लेख
युगस्त्री सावित्रीबाई
फुले
व्यक्तित्व आणि
कर्तृत्व
सावित्रीबाईंची थोरवी त्यांच्या
कर्तृत्वातून दिसतेच, पण त्यांच्या व्यक्तित्वाचा अभ्यास केला तर लक्षात येते की, स्त्रियांच्या
मूलभूत प्रश्नांना हात घालणाऱ्या सावित्रीबाईंमध्ये आत्मविश्वास ठासून भरला होता.
‘स्त्री-पुरुष समानता’ या शब्दांशी दूरदूरपर्यंत आपला संबंध नव्हता. अगदी आजच्या स्त्रियांनादेखील
अशी कोणती समानता असते अशी पुसटशी कल्पनाही आतापर्यंत नव्हती. नरक यातना भोगणारा स्त्री
जन्म सर्व प्रकारच्या ज्ञानापासून अनभिज्ञ होता. उच्चवर्णीय जातीतील काहींनी स्त्रियांचे
जगणे महाकठीण केले होते. त्यावेळी असंख्य समस्यांनी स्त्रिया वेढल्या होत्या. त्यांच्या
समस्यांचा आणि स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचा अंत नव्हता. या परिस्थितीच्या विरुध्द
आवाज उठवावा एवढी शक्तीही स्त्रियांमध्ये नव्हती व संघर्षाची समजही त्यांच्या ठायी
नव्हती. ‘नशिबाचे भोग’ म्हणून स्त्रिया आपले आयुष्य कंठत असे. तत्कालीन परिस्थीतत आवाज
उठविण्याचे धारिष्ट्य कुणातच नव्हते. अशात प्रथमच ह्या उच्चवर्णिय जातींच्या वर्तनाविरुध्द
आवाज उठविल्या गेला.
सावित्री ते सावित्रीबाई हा प्रवास अभ्यासला तर आपल्या
लक्षात येईल की, बालपणापासूनच किती परिपक्वता या विशाल व्यक्तिमत्त्वात होती. सातारा
जिल्ह्यातील, खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 रोजी इवल्याश्या सावित्रीचा
जन्म झाला. सावित्रीच्या आईचे नाव लक्ष्मीबाई
आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. सावित्रीबाईंचे वडील गावचे पाटील होते. रुढी,
परंपरा आणि असंख्य सामाजिक चालीरितींना ग्रासलेल्या समाजात स्त्रीशिक्षण, स्त्री-पुरुष
समानता, स्त्रियांचे स्वातंत्र्य, स्त्रियांचे स्वावलंबन याचा गंधही नव्हता. सावित्रीबाईंचा
जन्मच जणू स्त्री जीवनाला दिशा देण्यासाठी झाला. छोट्या सावित्रीबाईंचे आयुष्य या देशासाठी आधुनिक जगण्याचा, बनण्याचा महामंत्र देणारे
ठरले. लोकप्रिय खंडोजीच्या पोटी जन्मास आलेल्या या सुंदर, सशक्त बालिकेच्या जन्माने
पाटलाचे घरंच नव्हे तर सारे गाव आनंदले. कष्टाळू आणि गरिबांचा कनवाळू अशा खंडोजीच्या
घरचे संस्कार हुशार सावित्रीने लहान वयातच उचलले. सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्वात शारिरीक
सौंदर्यापेक्षा गुणात्मक सौंदर्याला अधिक महत्व आहे. बाह्य सौदंर्य खरे नसून विविध
गुणांमुळे आलेले आंतरिक सौंदर्यच खरे असते. असे आंतरबाह्य सौदंर्य अत्यंत कमी व्यक्तींच्या
वाट्याला आलेले असते. अशा थोड्या व्यक्तींमध्ये
सावित्रीबाई फुले यांचा समावेश होतो.
सावित्रीबाईंना दृश्य व बाह्य सौंदर्य
त्यांच्या आई लक्ष्मीबाई यांच्यापासून तर काटक शरीरयष्टी आपल्या पित्याकडून प्राप्त
झाली. नेवसे पाटलांचे घराणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून नावाजलेले आणि प्रसिध्द
होते. पेशवाईच्या काळात तर इमानदारीच या घराण्याकडे होती. खंडोजी नेवसे पाटील वृत्तीने
भाविक व कष्टाळू शेतकरी होते. ते गोरगरिबांना अडीअडचणीत आर्थिक मदत करीत असत. उदार
अंतकरणाच्या व धार्मिक प्रवृत्तीच्या खंडोजीला लक्ष्मीबाई पत्नी म्ळणून सौभाग्यानेच
मिळाल्या. त्या उदार अंतकरणाच्या, सह्दय, दुसऱ्याच्या सुखदु:खात सहभागी होणाऱ्या, देवधर्माची,
आवड असणाऱ्या स्त्री होत्या. सावित्रीबाईं ही खंडोजी व लक्ष्मीबाई यांची एकुलती एक
कन्या. आपल्या या सुखरुप कन्येचा त्यांना मोठा अभिमान वाटे व तिचे लाड पुरविण्यात त्यांना
आनंद वाटत असे. सावित्रीशिवाय या दांम्पत्याला सिद्जी,सखाराम व श्रीपती ही तीन अपत्ये
होती. सिद्जी सावित्रीबाईंपेक्षा दोन वर्षांनी मोठे तर सखाराम व श्रीपती हे भावंडे
सावित्रीबाईपेक्षा वयाने लहान होती. लहानगी सावित्री कधी कधी पित्याबरोबर शेतातही जात
असे. निर्सगाच्या सानिध्यात तिचे मन रमत असे. निसर्गाच्या सौंदर्याची व शेतकऱ्यांच्या
कष्टाळू जीवनाची सावित्रीबाईंना जाणीव होती. हे जीवन सावित्रीबाईंनी आपल्या काव्यातून
नंतर शब्दबदध् केलेले दिसते. अगदी लहान वयात देखील सावित्रीबाईंना आईला स्वयंपाकात
मदत करणे आवडत असे. विवाहानंतर सावित्री गृहिणी
बनून स्वयंपाक करण्यात व पाहुण्यांचे आगतस्वागत
करण्यात धन्यता मानत असे. याचे रहस्य तिच्या
बालपणाच्या वातावरणात आहे. बालपणी समवयस्कांची खेळातील भांडणे, प्रौढत्वाच्या भूमिकेतून
सोडविणे सावित्रीबाईंना आवडत असे. पुढारीपणची बीजे अशी बालपणीच तिच्या ठिकाणी रुजली
होती. कधी पित्याबरोबर शेतात जाणे, जनावरांची देखभाल करणे यासारखे सर्व कामे त्या करीत
असे. मी हे करणारच असा तिचा नेहमीच हट्ट असे. स्वस्थ बसणे सावित्रीला माहीत नव्हते.
भय किंवा भीती याचा तिला लवलेशही नव्हता रणरागिणी महाराणी ताराबाई किंवा झाशीची राणी
लक्ष्मीबाई यांच्या ठिकाणी असलेले धैय, शौर्य लहान्या सावित्रीच्या अंगी दिसून येत.
सावित्रीच्या बालपणातील गोष्ट. नायगावच्या जवळच शिरवळ हे बाजाराचे ठिकाण,
येथे सावित्रीलाही जाण्याची इच्छा झाली. आईच्या परवानगीने ती बाजारात गेली. एक आण्याची
जिलेबी व एक पैशाची भजी पुड्यात घेऊन खात खात गावाकडे निघाली, वाटेतच तिने येशू खी्रस्ताचे
स्तवन ऐकले. “गर्दीच्या घोळक्यातून एक गोरा साहेब सावित्रीजवळ आले व
म्हणाले,“बाळ शहाणी माणसे खाण्याचे पदार्थ घरी खात असतात” त्याबरोबर सावित्रीला आपली चुक
उमगली गोऱ्या साहेबांनी बिस्कीट व एक पुस्तक तिला दिले. खी्रस्ती साहेबाच्या स्पर्शाने
सावित्री बाटल्याची चर्चा पसरत होती. पण तिने त्याकडे लक्ष दिले नाही. पुढे विवाहानंतर
तीने हा प्रसंग जोतिबांना कथन केला. त्यांनी तिला ते पुस्तक वाचण्यास परवानगी दिल्यावर
सावित्रीबाईंच्या इच्छेला पारावार राहिला नाही. प्रदीर्घ काळानंतर आपली पुस्तके वाचण्याची
इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद सावित्रीस झाला. केवढी ही जिज्ञासा व स्वयंप्रेरणा या प्रसंगावरुन
सावित्रीचे बालपण व सावित्रीबाईंच्या विचारांची जडण घडण कशी झाली असावी याची कल्पना
येते.
सावित्रीबाईंचा काळ हा 150 वर्षापूर्वीचा काळ तत्कालीन स्थितीत सर्वत्र
अज्ञान, अनाचार, विषमता व रुढी परंपरांचे साम्राज्य होते. पुरुषप्रधान समाज व्यवस्था
अस्तिवात होती. स्त्री आश्रित होती व परावलंबी जीवन जगत होती. स्त्री जन्म म्हणजे गुलामगिरी
होती. पाळण्याला बाशिंग बांधून लहान बालिकांचे विवाह लावून देण्यात येत असे. स्त्रियांनी
शिक्षण घेणेच धर्मबाहय होते. ते मोठे पाप समजले जाई. या परिस्थितीत वयाच्या 9 व्या
वर्षी सावित्रीबाईंचा विवाह जोतिरावांसोबत करुन देण्यात आला. त्या कोवळ्या वयात शिक्षण
म्हणजे काय हे माहित नसायचे तर विवाह किंवा पती म्हणजे काय तेही कळत नसते. या सर्व विवेचनातून असे दिसते, की एक
कोवळया कळीचे फुलात रुपांतर होण्याआधीच तिला संसाराच्या गाड्याला बांधून देण्यात आले.
शिक्षणाचा मागमूसही सावित्रीला नव्हता. इ.स. 1840 मध्ये सावित्रीबाई जोतीरावांशी विवाहबदध्
झाल्या. विवाहाच्या वेळी सावित्रीबाई निरक्षर होत्या. जोतिबांनी शिक्षणाचे महत्तव जाणले
होते. त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाईंना शिकवायचे ठरविले. असंख्य घाव,यातना
सहन करून त्यांच्या परिसस्पर्शातून सामाजिक सुधारणांचे चित्र तयार होऊ लागले.
शंभर-दिडशे वर्षापूर्वीच्या काळात, त्या काळाच्या पुढच्या शंभर दीडशे
वर्षांनंतरचा विचार करणाऱ्या सावित्रीबाई घडत होत्या. जे समाजात आजही घडत नाही, जे
बोलतांना जिवाचा घडा करुन बोलावे लागते, ते सारे सावित्रीबाई बोलून आणि करुनही गेल्या!
स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळीमुळे कुटुंब संस्था नष्ट होते आहे, कोसळते आहे असा कांगावा
करणाऱ्यांपुढेही जोतिबा-सावित्रीबाईंचे सहजीवन, नैतिक जबाबदारीने स्वीकारलेले व निभावलेले
व्यक्तिगत आणि सामाजिक पालकत्व सर्वच असामान्य होय. त्या काळाचा विचार केला तरी सामाजिक
सुधारणाचा शंख फुकण्यासाठीचे प्राण व आत्मविश्वासासाठी जोडीदाराने प्रेरणा देणे ही
असामान्यच बाब म्हटली पाहिजे. पण सावित्रीबाई व जोतीरावांचे मीलन ही अद्भूत किमयाच
म्हटली पाहिजे. डॉ. ना.गो. माळी लिहितात, त्याकाळात
मुलींचे लग्न सहा वर्षे होण्यापूर्वी झाले पाहिजे असे मानले जाई. मुलींचे ओझे जाणवू
लागे. त्या वेळेच्या परिस्थितीस अनुसरुन सावित्रीबाईचे लग्राचे वय होऊन गेले होते.
अशातच जोतिबा फुले यांची मावस बहीण सगुणाबाईंनी सावित्रीबाईस पाहण्याचे ठरविले. डॉ.
मा. गो. वैद्य क्रांतिज्योती सा. फुले या पुस्तकात लिहितात की, सध्याप्रमाणे नवऱ्या
मुलाने मुलगी पाहणे आणि मुलीने मुलगा पाहणे असे पूर्वी नव्हते. वडिलधाऱ्या माणसांनी
मुलगा-मुलगी पाहून निर्णय घ्यावयाचा आणि तो संबंध उभयतांनी मान्य करावा अशी प्रथा होती.
मानपानाच्या सर्व गोष्टी झाल्यावर ठरल्याप्रमाणे सावित्रीचे जोतिबांसोबत फाल्गुन वैद्य
शके 1762 म्हणजेच इ.स. 1840 रोजी नायगाव येथे मोठ्या थाटामाटात लग्न झाले. त्यावेळी
जोतिबा फुले यांचे वय होते तेरा वर्षे आणि सावित्रीबाईचे वय नऊ वर्षे एवढे होते. सुखरुप,
गुणी आणि कर्तृत्ववान जोतिबा आणि सावित्री विवाह बंधनात अडकले. त्यांना स्वत:च्या संसारासोबत
गोरगरीब, स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांच्या जीवनात सुख व आनंद आणायचे होते. हा विवाह
म्हणजे सामाजिक रिवाज तर होताच पण त्यामुळे दोन अद्भूत शक्तीचे मिलन झाले होते. दोन
व्यक्तींपेक्षा जणू दोन शक्ती एकत्र आल्या होत्या व फुले दांम्पतीच्या युगप्रवर्तक
असामान्य कार्याचा शुभारंभ झाला होता. एकोणिसाव्या शतकातील जोतीराव फुले व सावित्रीबाई
फुले हे फुले वैवाहिक जीवनाचा आदर्श होय. त्यांचे आदर्श जीवन त्यांच्या काळातही अपवादात्मक
होते. फुलेंच्या वैवाहिक जीवनाचा प्रवास 50 वर्षाच्या कालावधीत आहे. पुण्याच्या परिसरातच
त्यांनी शेती विकत घेऊन फुलांच्या दुकानात प्रथम नोकरी केली. सावित्रीबाई व जोतीराव
यांना विवाह बंधनात बांधून फुले घराणे व नेवासे पाटील घराणे एकत्र आणण्याचे श्रेय सगुणाबाई
क्षीरसागर यांनाच आहे. सगुणाबाई ह्या धनकवडे येथील पाटलांची मुलगी. विवाहसमयी सावित्रीबाईंचे
वय लक्षात घेता हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम तिच्या सासरीच घडून आले हे निर्विवाद सत्य
होय.
स्त्री शिक्षणाचा भारतातील पहिला प्रयोग आपल्या शेतीवरील आंब्याच्या
झाडाखाली महात्मा फुल्यांनी केला. सावित्रीबाई आणि सगुणाबाई क्षीरसागर हया शाळेच्या
प्रयोगशाळेतील त्यांच्या पहिल्या विद्यार्थीनी होत्या. शेतातील माती हीच त्यांची पाटी
होती. शेतातील मातीचा पाटीप्रमाणे उपयोग करून झाडाच्या फांदीने काडीने अक्षरे गिरविण्यास
आरंभ झाला.शेतातील वनस्पती, फुलझाडे अशी अनेक प्रकारची नावे लिहीण्यापासून दैनंदिन
जीवनातील प्रसंगावर वाक्यरचना करण्यास सुरुवात झाली. सकाळपासून जेवणाच्या वेळेपर्यंत
शेतातील कामे करावे आणि जेवणानंतर विश्रांतीच्या वेळी जोतिबांनी या दोघींना ओळखीच्या
वस्तू, प्रसंग यांच्या आधारे शब्दांची, वाक्यरचनेची ओळख करुन देऊन भाषा, गणित व सामान्य
ज्ञान याचे धडे द्यावेत असा रोजचा दिनक्रम सुरु असे. सावित्री आणि सगुणाबाई ह्या हुशार
व जिज्ञासू होत्या. एकामागोमाग एक धडे त्यांनी चांगल्याप्रकारे अवगत केले. उच्च ज्ञानलालसेचा
अनुभव जोतिबांना त्यांना शिकविण्यात रमवून ठेवत असे.
जोतीराव फुले जितके आदर्श पती होते, तितकीच सावित्री आदर्श पत्नी होती.
तीची पतीनिष्ठा ही डोळस व वाखाणण्याजोगी होती. विवाहानंतर लवकरच सावित्रीबाई जोतीरावांच्या
विचारांशी व कार्याशी समरस झाल्या. जोतीराव केवळ प्रेमळ पतीच नाही, तर उत्कृष्ट शिक्षक
आहेत याची प्रचीती सावित्रीबाईना लवकरच आली. सावित्रीबाईंच्या अंत:करणात पतीविषयी अत्यंत
आदराची भावना होती. आपले पती स्त्री, व अतिशूद्र यांच्यासाठी अत्यंत त्रास सहन करुन
महत्वाचे कार्य करीत आहे यावर त्यांचा दृढ विश्वास होता. म्हणूनच पतीच्या विरोधकांचा
ती खरपूस समाचार घ्यायची. जोतीरावांना लिहिलेल्या पत्रात सावित्रीबाई लिहितात, “तुमच्या
ध्यानात येईल की, पुण्यात आपल्याविषयी दुष्टावा माजविणारे विदूषक पुष्कळ आहेत. तसेच
येथेही आहेत. त्यांना भिऊन आपण हाती घेतलेले कार्य का सोडून द्यावे? सदासर्वदा कामात
गुंतावे, भविष्यातले यश आपलेच आहे”.
यावरुन सावित्रीबाईंनी जोतिरावांच्या कार्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून
दिले आहे असे लक्षात येते व पतीच्या या कार्यात त्यादेखील तन-मन-धनाने सहभागी असून
प्रसंगी जोतीरावांची हिंम्मतही त्यांनी वाढविली आहे. स्त्री-शूद्रांच्या शिक्षणासाठी
सुरुवात 1848 साली बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात महत्प्रयत्नाने झाली. मुलींची
ही पहिलीच सुरु झालेली शाळा. वर्ष संपत नाही तो फुले दाम्पत्यावर गृहत्यागाचा प्रसंग
आला. धर्म-मार्तंडांच्या दृष्टीने स्वत:च्या पत्नीला शिकविणे व त्या दोघांनी शूद्र-अतिशूदांना
शिकवणे म्हणजे धर्माच्या विरोधात जाणे होय. धर्म बुडाला, धर्म बुडला अशी हाकाटी भरुन
गोविंदरावांना दम देणे सुरु झाले. गोविंदरावांनी जोतिरावांना घराबाहेरचा रस्ता दाखविला.
जोतिरावांसोबत सावित्रीही घराबाहेर पडल्या.
समाजाची
वैचारिक पातळी खऱ्या अर्थाने खालावली होती. अश्या परिस्थितीत सावित्रीबाई ज्या रणांगणात
युध्दासाठी उतरल्या ते निश्चितच सोपे व सहज नव्हते. सावित्रीबाईंनीही जोतीरावांच्या
बरोबरीने समाजसेवेचा वसा घेतला. जोतिबांच्या मदतीने मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ
त्यांनी रोवली. या सर्व सुधारणांच्या कार्यात त्यांना कुटुंबाची फारशी साथ नव्हती.
स्त्री शिक्षणासाठी प्रसंगी असंख्य अडचणींना तोंड देणाऱ्या सावित्रीबाई आपणास माहिती
आहे. परंतु त्या काळात स्त्री शिक्षणाला चालना देणारे सावित्रीबाईंचे कार्य हे महापापात
गणल्या गेले होते. कर्मठांनी याला आळा घालण्याचे सर्व हीन स्तरावरचे प्रयत्न केले.
जोतीरावांचे वडील गोविंदराव यांचे कान भरुन सावित्रीबाईंना त्यांच्या पवित्र कार्यापासून
परावृत्त करण्याचा प्रयत्न केला गेला. कुळाची अब्रू जाईल, सून बिघडेल, धर्माला काळिमा
लागेल आणि 42 पिढया नरकात जातील असा धाक त्यांनी गोविंदरावांना घातला. परंतु सावित्रीबाईं
ह्या जोतिबांच्या तालमीत तयार झालेल्या जिद्दीच्या व करारी स्त्री शिक्षिका होत्या.
आपण करीत असलेले पाप नसून पुण्य व परोपकारच करत आहोत याबद्दल त्यांना खात्री होती.
त्या डगमगल्या नाही. जोतिरावांनी आपल्या वडिलांची समजूत घालण्याचा प्रयत्न खूप केला.
पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी घराबाहेर जाण्याचा प्रसंग त्याच्यांवर ओढवला.
पतीची आज्ञा पाळावी तर सासू-सासरे व गणगोत सोडावे लागणार. सर्वांची मर्जी राखली तर
पतीच्या पवित्र कार्यात खंड पडणार. अखेर ती माऊली जोतीरावांच्याच मार्गाने गेली. म्हणूनच
क्रांतीकारक कार्य त्यांना करता आले. द्विधा अवस्थेवर निर्णय घ्यायच्या स्थितीमध्ये
सावित्रीबाईंनी आपल्या पतीने स्वीकारलेल्या खडतर मार्गाची निवड केली. समाजानेही फुले
दाम्पत्याचा अतोनात छळ केला. परंतु जोतिबा व सावित्रीबाई थोडे देखील आपल्या ध्येयापासून
विचलित झाले नाही. सामाजिक क्रांतीचे हे कार्य त्यांनी जाणीवपूर्वक अंगीकारले होते.
अशा या भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम
शिक्षिका, कवियीत्री क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तिमत्व आणि कार्याला
सलाम.
श्रीमती.पल्लवी अनिल धारव
विभागीय माहिती कार्यालय, अमरावती
मो.क्र. 9822451215
ई-मेल:- pallavidharav@gmail.com
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा