कोविडमध्ये पालक गमावलेल्या बालकांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवा
- जिल्हाधिकारी पवनीत कौर
विविध
विषयांच्या आढावा बैठकीत दिले निर्देश
अमरावती दि 20: कोविडकाळात पालक गमावलेल्या बालकांसाठी
बालसंगोपन योजना, बाल न्याय निधी योजना आदींची गतीने व प्रभावी अंमलबजावणी करावी, असे
निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात
आज विविध विषयांचा आढावा श्रीमती कौर यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
बैठकीला मनपा सहायक आयुक्त नरेंद्र वानखेडे,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) इ.झेड.खान, मनपा शिक्षणाधिकारी डॉ अब्दुल राझिक, विस्तार
अधिकारी कोहळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, सहायक पोलिस निरीक्षक अजितसिंग
राजपूत, बालविकास प्रकल्प अधिकारी अतुल भडांगे, राजश्री कोलखेडे, राजेश वानखेडे, मंगल
पांचाळ चाईल्ड लाईन केंद्राचे समन्वयक अमित कपूर आदी उपस्थित होते.
बाल न्याय निधीतून बालकांना तात्काळ मदत दयावी
कोविड काळात अनाथ किंवा एक पालक गमावलेल्या
बालकांसाठी जिल्ह्याला बाल न्याय निधीतून 45 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
त्या निधीतून वर्षातून एकदा दहा हजार रुपयांची देण्यात येणारी मदत, या बालकांचे शालेय शुल्क,
वसतिगृह शुल्क भरावे व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यात यावे.
महानगरपालिकेच्या
महिला व बालकल्याण विभागाकडून या बालकांसाठी करण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीबाबतच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात यावा असे
निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
'मिशन वात्सल्य' अंतर्गत महिलांसाठी कौशल्य विकास
प्रशिक्षणाचे आयोजन करावे
कोविड काळात घरचा कर्ता पुरुष गमावलेल्या
विधवा महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या मिशन वात्सल्य योजनेच्या लाभापासून एकही महिला वंचित राहू
नये. योजनेअंतर्गत या महिलांना आर्थिक मदत करण्यात येतेच पण त्याशिवाय त्या कायमस्वरूपी
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्या यासाठी त्यांच्यातील कौशल्य विकसित करणारी प्रशिक्षणे,
रोजगार विषयी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कौर यांनी
केल्या.
गरजू बालकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा
चाईल्ड लाईन व बालकांच्या सरंक्षण
विषयी बाबींचा आढावा जिल्हाधिकारी कौर यांनी घेतला. बालकांच्या हक्कांचे संरक्षण, बालकांना
शोषणमुक्त करणे, वैद्यकीय सेवा, निवारा पुरविणे, विविध शासकीय योजनांचा गरजू बालकांना
लाभ मिळवून देणे इत्यादीं उपक्रम शासकीय व निमशासकीय संस्था व यंत्रणांनी समन्वयाने
राबवावे असे निर्देश चाईल्ड लाईन सल्लागार समितीचा आढावा घेतांना श्रीमती कौर यांनी
दिले.
बालकांसाठीच्या 1098 हेल्पलाईनचा अधिकाधिक प्रचार
व प्रसार करावा
चाईल्ड लाईन 1098 क्रमांका बाबतची
माहिती प्रत्येक शाळेत, शहरातील मोक्याच्या ठिकाणी, पोलीस स्टेशनमध्ये, बस आगार परिसरात
भित्तिपत्रके लावून, ठिकठिकाणी 1098 च्या माहितीची उद्घोषणा करून व वृत्तपत्राच्या
माध्यमातून 1098 बाबतचा प्रचार व प्रसार करण्यात यावा. असे निर्देश जिल्हाधिकारी कौर
यांनी दिले.
रस्त्यावर
राहणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण करून त्यांना शालेय शिक्षण देण्याबाबत उपाययोजना करण्यात
यावी. या बालकांनी किंवा त्यांच्या पालकांनी पुन्हा रस्त्यावर येऊन जीवन जगू नये, त्यांचा सर्वांगीण
विकास व्हावा यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात यावे, असे निर्देश दिले.
बालविवाहाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीपर उपक्रम
राबवावे
जिल्ह्यातील प्रामुख्याने आदिवासी
भागात होणारे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क रहावे.जानेवारी ते एप्रिल
2022 पर्यंत 14 बालविवाह रोखण्यात आले आहे. परंतु बालविवाह होऊ नये यासाठी विशेष उपक्रम
राबविण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी कौर यांनी केल्या. जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा आढावा
घेतला त्यावेळी त्यांनी सूचना केल्या. आदिवासी ग्रामीण भागात बालविवाहाच्या दुष्परिणामांबाबत
जनजागृती करणे गरजेचे असून त्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना श्रीमती कौर यांनी केल्या.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा