शुक्रवार, ३१ मे, २०१९

इयत्ता 12 वीच्या जुलै-ऑगस्ट मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखा जाहीर


इयत्ता 12 वीच्या जुलै-ऑगस्ट मध्ये होणाऱ्या
परीक्षेची आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखा जाहीर
·         www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळ उपलब्ध
·         आवेदनपत्रे स्वीकारण्याची अंतीम मुदत 19 जुलै

अमरावती, दि. 31 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नियमित, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. त्यासाठी सदर परीक्षेत प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in  किंवा www. mahahsscboard.in  या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षासाठी परीक्षा अर्ज नियमित शुल्क भरुन दि. 3 जुलै ते 14 जुलै पर्यंत स्वीकारण्यात यईल. विलंब शुल्क भरुन दि. 15 जुलै ते 19 जुलै पर्यंत स्वीकारण्यात येईल. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी दि. 20 जून ते 24 जून पर्यंत चलनाद्वारे बँकेस शुल्क भरणे आवश्यक आहे. तसेच शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या 26 जून पर्यंत मंडळाच्या कार्यालयात जमा करने अनिवार्य आहे.
सदर परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्याव्यात.           
ऑनलाईन आवेदनपत्र भरतांना फेब्रुवारी ते मार्च 2019 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै ते ऑगस्ट 2019 व फेब्रुवारी ते मार्च 2020 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी. नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाद्वारेच भरण्यात यावे. सर्व विभार्गीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रचलित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारंखामध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे राज्यमंडळ, पुणेचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रकटनाद्वारे कळविले आहे.
000000




राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
अमरावती, दि.31: राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी  राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी महसूल उप आयुक्त गजेंद्र बावणे, पुरवठा उप आयुक्त रमेश मावस्कर यांचेसह अन्य विभागाचे उप आयुक्त, वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

गुरुवार, ३० मे, २०१९

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू


जिल्‍ह्यात कलम 37 (1)  व (3) लागू

अमरावती, दि. 30  : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी, डॉ. नितिन व्यवहारे यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 30 मे ते 13 जून 2019 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर जिल्हा दंडाधिकारी  यांनी कळविले आहे.
000000

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदविका प्रवेशासाठी मार्गदर्शन केंद्र


शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदविका
     प्रवेशासाठी मार्गदर्शन केंद्र
अमरावती, दि. 30 :  शासकीय तंत्रनिकेतन अमरावती या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त तंत्रशिक्षण संस्थेत दि. 21 मे 2019 रोजी  2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिये अंतर्गत सुमदेशन व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन अमरावती विभागाचे तंत्रशिक्षण सहाय्यक संचालक डॉ. एम.ए.अली यांचे उपस्थितीत संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेन्द्र मोगरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेतील सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. या समुपदेशन व मार्गदर्शन केद्राचे समन्वयक म्हणून प्रा. हेंमत जोशी व प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया प्रभारी अधिकारी म्हणून प्रा.सी.एन.निकोसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासकीय तसेच खाजगी तंत्रनिकेतनांमार्फत विविध अभियांत्रिकी विद्या शाखामधील पदविका अभ्यासक्रम राबवण्यात येतात. या पदविका अभ्यासक्रमांचा उद्देश विविध क्षेत्रातील उद्योगांसाठी कुशल तंत्रज्ञ व मनुष्यबळाची निमिर्ती करणे व पर्यायाने तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे हा असतो. शासनाने मागिल काही वर्षापासून उद्योगांची कुशल तत्रज्ञ व मनुष्यबळाची मागणी पुर्ण करण्यासाठी अनेक खाजगी विनाअनुदानित तंत्रनिकेतनांना परवानगी दिली. शासकीय तंत्रनिकेतनांमधील तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दुष्टीने अनेक तंत्रनिकेताना शैक्षणिक स्वायत्तता प्रदान केली तसेच सर्व शासकीय तंत्रनिकेतनांमधील अधिव्याख्यता विभाग प्रमुख व प्राचार्य यांची रिक्त पदे भरण्यात आली. शासकीय तंत्रनिकेतनांमधील इमारती यंत्रसामुग्री व इतर  भौतिक सुविधांबाबतच्या त्रुटीचीही पुर्तता करण्यात आली आहे.
परंतू मागील काही वर्षापासून विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे कमी कल दिसून येतो. महाराष्ट्र शासन, तंत्रशिक्षण संचालनालय व इतर संबंधित प्राधिकरणांनी विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रवेश घेण्याकडे कमी कल असण्याचा व त्यामुळे तंत्रनिकेतनातील इमारती, यंत्रसामुग्री व इतर भौतिक सुविधा व उच्चविद्याविभुषित अध्यापक वर्ग यांच्या क्षमतांचा पुरेशा वापर होत नसल्याच्या कारणांचा आढावा घेतला असता विद्यार्थ्याचा अनावस्थेतमागे इतर अनेक कारणांसोबतच ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्याना विविध अभियांत्रिकी  पदविका अभ्यासक्रम पुर्ण केल्यांनतर उद्योग क्षेत्रात तसेच स्वयंउद्योगांसाठी उपलब्ध संधीबाबत योग्य समुपदेशन व मार्गदर्शनाचा अभाव हेही कारण प्रामुख्याने निदर्शनास आले.
त्यामुळे शासनाने 2019-20 या वर्षापासून शालेय शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परिक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिये बाबत विविध स्तरावर समुदेशन व मार्गदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअंतर्गत विविध शाळांमध्येसुध्दा प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल.
सदर योजनेअंतर्गतच शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे समुदेशन व मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राद्वारे विद्यार्थ्याना विविध अभियांत्रिकी पदविका अभ्यास पूर्ण केल्यांनतर उद्योग क्षेत्रात तसेच स्वयंउद्योगांसाठी उपलब्ध संधीबाबत तसेच प्रवेश प्रक्रियेबाबत अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांद्वारे योग्य समुदेशन व मार्गदर्शन करण्यात येईल तरी सर्व इच्छूक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच प्राचार्य डॉ. राजेन्द्र मोगरे यांनी केले आहे.
00000

गुरुवार, १६ मे, २०१९

22 मे रोजी शिकाऊ भरती मेळावा


22 मे रोजी शिकाऊ भरती मेळावा
अमरावती, दि.16:- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथील एन. एस. एस. हॉलमध्ये    दि. 22 मे 2019 रोजी सकाळी 11 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यांत आला आहे. सर्व आय. टी. आय. उत्तीर्ण (सर्व टेक्नीकल टेड व कोपा टेड) प्रशिक्षाणार्थ्यांनी आपल्या मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे संस्थेचे प्राचार्य यांनी कळविलेले आहे.

शनिवार, ११ मे, २०१९

मुख्यमंत्र्यांचा बुलडाणा जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद

वीजपुरवठ्याअभावी कोणत्याही गावाची पाणीपुरवठा योजना बंद नको

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

 
मुंबई, दि. 11 : राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजनांची विद्युत देयके राज्य शासनाने अदा केली आहेत. वीज पुरवठ्याअभावी कोणत्याही गावातील पाणीपुरवठा योजना बंद पडता कामा नये, याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.
 
 मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज 'ऑडीओ ब्रीज सिस्टम'द्वारे बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे 50सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली, तसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता.
 
 मुख्यमंत्री म्हणाले, बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रशासन आणि नागरिकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. तहसीलदारांनी गावातील 2018 ची लोकसंख्या आणि जनावरांची संख्या विचारात घेऊन अतिरिक्त टँकरची मागणी पडताळून पहावी व त्याप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा होईल याची दक्षता घ्यावी. दुष्काळी कामांना आचारसंहिता लागू नाही, निवडणूक आयोगाने दुष्काळी कामे करण्यास मान्यता दिली आहे, त्यामुळे आचारसंहितेचे कारण देऊन दुष्काळावरील उपाययोजनांची कामे प्रलंबित ठेऊ नयेत,असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
 
शेतकऱ्यांना अधिग्रहणाचे पैसे तत्काळ द्यावेत
बुलडाणा जिल्ह्यातील सरपंचांनी त्यांच्या भागातील विहिरी अधिग्रहित झालेल्या शेतकऱ्यांना अधिग्रहणाचे पैसे तत्काळ दिले जावेत असा मुद्दा मांडला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तत्काळ कार्यवाही करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. मोताळा तालुक्यातील एका सरपंचांनी त्यांच्या भागातील रखडलेली 14गावांची पाणीपुरवठा योजना पूर्ण करावी, अशी मागणी केली. त्याची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने यात लक्ष घालून योजना गतीने पूर्ण करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
 
जुन्या पाईपलाईन बदलून द्याव्यात
बुलडाणा तालुक्यातील एका सरपंचांनी त्यांच्या गावातील पाणीपुरवठा योजनेची पाईपलाइन जुनी झाल्याने ती बदलावी, अशी मागणी केली. याची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत आवश्यकतेनुसार कार्यवाही करण्याची सूचना केली. बुलडाणा तालुक्यातील एका सरपंचांनी त्यांच्या गावात मार्चपासूनच पाणीटंचाई असते, त्यामुळे येळगाव धरणातून पाणी मिळावे,अशी मागणी केली. गावाला सध्या टँकरने पाणी सुरू करण्याच्या तसेच येळगाव धरणातून पाणीपुरवठा करण्याच्या मुद्याचा धोरणात्मक निर्णयात सकारात्मक विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
 
देऊळगाव राजा तालुक्यातील एका सरपंचांने 4 किमी पाईपलाईनची दुरुस्ती करुन मिळावी, अशी मागणी केली. याचीही दखल घेत विशेष दुरुस्तीमधून हे काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. शेगांव तालुक्यातील एका सरपंचांनी त्यांच्या गावात आजपर्यंत एकही पाणीपुरवठा योजना झाली नसल्याचा मुद्दा मांडला. त्याची दखल घेत या गावासाठी योजना देण्याच्या सूचना एमजेपी तसेच जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केल्या.
 
यावेळी मुख्य सचिव यू.पी.एस. मदान, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी,पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार,जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर उपस्थित होते.
 
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी केलेल्या उपाययोजना
• जिल्ह्यातील 13 पैकी 12 तालुक्यांमध्ये टँकर सुरू. यामध्ये खामगाव 29, देऊळगावराजा 28, बुलडाणा24, शेगाव 22, सिंदखेडराजा 20, नांदुरा 19, मोताळा 18, चिखली 15,मेहकर 14, लोणार 11,मलकापूर 5 तर संग्रामपूर 1. एकूण टँकर संख्या 206.
 
• पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ जिल्ह्यात 174 विंधन विहिरी, 29 नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, दोन तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित. जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 673 विहिरींचे अधिग्रहण.
 
• पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची 2.76 कोटी रुपये इतकी विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आली आहे. सर्व नळ पाणीपुरवठा योजनांचा विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
 
• बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या आठ तालुक्यातील 834 गावांतील 2 लाख 81 हजार931 शेतकऱ्यांना रुपये 160.52 कोटी इतकी रक्कम वाटप करण्यात आली.
 
• बुलडाणा जिल्ह्यातील एकूण चार लाख 46 हजार 295 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाईपोटी 52.35 कोटी रुपये अदा करण्यात येणार असून त्यापैकी31.75 कोटी रुपये रक्कम 38 हजार 177 शेतकऱ्यांना अदा करण्यात आली.
 
• प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील 2.18 लाख शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 76 हजार शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण 15.20कोटी रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू.
 
• महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात 1 हजार 066 कामे सुरू असून त्यावर 6 हजार 765 मजूर उपस्थिती आहे. जिल्ह्यात 11 हजार 781 कामे शेल्फवर आहेत.

00000

बुधवार, ८ मे, २०१९

दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ‘कौशल्य सेतू’ चा लाभ घ्यावा


दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी
‘कौशल्य सेतू’ चा लाभ घ्यावा

अमरावती, दि. 8 : ‘कौशल्य सेतू’ मधील व्यवसाय विषयाचा अभ्यासक्रम  पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या माध्यमिक शाळांच्या पात्र विद्यार्थ्यांनी मार्च 2019 च्या इ. 10 वी प्रमाणपत्र परीक्षेकरिता ट्रान्सफर ऑफ क्रेडिटसचा लाभ देणेसाठी आवश्यक कार्यवाही करावी.
इ. 10 वी प्रमाणपत्र परीक्षेकरिता ट्रान्सफर ऑफ क्रेडिटसचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी इ. 10 वी च्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या माध्यमिक शाळेमार्फत विहित केलेल्या नमून्यात अर्ज करुन नोंदणी करावी. विहित नमूना मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या लाभार्थी विद्यार्थ्यांनी  दिनांक 6 मे 2019 ते 15 मे, 2019 या कालावधीत अर्ज सादर करावा. या अर्जासोबत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) सर्व परीक्षाचे गुणपत्रक व पी. एम. के. व्ही. वाय (कौशल्य सेतू अभियान) प्रमाणपत्र इ. च्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. हा अर्ज विभागीय मंडळात जमा करताना त्यासोबत प्रक्रिया शुल्क रु. 40 व गुणपत्रिका शुल्क रु. 10 असे एकूण रु. 50 शुल्क राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (डी. डी.)/रोखीने विभागीय मंडळात जमा करावेत.
या प्रमाणे शाळांनी हे अर्ज दि. 6  ते 16 मे 2019 या कालावधीत संबंधित विभागीय मंडळात जमा करावेत. ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस घेऊन विद्यार्थी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. 10 वी) उत्तीर्ण झाल्यास पुन्हा मंडळाच्या परीक्षेला नियमित अथवा पुनर्परीक्षार्थी म्हणून प्रविष्ठ होऊ शकणार नाही.
शैक्षणिक वर्ष 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांनी शासन निर्णयातील तरतूदींचा लाभ घेण्यासाठी विहित कार्यपध्दतीनुसार अर्ज करावेत असे, डॉ. अशोक भोसले, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी कळविले आहे.

****

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा


नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

अमरावती, दि. 8 : अमरावती शहरातील अमरावती चांदूररेल्वे रा.मा.297 चे कॉक्रीट रोड बांधकाम रेल्वे स्टेशन ते अंधविद्यालयापर्यत टप्प्याटप्प्यामध्ये करण्यात येत आहे. सद्यस्थितीत सुंदरलाल  चौकामध्ये अर्ध्या भागात काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे कोर्टाकडून कॉग्रेस नगर कडे जाणारा रस्ता बंद राहणार आहे. तसेच पेट्रोल पंप चौकाकडून चपराशीपुऱ्याकडे जाणारी वाहतुक ह्या चौकापुरती एका पदरातून सुरु राहणार आहे. तसेच सागर आपार्टमेंट ते चपराशीपुरा चौकापर्यत उजव्या बाजुचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे मिनी बायपास वरुन बडनेरा कडे जाणारी वाहतूक व सुंदरलाल चौक ते वडाळीकडे जाणारी वाहतूक दोन पदरातून सुरु राहील हे रस्ते वाहतूकीकरिता 6 मे 2019 ते 31 मे 2019 पर्यत बंद राहील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती, यांनी कळविले आहे.
****

शनिवार, ४ मे, २०१९

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा


वृत्त क्र.90                                                                                                         दिनांक : 4 मे, 2019

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

अमरावती, दि. 5 : अमरावती शहरातील गांधी चौक ते ईस्माईल कटपीस पर्यत रस्त्याचे कॉक्रींट बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहे. या लांबीमधील जवाहर गेट ते ईस्माईल कटपीस पर्यत कॉक्रीट रस्ता बांधकाम हाती घेण्यात येत आहे. तरी या रस्त्यावरील वाहतुक हा 5 मे 2019 ते 31 मे 2019 पर्यत बंद राहील. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनी कळविले आहे.
****