रविवार, १० एप्रिल, २०२२

अन्न, औषधींची तपासणी प्रमाणित निकषांनुसार करावी - अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

 






अन्न, औषधींची तपासणी प्रमाणित निकषांनुसार करावी

-         अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

अन्न सुरक्षा, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याची प्रभावी

अंमलबजावणी करण्याचे निर्देश

        अमरावती, दि. 10 : अन्न सुरक्षा व मानदे, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत दिलेल्या बाबींची प्रभावी अंमलबजावणी करावी. नागरिकांना सुरक्षित, पोषक व गुणवत्तापूर्ण अन्न मिळण्यासाठी जिल्हयात सर्व ठिकाणी खाद्य पदार्थांच्या विक्रीस्थळाची, पदार्थ तयार करतांना वापरण्यात येणाऱ्या  अन्न घटकांची वेळोवेळी पाहणी करण्यात यावी. जिल्ह्यात प्रतिबंधित अन्न पदार्थ व औषधांच्या होणाऱ्या विक्रीबाबत कारवायांचे प्रमाण वाढविण्यात यावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्र.सहआयुक्त (अन्न) शरद कोलते, प्र.सहआयुक्त (औषधे) उमेश घरोटे, अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) संदीप सूर्यवंशी, अन्न सुरक्षा अधिकारी राजकुमार कोकडवार, भाऊराव चव्हाण, सीमा सुरकर, औषध निरीक्षक मनीष गोतमारे, स्वाती भरडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री शिंगणे यांनी अन्न व औषधींचे गुणांकन करत असतांना त्यातील पोषक घटक व सुरक्षिततेचि तपासणी करण्याचे काम योग्य पध्दतीने व प्रमाणित निकषानुसार करण्यात यावे अशा सुचना  संबंधितांना दिल्या.

उत्पादक व आस्थापनांना परवाना देण्यापूर्वी पाहणी करावी

जिल्ह्यात नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थ व औषधी विक्रेत्यांच्या आस्थापनांची पुर्ण पाहणी करावी. संबंधित आस्थापनांनी नियमांचे पालन केले असल्याचे निदर्शनास आल्यावरच परवाना देण्यात यावा. अशा आस्थापनांची सातत्याने पाहणी करण्यात यावी असे श्री. शिंगणे यांनी सांगितले.

 

औषधी दुकानातुन होणाऱ्या औषधींच्या विक्रीबाबत सतर्कता बाळगावी

औषधी विक्री करण्यात येणाऱ्या दुकांनामध्ये महिन्याल किमान दहा तपासण्या करण्यात याव्या असे निर्देश आहेत. औषधी दुकांनांच्या जास्तीत जास्त तपासण्या करण्यात याव्या असे श्री. शिंगणे यांनी सांगितले. जिल्ह्यात २३५० औषधी विक्रीच्या आस्थापना आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने देण्यात येणाऱ्या औषधांचीच विक्री या आस्थापनांमधुन व्हावी. व्यसन लागण्याची शक्यता असणाऱ्या औषधींची विक्री डॉक्टरांच्या सल्ल्याने व आवश्यकतेनुसार व्हावी यासाठी या आस्थापनांची सातत्याने पाहणी करावी असे निर्देश श्री. शिंगणे यांनी दिले.

 

तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी

अन्नपदार्थांमध्ये भेसळीबाबत कुठलीही तक्रार प्राप्त होताच त्या आस्थापना किंवा दुकांनांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. नागरिकांनी केलेल्या अशा तक्रारीबाबत शहानिशा करुन त्या पदार्थांचा साठा तात्काळ जप्त करावा.  खाद्यपदार्थांच्या नमुन्यांची तपासणीचा अहवाल व कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. शिंगणे यांनी दिले. खाद्यतेल, दुध, पाकिटबंद खाद्यपदार्थ, पदार्थांची उत्पादन तिथी, प्रसाद वितरण व यात्रेच्या वेळी वापरण्यात येणारे अन्न पदार्थ, याबाबत संबंधितांनी माहीती दिली.

 

 

मार्च 2022 पर्यत 196 अन्न नमुने

मार्च 2022 पर्यंत जिल्ह्यात 196 अन्नाचे नमुने घेण्यात आले असून त्यात 3 कमी दर्जाचे, 4 मिथ्याछाप व 3 असुरक्षित आढळून आले. निम्न दर्जा प्रकरणी 39 हजार दंड आकारण्यात आला. 317 आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून 52 आस्थापनांना  सुधारणा करण्याबाबत आदेश देण्यात आले. गुटखा, पान मसाला या प्रतिबंधित अन्न पदार्थाबाबत जिल्ह्यात 28 ठिकाणी धाड टाकण्यात आली असून 92 लक्ष 71 हजार रुपयांच्या साठा जप्त करण्यात आली असल्याची माहिती सहआयुक्त शरद कोलते यांनी दिली.

 

309 औषधी व सौंदर्य प्रसाधने नमुन्यांची तपासणी

मार्च 2022 पर्यंत औषधी  व सौंदर्य प्रसाधनां बाबत करण्यात आलेल्या  309 तपासण्यांमधील 132 आस्थापनांना कारणे दाखवा बजावण्यात आले असून 77 आस्थापनांचे निलंबन व 20 आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले. 65 औषधी नमुन्यांच्या तपासणीदरम्यान 5 नमुने अप्रमाणित आढळल्याची माहिती सहआयुक्त उमेश घरोटे यांनी यावेळी दिली.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा