मंगळवार, ३१ मे, २०२२

25 मे ते 7 ऑगस्ट पर्यंत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण वेबिनारचे आयोजन

 

25 मे ते 7 ऑगस्ट पर्यंत

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण वेबिनारचे आयोजन

अमरावती, दि.31 (विमाका): महामत्स्य अभियान २०२२ च्या औचित्याने मत्स्यव्यवसाय विभाग आणि कृषि विज्ञान केंद्र, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्यहंगाम पुर्वतयारी विषयावर मत्स्यव्यवसायिकांचे प्रबोधन व चर्चासत्राचे वाशिम येथे दि. २६ मे रोजी आयोजन करण्यात आले होते.

प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय विजय शिखरे यांनी महामत्स्य अभियान दि.२५ मे ते ७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहीती दिली. यामध्ये प्रामुख्याने मत्स्यबिज उत्पादन वाढवून आपला जिल्हा आत्मनिर्भर करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या. मत्स्यहंगाम पुर्वतयारी, तलावटेका धोरणानुसार मत्स्यप्रजनक मत्स्यसाठा उपलब्ध करून देणे, काटेकोरपणे इष्टतम मत्स्यबोटुकली संचयन करणे, मत्स्योत्पादन वाढविणे व मत्स्योत्पादनाचे अहवाल नियमीत सादर करणे, मत्स्यव्यवसायातील प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करणे, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेणे, किसान क्रेडिट कार्ड, इत्यादी विविध विषयांवर श्री. शिखरे यांनी तपशिलवार मार्गदर्शन केले. महामत्स्य अभियानात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मच्छिमारांना आपले जिवनमान उंचविण्याचे आवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.

यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. काळे यांनी जलाशयातील पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन, Biofloc व RAS तंत्रज्ञानाची माहिती देऊन मत्स्यशेतीला बळकट करण्याकरीता संघटन करून मत्स्य मुल्यवर्धन, निर्यात वाढ, रोजगार निर्मिती तसेच सरासरी उत्पन्न वाढीसाठी पुढाकार घ्यावा असे सांगीतले. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अशुतोष जाधव यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने अंतर्गत विविध घटकांची माहिती दिली. नाबार्डचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक शंकर कोकडवार यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेची सविस्तर माहिती देऊन यासाठी अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन केले.

चर्चासत्रामध्ये मत्स्यव्यवसायिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन करण्यात आले. संपूर्ण वाशिम जिल्ह्यातून एकूण १४५ मच्छिमार संस्थांचे सभासद व कास्तकार यांनी महामम्स्य अभियानाअंतर्गत मत्स्यहंगाम पुर्वतयारी चर्चासत्रात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती अनिता जैन यांनी केले. स्नेहा प्रबत यांनी सर्वांचे आभार मानले.

०००००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा