भारतीय प्रजासत्ताकाचा 73 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
हक्कांबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवून लोकशाही अधिक बळकट करूया
अमरावती, दि. 26 : जगातील सर्वात मोठी व यशस्वी लोकशाही म्हणून भारताचा जगभर गौरव होतो. ही संविधानाची ताकद आहे आणि येथील नागरिकांच्या सौहार्द, सहिष्णूता व बंधुभावाचे ते गमक आहे. नागरिक म्हणून आपले कर्तव्य पाळून ही लोकशाही अधिकाधिक बळकट करण्याचा संकल्प आपण सर्वांनी प्रजासत्ताकदिनानिमित्त करूया, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.
भारतीय प्रजासत्ताकाच्या 73 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण विभागीय आयुक्तांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात ते बोलत होते. विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, प्र. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक राकेश कलासागर आदी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रध्वज वंदन व राष्ट्रगीतानंतर विभागीय आयुक्तांनी मैदानावर उघड्या जीपमधून फेरी मारून पोलीस, विविध सुरक्षा दलांच्या व विभागांच्या पथकांचे निरीक्षण केले. त्यांच्या हस्ते विविध गुणवंत अधिकारी व कर्मचा-यांना गौरविण्यात आले.
विभागीय आयुक्तांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की,
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात लोकांचे राज्य स्थापण्याच्या हेतूने लोकशाही प्रस्थापित करण्याचा विचार पुढे आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीने राज्यघटना निर्माण केली. ती 26 जानेवारी 1950 रोजी देशभर लागू करण्यात आली. आज सात दशकांहून अधिक काळ लोकशाही या देशात दृढपणे टिकून आहे, वृद्धिंगत व अधिक मजबूत होत आहे. ही खरी संविधानाची ताकद आहे.
ते पुढे म्हणाले की, लोकशाही हा केवळ शासनसंस्थेचा प्रकार नाही तर ती एकत्रित असण्याची जीवनपद्धती आहे. समाज बदलण्याचे सामर्थ्य लोकशाहीच्या संकल्पनेत आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाला घटनात्मक हक्क संविधानाने बहाल केले आहेत. गत सात दशकांमध्ये राज्यघटनेद्वारे न्याय, समता, बंधुता, एकता व एकात्मता ही मूल्ये येथे रुजली. लोकशाही प्रस्थापित झाली. लोकशाहीचे सक्षमीकरण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. लोकसहभाग हा यातील महत्वाचा घटक आहे. हक्कांबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवून लोकशाही बळकट करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
राष्ट्रीय मतदारदिनाचा उल्लेख करून ते म्हणाले की, आपला मताधिकार बजावण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदार म्हणून नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘गाव हा विश्वाचा नकाशा’ या रचनेतील ओळीही त्यांनी यावेळी उद्धृत केल्या.
शासन व्यवहारात लोकसहभाग आवश्यक असतो. त्यामुळे एक मतदार म्हणून आणि एक नागरिक म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तव्य कसोशीने पार पाडण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर, विविध अधिकारी व कर्मचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००