शनिवार, २८ मे, २०२२

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मागास प्रवर्ग आरक्षण समर्पित आयोगाने जाणून घेतली संस्था, व्यक्तींची मते सुमारे चाळीस संस्था, संघटनांशी चर्चा

 

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मागास प्रवर्ग आरक्षण

समर्पित आयोगाने जाणून घेतली संस्था, व्यक्तींची मते

सुमारे चाळीस संस्था, संघटनांशी चर्चा

अमरावती, दि. 28 : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोगाने आज विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांची निवेदने स्वीकारली व त्यांचे मत जाणून घेतले. यावेळी 40 संस्था-संघटना, तसेच सुमारे दीडशे नागरिकांनी आयोगाची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले.

आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बांठिया, सदस्य नरेश गीते, डॉ. शैलेशकुमार दारोकार, एच. बी. पटेल व सदस्य सचिव पंकजकुमार आदींनी संस्था व नागरिकांकडून प्रत्यक्ष चर्चा करून निवेदने स्वीकारली.

अप्पर विभागीय आयुक्त नीलेश सागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पुरवठा उपायुक्त अजय लहाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले, आयोगाचे संशोधन अधिकारी डॉ. नितीन धाकतोडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांच्यासह विविध जिल्ह्यांचे निवासी उपजिल्हाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

            आयोगाकडून घेण्यात आलेल्या प्रत्यक्ष सुनावणीबाबत संस्था व व्यक्तींच्या नोंदणीसाठी विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम या पाचही जिल्हाधिकारी कार्यालयांत मदत कक्ष उघडण्यात आले होते. त्यानुसार 30 संस्थांकडून नोंदणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे, वेळेवर उपस्थित व्यक्ती व संस्थांकडूनही निवेदने स्वीकारण्यात आली. आयोगाने प्रत्येक निवेदनकर्त्याचे स्वागत करत त्यांचे म्हणणे सविस्तर जाणून घेतले, सुनावणीतील प्रत्येक बाबीची नोंद करण्यात आली.  विभागातील पाचही जिल्ह्यातील संस्था व व्यक्तींनी सुनावणीत सहभाग घेतला. यावेळी आयोगाने सर्व अधिका-यांची बैठक घेऊन त्यांच्याकडून विविध बाबींची माहिती घेतली.

अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय, सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, विविध नोडल अधिकारी यांनी सुनावणीच्या अनुषंगाने उत्तम पूर्वतयारी व समन्वयाने काम केले. त्यामुळे सुनावणीचे कामकाज चांगल्या पद्धतीने पार पडले, अशी प्रतिक्रिया आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांनी यावेळी व्यक्त केली.

अप्पर आयुक्त श्री. सागर, उपायुक्त श्री. लहाने यांनी स्वागत केले. सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे, नप प्रशासन अधिकारी गीता वंजारी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा