रविवार, ३१ डिसेंबर, २०२३

स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

 







स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

 

 

            मुंबई, दि. 31 : प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

 

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज स्वच्छ माझा महाराष्ट्र या महास्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, माजी आमदार राज पुरोहित, उद्योगपती नादीर गोदरेज, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, डॉ. सुधाकर शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

महास्वच्छता अभियान राज्यभर

 

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यानंतर हे अभियान मुंबई शहरात राबवले. या अभियानाचा परिणाम खूप चांगला आहे. त्यामुळे हे अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे. स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियानासाठी एक कार्य प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. या अभियानात लोकांना सहभागी करून घेण्यात यावे.

 

स्वच्छता अभियान लोकचळवळ झाली

 

            मुंबई शहरात सुरू केलेल्या या अभियानात शाळा, महाविद्यालय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध प्रतिष्ठान सहभागी होत आहेत. यामुळे या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप येत आहे. मुंबई डीप क्लीन ड्राईव्हचे एक मॉडेल तयार झाले आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज येथे सांगितले.

 

मुंबईत अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविणार

 

            विकास प्रकल्पामुळे तोडाव्या लागलेल्या झाडांचे पुनर्रोपण करणार आहे. मुंबईत रिकाम्या जागेवर झाडे लावली जाणार आहेत. मुंबई शहरात अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविण्यासाठी विचार सुरू आहे. ठाणे शहरातील कोपरी परिसरापासून गायमुख पर्यंत ग्रीन पॅच तयार केला जात आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

 

स्वच्छता कर्मचारी मुंबईचा खरा हिरो

 

            मुंबई शहरातील स्वच्छता कर्मचारी खरा हिरो आहे. कारण ते सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतात. मुंबई स्वच्छ ठेवतात. या कर्मचाऱ्यांच्या वसाहती स्वच्छ ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सफाई कर्मचारी यांना विमा सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सफाई कर्मचारी यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

 

 

स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवा, लोकप्रतिनिधींना सूचना

 

            मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र नेले जाणार आहे. हे अभियान आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध लोकप्रतिनिधींना केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे आमदार विद्या ठाकूर, आशिष शेलार, यामिनी जाधव, भारती लव्हेकर, प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, कालिदास कोळंबकर यांच्याशी संवाद साधला.

 

            तत्पूर्वी महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी मुंबई शहरात राबवल्या जात असलेल्या डीप क्लीन ड्राईव्हबाबत माहिती दिली. यावेळी स्वच्छता कर्मचारी संदीप पवार, शीला जाधव, मच्छिंद्र सावंत, स्वप्नील शिरवाळे, अर्चना मोरे यांचा सत्कार करण्यात आला.   अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी आभार मानले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. स्वच्छता कामात उपयोगी ठरणाऱ्या वाहनांच्या संचलनास हिरवा झेंडा दाखवून सुरवात केली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी वीर माता जिजाबाई भोसले उद्यान, सदानंद धवन उद्यान, भोईवाडा येथे भेट देऊन सफाई कर्मचारी व मुलांशी संवाद साधला.

0000

बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होताना गुणवत्ता टिकून रहावी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 












शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होताना गुणवत्ता टिकून रहावी

-         केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Ø  कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 वा जयंती उत्सव

Ø  खासदार शरद पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान

अमरावती, दि. 27 : कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासह विदर्भातील खेड्यापाड्यापर्यंत शिक्षणाचे जाळे निर्माण केले. यामुळे आज विद्यार्थ्यांना विविध ज्ञानक्षेत्राचा लाभ मिळत आहेत. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होताना त्याची गुणवत्ता टिकून रहावी, असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयातील क्रीडांगणावर शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. सत्कारमुर्ती खासदार शरद पवार, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार किरण सरनाईक, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी मंत्री अनिल देशमुख, संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कन्व्हर्जन्स ऑफ नॉलेजबाबत मार्गदर्शन करताना श्री. गडकरी म्हणाले, माणूस त्याच्या गुणवत्तेतून मोठा होत असतो. वक्तृत्व, कर्तृत्व व नेतृत्व हे केवळ शिक्षणाने तयार होत नाही तर त्यासाठी संस्काराचे कोंदण आवश्यक आहे. संताचे चांगले विचार आणि मार्गदर्शनामुळे समाज प्रगल्भ होतो. डोळे दान करता येतात, परंतु दृष्टी दान करता येत नाही. यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून स्व-विकासासोबतच समाजाचाही विकास व्हावा, यासाठी युवकांनी प्रयत्नशील रहावे. आपला देश खेड्यात वसतो. येथील कृषीबांधव केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाता व्हावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावे समृद्ध आणि स्वयंपूर्ण व्हावीत यासाठी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. भाऊसाहेबांचे हेच स्वप्न होते. शेतकरी, गोरगरीब या सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात येता यावे, यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख यांनी शिक्षणगंगा घरोघरी पोहचविली. त्यांचे कार्य येणाऱ्या पिढींना मार्गदर्शन करीत राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खासदार शरद पवार यांच्या सारखा अभ्यासू आणि सम्यक व्यक्तीला पहिल्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. हा खऱ्या अर्थाने या पुरस्काराचा सन्मान आहे. श्री. पवार यांनी देशातील कृषी विकासाचा दर वाढविण्यासाठी प्रयत्न केला. कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्राचा वापर करुन बी-बियाणे, जैव तंत्रज्ञान, खते व्यवस्थापन यांना प्रोत्साहन दिले. कृषी संशोधन, अन्नप्रक्रिया उद्योग व शेतीपुरक व्यवसायाला मार्गदर्शन केले. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख होऊन शेती उत्पादन वाढीसाठी उपयोग झाला, असेही श्री. गडकरी यावेळी म्हणाले.

पुरस्काराला उत्तर देताना खासदार श्री. पवार म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्काराचा प्रथम मान मला देण्यात आला, यासाठी मी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा आभारी आहे. महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी कृषीक्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. माझी आई ही देखील महिला शेतकरी होती. तिने शेतात कष्ट करुन आम्हा भावडांना मोठे करुन प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. अन्य शेतकरी महिलांच्या कार्यकर्तृत्त्वाचा सन्मान होणे गरजेचे आहे. यातून अन्य शेतकरी महिलांचा आत्मविश्वास दुणावेल, असेही ते यावेळी म्हणाले.

कृषिरत्न तसेच शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या जयंती उत्सवानिमित्त भारत सरकारने निर्माण केलेल्या 125 रुपयाच्या नाण्याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘शिवसंस्था’ मासिक, दैनंदिनी, दिनदर्शिका-2024, भाऊसाहेबांच्या जीवनावरील छायाचित्रांचे पुस्तक व चित्रफितीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अभ्यासिकेचे व डॉ. पंजाबराव देशमुख अध्यासन केंद्राचे उद्घाटन रिमोटची कळ दाबून ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नूतनीकृत स्मृतीभवन श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या नवीन ग्रंथालयाचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.

खासदार शरद पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. 5 लक्ष रुपयाचा धनादेश, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

यावेळी संस्थेच्या विविध विद्याशाखेत गुणवंत ठरलेल्या मुलींना श्रीमती विमलाबाई देशमुख, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासवृत्ती प्रदान करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. किशोर फुले तर आभार दिलीप इंगोले यांनी मानले.  

00000

मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३

विभागीय आयुक्तालयात ‘वीर बाल दिवस’ साजरा

 

विभागीय आयुक्तालयात ‘वीर बाल दिवस’ साजरा

अमरावती, दि. 26 : ‘वीर बाल दिवस’ निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज साहिबजादा जोरावर सिंगजी व साहिबजादा फतेह सिंगजी यांच्या प्रतिमेस विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

उपायुक्त गजेंद्र बावने, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, विशेष कार्य अधिकारी हर्षल चौधरी, नायब तहसीलदार मधुकर धुळे यांचेसह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

गुरु गोविंद सिंग यांच्या दोन लहान मुलांनी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक म्हणून 26 डिसेंबर हा दिवस "वीर बाल दिवस" म्हणून साजरा केला जातो.  साहिबजादा जोरावर सिंगजी आणि साहिबजादा फतेह सिंगजी हे दोघेही 9 वर्षे आणि 7 वर्षांचे असतांना दोघांना सन 1705 मध्ये मुघलांनी भिंतीत जिवंत गाढले होते.  या दोन लहान मुलांना मोगलांनी दोन मोठ्या भावांसह मारले. गुरू गोविंद सिंग जी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे शौर्य आणि आदर्श म्हणून दरवर्षी या दिवशी अन्यायाविरुद्ध त्यांच्या प्रतिकारशक्तीचे स्मरण केले जाते.

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2022 पासून दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा केली होती.  17 व्या शतकात शहीद झालेल्या 4 साहिबजादांच्या (गुरु गोविंद सिंग जींचे चार पुत्र) शौर्याला श्रद्धांजली म्हणून हा दिवस साजरा केला जाईल असे पंतप्रधान मोदी यांनी 09 जानेवारी 2022 रोजी श्री गुरु गोविंद सिंग जी यांच्या प्रकाश पर्व किंवा शिखांचे 10 वे गुरू आणि खालशाचे संस्थापक यांच्या जयंतीनिमित्त ही घोषणा केली होती, अशी माहिती श्री. मस्के यांनी यावेळी दिली.

00000        

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

लोणार विकास आराखड्यातील कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

 



लोणार विकास आराखड्यातील कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा

                          - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

 

अमरावती, दि. 15 : लोणार विकास आराखड्यातील कामे कालमर्यादेत पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करावीत. कामांच्या प्रगतीचा अहवाल वेळोवेळी समितीला सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले.

लोणार विकास आराखड्यांतर्गत येणाऱ्या विविध विषयांचा आढावा विभागीय आयुक्तांनी बैठकीद्वारे आज विभागीय आयुक्त कार्यालयात घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील दूरदृश्यप्रणालीव्दारे तसेच मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, समितीचे सदस्य एस सान्याल, दिपक ठाकरे, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलीक, विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर, उपसंचालक (नियोजन) हर्षद चौधरी, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, एमएमआरडीएचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, बुलडाणा जिल्ह्यातील बेसॉल्ट खडकात उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर हे जगविख्यात आहे. हे स्थळ जैवविविधतेने सपन्न असून पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. या पर्यटनस्थळाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाव्दारे 369 कोटी 78 लक्ष रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विकास आराखड्यातील प्रस्तावित कामे पूर्णत्वास जाण्यासाठी समितीव्दारे नियमितपणे आढावा घेण्यात येतो. आराखड्यांतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता व निधीची तरतूद करुन देण्यात आली आहे. त्यानुसार विकासकामे गतीने पूर्ण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. विकास आराखड्यांतर्गत येणारी लोणार सरोवर व परिसरातील नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांना दिले.

            सरोवरातील पाण्याचा उपयोग होण्यासाठी पाण्याची ‘पीएच व्हॅल्यू’ भुजल सर्वेक्षण विभाग व निरीच्या तज्ज्ञांकडून तपासून घेण्यात यावी, अशा सूचना समितीने संबंधित यंत्रणांना केल्या. भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या 15 मंदिरांचे जतन, संरक्षण व सुशोभिकरण अंतर्गत येणारी दुरुस्तीची कामे पुरातत्व विभागाने करावयाची असून त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. लोणार सरोवर परिसरातील गायमुख मंदिरस्थळी भेट देणाऱ्या पर्यटक व नागरिकांकडून आंघोळीसाठी  शॅम्पू, डिर्टजंन्ट व साबून वापरण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे लोणार सरोवरातील पाणी दुषित होत असून त्यातील जैवविविधतेवर संकट निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्याठिकाणी आंघोळीसाठी प्रतिबंध करण्याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासनाला विकास आराखडा समितीने दिल्या.

लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या, त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधांच्या माहितीचा अहवाल नियमितपणे समितीला सादर करण्यात यावा, अशा सूचना डॉ. पाण्डेय यांनी वन विभागाला दिल्या. सरोवर परिसरात पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे, निवारा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्यात यावीत. विद्यापीठाकडून उभारण्यात येणाऱ्या लोणार विज्ञान केंद्र व संशोधन प्रयोगशाळेचे काम वेळेत पूर्ण व्हावे, जेणेकरून उमद्या संशोधकांकडून संशोधनाला चालना मिळेल. लोणार सरोवर परिसरातील ‘ईको टुरिझम’ चे काम पूर्णत्वास जाण्यासाठी वनविभागाने जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे, असेही डॉ. पाण्डेय यांनी यावेळी सांगितले.

00000

गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३

मतदार यादी निरीक्षकांकडून अमरावती, बडनेरा मतदारसंघातील निवडणूक कामकाजांचा आढावा

 मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-2024


मतदार यादी निरीक्षकांकडून अमरावती, बडनेरा मतदारसंघातील

निवडणूक कामकाजांचा आढावा

 

·         ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्राचे विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या हस्ते उद्घाटन

 

·         व्होटर हेल्पलाईन ॲप व voters.eci.gov.in  ceo.maharashtra.gov.in संकेतस्थळ वापरा

 

 

          अमरावती, दि. 14 : भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 जाहीर करण्यात आला आहे. मतदार यादीच्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांची ‘मतदार यादी निरीक्षक’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार डॉ. पाण्डेय यांनी आज अमरावती उपविभागीय कार्यालयात अमरावती व बडनेरा मतदारसंघातील निवडणूक कामकाजांचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय कार्यालयात उभारण्यात आलेल्या ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्राचे विभागीय आयुक्तांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले.

            जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपायुक्त संजय पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, रणजित भोसले,  भातकुलीच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पी.एम. मिन्नू, तहसीलदार श्री. लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.

            यावेळी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत नागरिकांना ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रावर मतदानाचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, मतदानाविषयी मतदारांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावे. 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांचे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे. त्यासाठी त्यांच्याकडून आवश्यक नमूना भरुन घेण्यात यावेत. स्थलांतरीत किंवा मयत झालेल्या मतदारांसंबंधी खात्री करुन मतदार यादी अद्ययावत करण्यात यावी. घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित बीएलओकडून मतदारांचे सर्वेक्षण करण्यात यावे. मतदाराच्या नाव, फोटो व पत्त्यामध्ये बदल असल्यास अचूकप्रमाणे सुधारणा करुन घेण्यात यावी. तसेच मतदारांचे आक्षेप किंवा शंकांचे तात्काळ निराकरण करण्यात यावे. एकही व्यक्ती मतदानापासून वंचित राहणार नाही, याची जाणीवपूर्वक खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

मतदारांच्या काही निवडणूकविषयक तक्रारी असतील त्या तत्परतेने सोडविल्या जाव्यात. मतदार निवडणूकविषयक तक्रारी असल्यास 1950 या टोल फ्री क्रमांकावर नोंदविण्याबाबत जनजागृती करावी. शहरी आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणच्या मतदार यादीत मतदारांचे नाव असतात. कोणत्या एका ठिकाणी मतदार यादीत नाव पाहीजे हे मतदाराला विचारणा करून तेथील यादीत नाव ठेवावे. ज्या कुटूंबामध्ये 10 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती आहे, अशा कुटुंबाची तपासणी करून त्यांच्यात दुरुस्ती करण्यात यावी. नवमतदार तसेच ज्यांचे नाव मतदार यादीत नाही, अशा सर्व पात्र मतदारांची मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. मतदार नोंदणीसाठी व्होटर हेल्पलाईन ॲप किंवा voters.eci.gov.in  ceo.maharashtra.gov.in चा वापर करण्यासंबंधी तसेच जवळचे मतदान केंद्रावर बीएलओकडे जाऊन नमुना 6 चा अर्ज भरण्याबाबत प्रसिध्दी पत्रकाव्दारे जनजागृती करण्याच्या सूचना डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिल्या.

00000