सोमवार, ११ मे, २०२०

‘पोस्ट बँके’ तून आठ कोटींची रक्कम लॉकडाऊनमध्ये घरपोच




‘पोस्ट बँके’ तून आठ कोटींची रक्कम लॉकडाऊनमध्ये घरपोच
Ø  पोस्टाचे 4.6, बँकांचे 3.6 कोटी वितरीत
Ø  51 हजाराहून अधिक बँकींग व्यवहाराची नोंद

अमरावती, दि. 11 : पोस्टाची ओळख ही आतापर्यंत फक्त पत्र आणि मनी ऑर्डर इथपर्यंत मर्यादीत होती. परंतू काळाच्या ओघात पत्रांसोबतच डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पमेंट बँकेने नव्या क्षेत्रावर आपली मोहोर उमटविली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या निर्बंधामुळे गरजू नागरिकांना बँकेपर्यंत पोहोचता येत नव्हते. अशावेळी या पोस्ट बँकेने लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना बँकेच्या सेवेचा आधार दिला. आतापर्यंत पोस्ट बँकेने सुमारे आठ कोटी रूपये एवढी रक्कम खातेदारांच्या हाती दिली आहे.
लॉकडाऊनचा काळ हा प्रत्येक नागरिकाचा कसोटीचा काळ आहे. बँकांच्या मर्यादीत वेळा, एटीएममधील विशिष्ट रक्कम, दळणवळणाच्या साधनांची कमतरता, दुर्गम भागातील नागरिकांना बँकेपर्यंत पोहोचण्यासाठी होणारा त्रास, वाढता उन्हाळा अशा अनेक समस्या या काळात आल्या. नागरिकांना आवश्यक वस्तू खरेदीसाठी रोख रक्कम आवश्यक असते. त्यावर उपाय म्हणून पोस्ट बँकेने पोस्टाच्या कार्यालयातून नागरिकांना त्यांच्या आधार क्रमांक संलग्न बँक खात्यातून थेट रक्कम देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
अमरावती जिल्ह्यात 454 पोस्ट कार्यालये आहेत. या पोस्टामधील सुमारे आठशे पोस्टमन ही आधार संलग्नित पेमेंट व्यवस्था देत आहेत. ही सेवा जिल्ह्यातील शहरासह मेळघाटमधील डोमा, चुरणी या दूर्गम भागात देत आहे. या सेवेबाबत संबंधित तहसिलदारांनी गावात बैठक घेऊन माहिती दिली. त्यामुळे तसेच पोस्टाची विश्वासार्हता आणि गावातीलच पोस्टमन बँकेतील रक्कम देणार असल्याने या सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. याचा परिणाम म्हणून 23 हजार व्यवहारातून पोस्ट बँकेने 4.6 कोटी, तर 21 हजार 321 व्यवहारातून इतर बँकेचे 3.6 कोटी बँक खातेदारांना रोख रक्कम वितरीत करण्यात आले आहेत.
आधार संलग्नीत खात्यातून पोस्टाच्या या सेवेमधून रक्कम काढण्यासाठी खातेदारांना पोस्टात जाऊन फक्त आपला आधार क्रमांक सांगावा लागतो. एका खात्यापेक्षा अधिक खात्यांना आधार संलग्न असल्यास त्याला बँकेचे नाव सांगावे लागते. बोटांचे ठसे प्रमाणीकरण झाल्यानंतर त्या बँक खात्यातून संबंधित व्यक्तीला ही रक्कम पोस्टातच मिळते आहे. दूर्गम भागात बँका नसल्यातरी पोस्टाचे जाळे आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ही पोस्ट कार्यालय उपयोगाला आली आहेत. नागरिकांना गावातच रक्कम मिळू लागल्याने बँकांतील गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे.
शहरी तसेच ग्रामीण भागात पोस्टाचे जाळे आहे. मुख्य पोस्ट कार्यालय ते गावातील पोस्ट कार्यालय अशी साखळी आहे. बँकांच्या अडचणीमुळे पोस्टाने नागरिकांना त्यांच्या गावातच ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोस्टातर्फे गावागावात जाऊन या व्यवस्थेची माहिती देण्यात येत आहे. नागरिकांचा कलही आता पोस्टामधून रक्कम काढण्याकडे वाढत असल्याचे अमरावती येथील इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे शाखा व्यवस्थापक चंद्रकांत झेंडे यांनी सांगितले.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा