सोमवार, ११ एप्रिल, २०२२

पारधी समाजाच्या व्यक्तींसाठी विविध योजना; अर्ज करण्याचे आवाहन

 

पारधी समाजाच्या व्यक्तींसाठी विविध योजना; अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 11 : धारणी एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प कार्याक्षेत्रांतर्गत पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या पारधी समाजाच्या अर्जदारांकडून योजनांचे अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजनांचे विनामूल्य अर्ज वाटप व स्विकृती शासकीय आश्रमशाळा (गुल्लरघाट) कॅम्प, बाभळी ,दर्यापूर, एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प, धारणी अंतर्गत सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालय मोर्शी, उपकार्यालय, अपर आयुक्त कार्यालय अमरावती व प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी येथे सुरू आहे.

पारधी समाजाच्या अर्जदारांनी परिपूर्ण कागदपत्रांसह भरलेला अर्ज दिनांक 5 मे 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. या योजनेचा  लाभ मिळण्यासाठी प्राप्त होणा-या अर्जाची छाननी करून समितीमार्फत अर्जदारांची अंतिम  लाभार्थी निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी या कार्यालयातील विकास शाखेशी तसेच दुरध्वनी क्रमांक 07226-224217 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पारधी समाजाच्या लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे योजनांचा लाभ दिला जातो.

पीठ गिरणी पुरवठा करणे, शुटिंग कॅमेरा पुरवठा करणे, शिलाई मशिन खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे, पारधी समाजाच्या बचत गटांना विहीर खेादकाम करण्यासाठी क्रेन मशिन पुरवठा  अर्थसहाय्य करणे, पारधी समाजाच्या बचतगटांना मंडप साहित्य खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे, डी. एड. झालेल्या युवक-युवतींना शिक्षक पात्रता परिक्षेबाबत मार्गदर्शन करणे, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देणे, पारधी समाजाच्या लाभार्थ्यांना दुचाकी वाहने दुरूस्ती व देखभाल करण्याचे प्रशिक्षण देणे, वेल्डींग कामाचे प्रशिक्षण देवून साहित्य वाटप करणे आदी योजनांचा समावेश आहे.   

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा