कोरोना
वार्डातील सेवेचे आव्हान पेलताना कुटुंबियांची
साथ
मोलाची परिचारिकांनी व्यक्त केलेले मनोगत
अमरावती, दि. 5 : घरातील सर्वांच्या पाठिंब्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांच्या
वॉर्डात आम्हाला आमचे कर्तव्य बजावता आले, अशी भावना येथील शासकीय रुग्णालयातील
परिचारकांनी व्यक्त केली.
कोरोनाबाधित व्यक्तींवर उपचारात डॉक्टरांप्रमाणेच वैद्यकीय सेवेतील
अन्य सर्व घटकांचा सहभाग मोलाचा राहिला आहे. हा सहभाग लक्षात घेत निवडक परिचारिकांशी
संवाद साधला असता सर्वांनी कौटुंबिक पाठिंब्याचा आवर्जून तसेच मनःपूर्वक उल्लेख
केला.
आपल्याला काही दिवस कोरोना वॉर्डात सेवा करावी लागणार आहे, हे कळाल्यानंतर
आपण अस्वस्थ झालो होतो, हे नाकबूल करता येत नाही. पण आपल्या सेवेतील ही अपरिहार्य
बाब आहे, हे लक्षात घेऊन आम्ही प्रशिक्षणात सहभागी झालो. दोन दिवसाच्या
प्रशिक्षणात सर्वात महत्वाचा भाग होता, तो संरक्षक कवच म्हणून ओळखला जाणारा ‘ड्रेस’
व्यवस्थित घालण्याचा, असे त्यांनी सांगितले. हा ड्रेस घातल्या नंतरच वॉर्डामध्ये
प्रवेश करता येतो आणि त्या दिवसाचा सेवा कालावधी संपल्यानंतरच तो काढता येतो.
दरम्यान बंधने पाळावीच लागतात.
कोरोनाची बाधा झालेल्या बहुतेक रुग्णाचा आजार गंभीर अथवा अति गंभीर
नसतो. त्यांना स्वच्छता पाळण्यास सांगणे, वेळोवेळी हात धुण्यास बजावणे, या बाबी
सांगतानाच त्यांचे मनोधैर्य कायम राहील आणि वाढीस लागेल अशा पद्धतीने त्यांच्याशी
बोलणे, या बाबी महत्त्वाच्या असतात, असे त्यांनी सांगितले. प्रकृतीबाबतच्या
दैनंदिन नोंदी, डॉक्टरांच्या सुचनेनुसार गोळ्या वेळेवर देणे, हा नेहमीचा भाग होता.
कौटुंबिक तसेच इतरांच्या सहकार्याचे उदाहरण देताना एका परिचारिकेने
सांगितले की, त्यांच्या किशोरवयीन अपत्याची जबाबदारी एका मैत्रिणीने उत्स्फूर्तपणे
स्विकारली. त्यांच्या खाण्यापिण्याच्या गरजा त्यांच्याशी कायम संवाद साधत, त्या
मैत्रिणीने त्याला जणू कुटुंबात सामावून घेतले. एका परिचारिकेच्या कुटुंबातील
आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी विवाहित कन्या पुढे आली. एका परिचारिकेच्या पतीने ‘चांगलं
काम करण्याची संधी तुला मिळाली आहे, मला ही संधी मिळू शकत नाही.’ असे समजावून सांगत
स्वतःची नोकरी सांभाळत घरही सांभाळले.
‘वॉर्डात ठराविक दिवस ड्युटी झाल्यानंतर या परिचारिकांना विलगीकरणात
राहावे लागते. विलगीकरणाचा ठराविक कालावधी पूर्ण झाल्यानंतरच कुटुंबात परतता येते.
वॉर्डात सेवा बजावल्यानंतर स्वतंत्र निवास व्यवस्थेत परत गेल्यावर आधी स्नान करणे
अत्यावश्यक आणि बंधनकारक असते. त्यानंतर पाणी पिऊन घरी व्हिडिओ कॉल केला आणि कुटुंबियांशी
संवाद साधला, म्हणजे जो दिलासा मिळत असे, तो शब्दात सांगणे कठीण’ अशी भावना
त्यांनी व्यक्त केली. फोनवर असा संवाद साधता येत असल्यामुळे या तंत्रज्ञानाचे
महत्त्व आणि त्याचा दैनंदिन उपयोग अनुभवता आला, असेही त्यांनी सांगितले.
या परिचारिकांच्या गाठी सेवेचा अनुभव आहे. किंबहुना त्यांच्या
आधारे त्यांची कोरोना वॉर्डातील कर्तव्यासाठी निवड झाली. सगळ्या कनिष्ठ
मध्यमवर्गातील अथवा मध्यम वर्गातील आहेत. तिशी-पस्तिशीच्या उंबरठ्यावरील या महिला कौटुंबिक
जबाबदारी पार पाडण्यात समर्थपणे आणि बरोबरीने सहभागी होत आहेत. त्यांच्यासमोर कोरोना
वॉर्डात काम करण्याचे आव्हान उभे राहिले तेव्हा ते त्यांनी खंबीरपणे पेलले. ते
पेलतांना त्यांच्या कुटुंबांनी बहुमोल आधार दिला.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा