार उपस्थित होते.
श्रीमती ठाकरे म्हणाल्या, शासकीय
योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागात समन्वय असणे गरजेचे आहे.
महिलांसोबत प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या
सोडविण्यावर आपला भर असावा. बचत गट म्हणजे महिलांची एक प्रकारची बँकेच आहे.
बचतगटाच्या माध्यमातून व्यवसाय करून जमा केलेली पुंजी या महिला कुटुंबाच्या गरजा
पूर्ण करण्यासाठी वापरतात, त्यावेळी या महिलांचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला असतो.
माविमची कार्यप्रणाली सर्व महिलांना खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या
स्वावलंबी करणारी आहे हे सिद्ध झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील
मेळघाट या आदिवासीबहुल भागातील महिलांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला असता तेथील
महिलांनी माविमच्या मदतीने आर्थिक उन्नती केली असल्याचे
दिसून येते ही अतिशय अभिनंदनीय बाब आहे असे श्रीमती ठाकरे यावेळी म्हणाल्या.
बुलडाणा जिल्ह्यातील
बचतगटाच्या महिलांनी बुलडाणा वाशीम महामार्गावर माविमच्या साहाय्याने आलुचिप्स
तयार करणे, त्याचे उत्कृष्ट वेष्टनासह विक्री करण्याचा
उद्योग सुरू केला . विशेष म्हणजे त्या उद्योगाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. यावरून
लक्षात येते की महिलांच्या अंगी प्रचंड कल्पनाशक्ती आहे, त्या कल्पनेला
प्रत्यक्षात आणण्यासाठी येणाऱ्या अडचणी आपल्याला सोडवायच्या आहेत. तरच महिला
उद्योग जगात आत्मविश्वासाने उतरण्याची हिंमत करतील. यासाठी माविम सदैव महिलांच्या
पाठीशी असल्याचे श्रीमती ठाकरे यांनी सांगितले.
सुनील खराटे यांनी माविमची महिला संघटन
करण्यात महत्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. महिलांमधील असलेल्या
उद्योजकतेच्या गुणाला मूर्तरूप
देण्याचे काम माविम करत आहे. महिला मेळाव्याच्या माध्यमातून महिलांना अधिक संधी
उपलब्ध करून देता येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी सन 2019-20 च्या वार्षिक प्रगती अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन श्रीमती
ठाकरे व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील सोसे
यांनी केले. समन्वय सभेला
उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती रोडगे, सहायक आयुक्त महिला व बालविकास अधिकारी मनपा नरेंद्र
वानखेडे, खादी ग्रामोद्योग मंडळाचे प्रदीप चेचरे, मत्स्य विभागाचे
प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सतीश पडघम,
उद्योजक विकास मंडळाचे प्रदीप इंगळे आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
००००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा